कथेच्या दालनातील झुंबर...(श्रद्धांजली)

कथेच्या दालनातील झुंबर...(श्रद्धांजली)

एकंदरीतच आताशा ओस पडत चाललेल्या मराठी ललित साहित्याच्या दालनात ज्या नामवंत लेखकांनी एकेकाळी लखलखीत दिवे पेटते ठेवले, त्या लेखकांमधले एक बिनीचे नाव होते-शांताराम. केशव जनार्दन पुरोहित ऊर्फ शांताराम ह्यांचे इंग्रजी भाषेवरील प्रभुत्त्व वादातीत होते. इंग्रजी साहित्यातील नवप्रवाहांमधले सूक्ष्म बदल डोळसपणे मराठीतही आणण्याच्या त्यांच्या लेखकीय प्रयत्नांचे मराठी साहित्यात विशेष महत्त्व आहे.

गेली अनेक वर्षे ते वार्धक्‍यामुळे लिहू शकले नाहीत. शिवाय एव्हाना मराठी भाषेत ललित लेखनाचा बाजही खूपच बदलत गेला होता. शांताराम आणि त्यांच्या समकालीन लेखकांची कथा ह्या बदलांशी कितपत सुसंगत राहिली होती किंवा असती, हा अभ्यासाचा विषय आहे. तरीही पुरोहित ह्यांचे मराठी साहित्याला असलेले योगदान अनन्यसाधारण असेच मानले पाहिजे. 

चंद्रपूर जिल्ह्यातल्या चार्मोशीसारख्या गावात शालेय शिक्षण घेऊन नागपुरात इंग्रजी साहित्याचे अध्ययन करतानाच त्यांना मराठी कथेचा आपला स्वतंत्र बाज गवसला होता. 1942 मध्ये त्यांची "संत्र्याची बाग' प्रसिद्ध झाली, त्याने मराठी वाचकांचे लक्ष वेधले. पुढील काळात गंगाधर गाडगीळ, व्यंकटेश माडगूळकर, पु. भा. भावे, उद्धव शेळके आदींच्या आघाडीच्या फळीतील कथाकारांच्या बरोबरीने त्यांनी लिखाण केले.

शांतारामांच्या कथालेखनात ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही जाणीवांचे अस्तित्त्व दिसे. "संत्र्याची बाग'नंतर "मनमोर', शिरवा, "छळ आणि इतर गोष्टी' "लाटा' असे त्यांचे कथासंग्रह वेळोवेळी प्रसिद्ध होत राहिले, मराठी साहित्यात भर पडत गेली. शांतारामांनी पुढे चार दशके आपली लेखणी अव्याहत सुरू ठेवली. मराठी साहित्याची सेवा अशी सुरू असतानाच एकीकडे इंग्रजीचे दर्जेदार पद्धतीने विद्यादान करणारे प्राध्यापक म्हणूनही त्यांनी लौकिक कमावला. नागपूर, अमरावती आणि मुंबई येथील महाविद्यालयांमध्ये पुरोहितसरांच्या इंग्रजीच्या तासांची विद्यार्थी असोशीने वाट पाहात असत. मुंबईच्या इस्माइल युसूफ महाविद्यालयातून प्राचार्य म्हणून निवृत्त होईपर्यंत शांतारामांच्या काळातली कथा बदलून गेली होती, जाणीवांचा पोतही बदलला होता. 

मुंबईतल्या "साहित्य सहवास'च्या मराठी सारस्वतांच्या गृहनिर्माण वस्तीत निवृत्तीनंतरचे आयुष्य सुखाने व्यतीत करत असताना वयाच्या 94व्या वर्षी त्यांना मृत्यूने गाठले आणि शांतारामांच्याच कथेसारखी चटका लावणारी एक दीर्घकथा संपली. मराठी कथेच्या दालनात आता नवे दिवे तेवत ठेवणाऱ्यांची पिढी येईल न्‌ येईल, शांतारामांनी तेथे छताला लावियलेले छोटेखानी झुंबर मात्र यापुढेही कायम राहणार आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com