शुद्धिकरणाची बुरसट बुद्धी (मर्म)

शुद्धिकरणाची बुरसट बुद्धी (मर्म)

ज्या माणसाने आयुष्यभर कर्मकांड, अंधश्रद्धा याला फाटा देत केवळ "कर्म' हेच आपले जीवन मानले, त्याच मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर राज्याच्या कला अकादमी संकुलात पर्रीकर यांचे पार्थिव ज्या ठिकाणी ठेवण्यात आले होते तिथे "शुद्धिकरण विधी' करण्याचा प्रकार घडला आणि एकच खळबळ उडाली. हा प्रकार सरकारी कार्यालयात झालेला असल्याने त्याचे गांभीर्य अधिक वाढते. गोमंतकीयांची एकंदर मानसिकता पाहता, बऱ्याच जणांना यात गैर काय, असे वाटू शकते. तरीही "कला अकादमी'त जे काही घडले त्याचे समर्थन करता येणार नाही.

पर्रीकर यांचे पार्थिव समस्त गोमंतकीयांसाठी अंतिम दर्शनाकरिता तेथे ठेवण्यात आले होते. हजारो लोकांनी आपल्या लाडक्‍या नेत्याला अखेरचा निरोप दिला तो याच कला अकादमीत. पर्रीकर यांनी आपले उभे आयुष्य जनतेच्या सेवेसाठी समर्पित केले. गेले वर्षभर स्वादुपिंडाच्या कर्करोगाशी झुंजत असतानाही त्यांनी मुख्यमंत्री म्हणून आपली जबाबदारी पार पाडली. अगदी शेवटच्या क्षणापर्यंतही त्यांनी आपल्या कृश झालेल्या शरीराकडे पाहिले नाही. कोणतेही काम करण्यासाठी त्यांनी कधी मुहूर्त शोधला नाही. प्रत्येक दिवस हा महत्त्वाचा असतो आणि काम करावेच लागते. त्यासाठी काळ, वेळ शोधत बसण्यापेक्षा आपण आपले कर्तव्य इमानेइतबारे केल्यास यश मिळते, यावर त्यांचा गाढा विश्‍वास होता. म्हणूनच ते कधीही चांगला - वाईट दिवस, भविष्य यात गुरफटून गेले नाहीत.

मध्यंतरी सरकारी कार्यालयांमध्ये सत्यनारायण पूजा, अन्य धर्मीयांचे उत्सव कार्यालयीन कामकाजाच्यावेळी साजरे करू नयेत, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते. त्यामुळे शनिवार या सुट्टीच्या दिवशी असे कार्यक्रम होतात. प्रगत गोव्यातही कर्मकांडावर विश्‍वास ठेवणाऱ्यांची काही कमी नाही. परंतु सरकारी संकुलांमध्ये असे प्रकार होणे हे मागासलेपणाचेच लक्षण आहे.

पर्रीकर यांनी आपले सर्वस्व गोव्याच्या हितासाठी अर्पण केले. त्याच पर्रीकरांचे पार्थिव ठेवलेल्या जागी असे शुद्धिकरण करण्याने गोवा अजूनही बुरसटलेल्या विचारात गुरफटला आहे, असेच चित्र देशभर नव्हे, तर जगभर गेले आहे. कला आणि संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांनी या प्रकाराची चौकशी करून कारवाई केली जाईल, असे म्हटले असले, तरी स्वत: अध्यक्ष असलेल्या गोवा कला अकादमीत त्यांनी असे घडूच कसे दिले, हा प्रश्‍न उरतोच. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com