व्यासंगाचा सन्मान (मर्म)

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

ज्येष्ठ समीक्षक प्रा. म. सु. पाटील यांना मराठी साहित्य समीक्षेसाठी "साहित्य अकादमी' पुरस्काराने आणि ज्येष्ठ संशोधक प्रा. शैलजा बापट यांना भाषा व साहित्य यासाठीच्या मूलभूत संशोधनासाठी "भाषा सन्मान' पुरस्काराने गौरवून साहित्य अकादमीने व्यासंगाचा सन्मान केला आहे. "अनुष्टुभ' परिवारातील प्रा. पाटील कवितेच्या मर्मग्राही समीक्षेसाठी परिचित आहेत. संत तुकाराम व संत ज्ञानेश्‍वर यांच्या काव्याची वेगळी ओळख करून देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. कवितेच्या निर्मिती प्रक्रियेचा, त्यामागच्या प्रेरणांचा शोध डॉ. सुधीर रसाळ व दि. पु. चित्रे यांच्यानंतर प्रा. पाटील यांनीच प्रभावीपणे घेतलेला दिसतो.

ज्येष्ठ समीक्षक प्रा. म. सु. पाटील यांना मराठी साहित्य समीक्षेसाठी "साहित्य अकादमी' पुरस्काराने आणि ज्येष्ठ संशोधक प्रा. शैलजा बापट यांना भाषा व साहित्य यासाठीच्या मूलभूत संशोधनासाठी "भाषा सन्मान' पुरस्काराने गौरवून साहित्य अकादमीने व्यासंगाचा सन्मान केला आहे. "अनुष्टुभ' परिवारातील प्रा. पाटील कवितेच्या मर्मग्राही समीक्षेसाठी परिचित आहेत. संत तुकाराम व संत ज्ञानेश्‍वर यांच्या काव्याची वेगळी ओळख करून देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. कवितेच्या निर्मिती प्रक्रियेचा, त्यामागच्या प्रेरणांचा शोध डॉ. सुधीर रसाळ व दि. पु. चित्रे यांच्यानंतर प्रा. पाटील यांनीच प्रभावीपणे घेतलेला दिसतो. पाश्‍चात्य व पौर्वात्य परंपरांची सांगड घालत त्यांनी साहित्यातील अनुभवाकडे पाहिलेले दिसते. त्यांच्या या निखळ व निरलसपणे चाललेल्या शोधाचा साहित्य अकादमीने सन्मान केला आहे.

साठोत्तरी काळात समीक्षेची नवी दृष्टी येत असताना प्रा. पाटील यांनी प्रा. गंगाधर पाटील यांच्यासमवेत आदिबंधात्मक समीक्षेची ओळख करून दिली. दलित साहित्याचे सौंदर्यशास्त्र कसे असू शकेल, हे त्यांनी सांगितले आहे. त्यांच्या सर्वच लेखनामागे त्यांचा व्यासंग दिसून येतो. मराठीच्या हिताची काळजी वाहणारा अध्यापक आणि चिकित्सक समीक्षक म्हणून प्रा. पाटील समकालीन लेखकाचा आधार बनून राहिले होते, तर आजच्या पिढीसाठी मार्गदर्शक ठरत आहेत. 

प्रा. शैलजा बापट यांनी "ए क्रिटिकल स्टडी ऑफ ब्रह्मसूत्राज' हा त्रिखंडी संशोधनग्रंथ लिहिला आहे. भारतीय वेदांतदर्शनात उपनिषदे, भगवद्‌गीता आणि ब्रह्मसूत्रे अशी तीन प्रस्थाने मानली जातात. बादनारायणांनी 555 सूत्रांमध्ये ब्रह्मसूत्र हा ग्रंथ रचला होता. त्यावर शंकराचार्यांचे भाष्य हे पहिले ज्ञात भाष्य होय. त्यांच्याखेरीज विविध दहा संप्रदायातील तत्त्ववेत्यांनी भाष्य केले होते.

भारतभर हिंडून वेगवेगळ्या लिप्यांमधील अडीचशे पोथ्या प्रा. बापट यांनी मिळवल्या. त्यासाठी त्या लिप्यांचा अभ्यास केला. त्यानंतर त्याची तुलनात्मक समीक्षा केली. अडीचशे पोथ्यांमधील पाठभेदांची चिकित्सा करून मूलपाठाची संभाव्यता शोधण्याचे महत्त्वपूर्ण कार्य प्रा. बापट यांनी केले आहे. त्याचबरोबर विवेचक असा शब्दार्थकोश त्यांनी या एकोणीसशे पानांच्या ग्रंथाला जोडला आहे. पुढच्या अभ्यासकांसाठी ही महत्त्वाची वाट त्यांनी करून दिलेली आहे. 

Web Title: Pune Edition Editorial Article on Marm