रसायनीतील 'भोपाळ'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 डिसेंबर 2018

मुंबई-ठाण्यासारख्या अनेक शहरांचे "भोपाळ' होऊ नये, असे वाटत असेल, तर हा धोका वेळीच लक्षात घेऊन औद्योगिक सुरक्षा मानके काटेकोरपणे पाळली जायला हवीत. रसायनी येथील दुर्घटनेने तोच इशारा आपल्याला दिला आहे. 

काही प्राणिमित्रांनी आणि ग्रामस्थांनी ओरड केली नसती, तर कदाचित रसायनीतील पूर्वाश्रमीच्या हिंदुस्थान ऑर्गेनिक केमिकल्स लिमिटेड या रासायनिक कारखान्यात नेमके काय झाले, हे गूढच राहिले असते. या कंपनीत गुरुवारी रात्री झालेल्या वायुगळतीने किमान 31 माकडांचा आणि अनेक कबुतरांचा जीव घेतला. ही कंपनी सध्या भारतीय अवकाश संशोधन संस्थेकडे (इस्रो) आहे. अवकाशयानांकरिता लागणारे इंधन तेथे तयार केले जाते. हे पाहता ही दुर्घटना कदाचित "राष्ट्रीय गुपित'ही ठरली असती. तसे प्रयत्नही झालेही; परंतु ते असफल ठरले.

वायुगळती आणि तिचे गंभीर परिणाम दोन दिवसांनंतर का होईना उजेडात आलेच. त्यावर आता नेहमीप्रमाणे कारवाई होईल. पोलिसांनी कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. या टप्प्यावर सहसा आपल्याकडील अशी सर्व प्रकरणे संपतात. काळ जातो, तसतसा तपास संस्थांपासून सामान्य नागरिकांपर्यंत सगळ्यांचाच रस संपत जातो. त्यातूनही प्रकरण न्यायालयात गेले, तर तेथे ती "तारीख-बंद' होते, असे या वेळी तरी घडू नये. हे प्रकरण केवळ काही प्राण्यांच्या मृत्यूचे नाही. ते आहे आपल्या एकूणच बेफिकिर वृत्तीचे. रसायनीत झालेली वायुगळती हा निश्‍चितच अपघात होता. तो कोणाच्या निष्काळजीपणामुळे झाला असेल, तर तो नक्कीच दंडनीय आहे. परंतु, त्या अपघातानंतर त्या कंपनीतील अधिकाऱ्यांनी जे केले ते त्याहून अधिक कठोर शिक्षेस पात्र आहे. त्यांनी मृत प्राणी एकत्र करून गाडून टाकले. वायुगळतीचे पुरावे नष्ट करण्याचा तो प्रयत्न होता.

चूक मान्य करणे हा चूक सुधारण्याच्या प्रामाणिक प्रक्रियेचा एक भाग असतो. येथे काही चुकलेच नाही, काही झालेच नाही, असे भासविण्याचा प्रयत्न केला जात होता. आणि एकदा काही चुकलेच नाही म्हटले, की मग काही सुधारण्याचा प्रश्नच येत नाही. हा गुन्हेगारी स्वरूपाचा अप्रामाणिकपणा आहे. त्याची किंमत कदाचित पुढेमागे त्या परिसरातील मानवी वस्तीलाही चुकवावी लागू शकते. अर्थात, सगळ्यांचेच हे भान हरवत चालले आहे. विकासाची आपली हाव एवढी वाढली आहे, की त्याची किती किंमत आपल्याला चुकवावी लागू शकते, याची जाणीवच आपल्याला राहिलेली नाही. ज्या देशात हजारो नागरिकांचे प्राण घेणारे भोपाळकांड घडते, त्या देशात या जाणिवेचा अभाव असावा, ही बाब आश्‍चर्यकारक खरी; पण इतिहास शिकायचा तो केवळ अस्मितांचे झेंडे उंचावण्यासाठीच. त्यापासून धडा मात्र कोणताही घ्यायचा नाही, या आपल्या संस्कृतीस ती साजेशीच म्हणावी लागेल. 

अवघ्या 34 वर्षांपूर्वीचा तो इतिहास आहे. 1984 मध्ये याच डिसेंबर महिन्यात भोपाळमध्ये जगाच्या औद्योगिक इतिहासातील एक सर्वांत मोठी दुर्घटना घडली होती. या शहरालगत असलेल्या युनियन कार्बाईडच्या कारखान्यातून मध्यरात्रीच्या सुमारास वायुगळती झाली. मिथाईल आयसोसायनेट नामक त्या विषारी वायूचे काळे ढग वाहत वाहत भोपाळच्या घरांघरांमध्ये घुसले आणि हजारो माणसे तडफडून मेली. आजही असंख्य लोक त्या वायूचे दुष्परिणाम सहन करीत आहेत. एवढे सगळे झाल्यानंतर आपल्याकडील औद्योगिक सुरक्षेची मानके आणि कायदे किती कडक असायला हवेत? ते आहेतही. पण, कागदावर. प्रत्यक्षात औद्योगिक सुरक्षेच्या नावाने बोंबच आहे. अनेकांसाठी तेही एक भ्रष्टाचाराचे कुरण बनले आहे. त्या कंपनीचा अध्यक्ष वॉरेन अँडरसन भारतातून कोणामुळे पळाला, एवढ्या सवालापुरती आज त्या दुर्घटनेची स्मृती उरलेली आहे आणि बाकी सर्व सुशेगात आहे.

आजही धोकादायक वस्तूंची, रसायनांची निर्मिती करणारे अनेक कारखाने शहरांच्या कुशीत खुशाल धडधडत आहेत. त्यातील अनेक पूर्वी शहरांपासून दूरवर होते. परंतु, आपली विकासाची भूकच एवढी जबरदस्त की त्या कारखान्यांना आपल्या शहरांनी कधी गिळले, तेही आपल्याला समजले नाही. हा विषाचा घास आहे. यातूनच आज मुंबई-ठाण्यासारख्या अनेक शहरांचे भोपाळ होऊ घातलेले आहे. या शहरांत पहाटेच्या वेळी पसरणारे दर्पयुक्त धुरके ही त्याचीच पाऊलखूण आहे. परंतु, त्याची फिकीर कोण करतो? 

याचा अर्थ, असे सगळे रासायनिक व तत्सम कारखाने बंदच करायचे का? तसे केल्यास तो तुघलकीपणा होईल. याचा अर्थ एवढाच, की औद्योगिक सुरक्षा आणि प्रदूषण यांबाबत आपण अधिक जागरूक असावयास हवे. तेथे बेफिकिरीला आणि भ्रष्टाचाराला स्थान असता कामा नये. हा झाला आदर्शवाद. तेव्हा त्याला कठोर कायद्यानेच बळ द्यावे लागेल. त्याचबरोबर जे कारखाने जीवनाच्या, पर्यावरणाच्या मुळावर येत आहेत, त्यांच्याबाबत कठोर निर्णयही घ्यावे लागतील. ते घेण्याची धमक राज्यकर्त्यांनी दाखवावी, यासाठी त्यांच्यावर सातत्याने दबाव आणावा लागेल. अन्यथा आज रसायनी माकडांचे "भोपाळ' झाले. उद्या हीच वेळ माणसांबाबत अन्य कुठेही येऊ शकेल.

Web Title: Pune Edition Editorial Article on Rasayani Incident