वाघाचा दिवस! (एक अभिनव अरण्यवाचन...)

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 जुलै 2018

मी जागतिक कीर्तीचा वन छायाचित्रकार आहे. वाघांचे फोटो काढून काढून मी इतका सरावलो आहे की अनेक जंगलातील वाघ खास माझ्याकडून फोटो काढून घेण्यासाठी अंगावरचे पट्टे बदलून घेतात! ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील "एसेस-2' नावाच्या वाघाने गळ्यात कॉलर घालून घेण्यास नकार दिला होता.

उगवतीकडे लालसर पांढुरकी किनार दिसू लागली होती. झाडांच्या आकृत्या ठळक होऊ लागल्या होत्या. कोळसुंदरीच्या पठाराच्या दिशेने फर्लांगभर गेले की तहानमरीचा पाणवठा लागतो. कमलिनी फुललेल्या त्या पाणझरीत पहाटे मोठी गडबड सुरू होते. समोर बोंबलभिक्‍याचा डोंगर आहे. त्याच्या कुशीत मोरनाचीचे पठार आहे. पहाटेच्या सुमारास रानातील जनावरे तिथे दबकत दबकत येतात. तहानमरीच्या पाणपसाऱ्यावर थंडीची पांढरीशुभ्र दुलई पसरली होती. समोरील अर्जुनाच्या ढोलीत धनछडीच्या जोडीने केलेला खोपा अद्याप दिसत नव्हता. रानपिंपळाच्या वरच्या खोबणीत काल सांजेला मावळतीआधी अर्धा कलाक एका शेकरुचे मुस्कट दिसले होते. आज पुन्हा ते त्याच वेळेला दिसणार! 

आज 29 जुलै...आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन..! मनाला बरे वाटले. भारतात आजमितीस चारेक हजार वाघ शिल्लक उरले आहेत. ह्या बहुतेक वाघांचे फोटो मी काढले आहेत, याचा अभिमान वाटतो. वन छायाचित्रकाराचे काम सोपे नसते. दिवसेंदिवस रानात तळ ठोकून राहावे लागते, तेव्हा कुठे पुरस्कारप्राप्त छायाचित्रे मिळतात. जिवावर उदार होऊन मी अनेकदा फोटो मिळवले आहेत. मेळघाटच्या जंगलात मी समोरून वाघाचा फोटो काढत असताना पाठीमागून आलेले रानडुक्‍कर मला दिसले नव्हते. त्यानंतर सहा महिने मी पासपोर्ट साइज फोटो काढून घालवले. असू दे. जंगलात असले प्रकार होणारच. मुके बिचारे वन्यजीव ते...त्यांना काय कळते? 

मी जागतिक कीर्तीचा वन छायाचित्रकार आहे. वाघांचे फोटो काढून काढून मी इतका सरावलो आहे की अनेक जंगलातील वाघ खास माझ्याकडून फोटो काढून घेण्यासाठी अंगावरचे पट्टे बदलून घेतात! ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील "एसेस-2' नावाच्या वाघाने गळ्यात कॉलर घालून घेण्यास नकार दिला होता. म्हणाला : ही असली गुलामी मी पत्करणार नाही. गेल्या खेपेला क्‍यानालमध्ये पडून माझी कॉलर भिजली, त्यात माझा काय दोष? कुणीही मला क्‍यानालबाहेर ओढायलाही आले नाही...कॉलर गेली उडत! पण मीच अखेर "हे शिवबंधन आहे, मुकाट्याने बांधून घे' असा आदेश देऊन एक कॉलर त्याच्या गळ्यात मारली! वाघांची संख्या वाढवण्यासाठी मी अनेक प्रयत्न केले. (मुनगंटीवार नामक एक वनअधिकारी त्याचे श्रेय लाटतात...हा लुच्चेपणा आहे!) सारांश एवढाच की वाघांमध्ये माझी चांगली उठबस आहे!! 

रातव्याची "टिटिर टिटिर' ऐकतच तंबूच्या डाव्या बगलेत असलेल्या झुडुपामागे गेलो. सातबायांचा कल्लोळ अजून सुरू झाला नव्हता. चावळ घेत घेतच झुडपात गेलो....पाचेक मिनिटांतच परत आलो. त्या रानडुकराच्या मुसंडीच्या प्रसंगापासून मी फार सावध झालो आहे. वाघाची मला भीती वाटत नाही. वाघाच्या जबड्यात हात घालून "तुझी डावीकडची दाढ किती किडलीये बघ' असे सांगायला मी कमी करत नाही. पण रानडुकरे आणि रानगवे हे अतिशय बेभरवशी आहेत. एक तर ह्या प्राण्यांचे फोटो चांगले येत नाहीत. मी त्यांचे फोटो आधारकार्डावर असतात तसे काढतो अशी त्यांची तक्रार आहे. मरोत! मला काय त्याचे? तीन दगड मांडून चहाची किटली आगटीवर ठेवली. चहा प्यावा की नको? चहा प्यायले की पुन्हा झुडपामागे रानडुक्‍कर...जाऊ दे. 

...इतक्‍यात वानराने "खर्र खक खक' असा कडका दिला. पाणवठ्यावर आलेला हरिणांचा कळप सावध झाला. त्यातील अल्फा नराने चटकन एक खुर उचलून चावळ घेतली. उजव्या बगलेतील नेपतीच्या कवटाळात काहीतरी पिवळे-काळे हलले. क्षणार्धात हरिणांचा कळप उधळला. वानरांच्या टोळीने भराभरा झाडांचे शेंडे गाठले. झुडपाआडून "एसेस-2' अवतीर्ण झाला. सोबत "मिसेस-2'देखील होत्या. आल्या आल्या पंजाने मुजरा करून तो म्हणाला : ""साहेब, हॅपी टायगर्स डे!!'' 
...मी खुश होऊन कॅमेरा उचलला. 

- ब्रिटिश नंदी 

Web Title: Pune Edition Editorial Article on Tiger Day