जिंदादिल अवलिया ! (श्रद्धांजली) 

जिंदादिल अवलिया ! (श्रद्धांजली) 

कोणाला 1980च्या दशकाच्या अखेरीस आलेल्या "सर्फ'च्या जाहिरातीतील "ललिताजी' आज आठवत असतील, तर कोणाच्या डोळ्यांपुढे त्यापाठोपाठ आलेल्या "एमआरएफ टायर्स'च्या जाहिरातीतल "मसलमॅन' उभा असेल! "कामसूत्र'च्या जाहिरातीतील पूजा बेदी आजही अनेकांच्या काळजाचा ठोका चुकवून जात असणार. आज तीन- साडेतीन दशकांनंतरही मनात रुंजी घालणाऱ्या या जाहिराती अलेक पदमसी यांनी साकार केल्या होत्या, हे मात्र फारच थोड्यांना ठाऊक असेल.

शनिवारच्या पहाटे जगाच्या रंगभूमीवरून "एक्‍झिट' घेणाऱ्या पदमसी यांनी जाहिरात, नाट्य आणि चित्रपट अशी तिन्ही क्षेत्रे गेली जवळपास चार दशके दणाणून सोडली होती. गुजरातच्या कच्छ परिसरातील हे पदमसी कुटुंब कलाक्षेत्राला एकापेक्षा एक कलाकारांची देणगी देऊन गेले. प्रख्यात चित्रकार अकबर पदमसी हे अलेक यांचे एक बंधू, तर त्यांचेच दुसरे बंधू सुलतान बॉबी हे मोठे नाट्य दिग्दर्शक होते. मात्र, या सर्वांपेक्षा अलेक हे वेगळे होते; कारण या अवलियाने कलेच्या विविध क्षेत्रांत लीलया संचार केला. जाहिरातबाजी हे तर त्यांचे "होम पीच'च होते. मात्र, त्याचबरोबर अल्काझी आणि सुलतान पदमसी यांच्याकडून नाट्यक्षेत्राचे धडे घेतलेल्या अलेक यांनी तुघलक, जीझस ख्राइस्ट सुपरस्टार, एविटा अशा एकापेक्षा एक सरस कलाकृती रंगभूमीवर साकार केल्या. "तुघलक' या आपल्या गाजलेल्या नाटकावर त्यांनी चित्रपटही बनवायला घेतला होता आणि त्यात मुख्य भूमिका अमिताभ बच्चन करत होते. मात्र, "कुली' सिनेमाच्या चित्रीकरणात अमिताभ जबर जखमी झाल्यानंतर तो चित्रपट आधा-अधुराच राहिला.

ऍटनबरो यांच्या "गांधी' या ख्यातकीर्त चित्रपटातील कायदेआझम महमद अली जीनांची भूमिका त्यांनी साकारली. जाहिरात उत्तम करावयाची असेल, तर त्या क्षेत्रातील प्रत्येकाने रंगभूमी म्हणजे काय ते शिकायलाच हवे, असे त्यांचे म्हणणे असे... आणि त्यांच्या रंगभूमीवरील अमीट ठशामुळेच स्टीव्हन स्पीलबर्गसारख्या महान दिग्दर्शकाला आपल्या "इंडियाना जोन्स' आणि "द टेम्पल ऑफ डूम' या सिनेमांत अलेक यांनी काम करावे, असे वाटत होते.

मात्र, स्वत: पदमसी यांना त्या भूमिका "रबिश' वाटल्या आणि स्पीलबर्गला नकार देऊन ते मोकळे झाले! अनेक पुरस्कारांनी गौरवले गेलेले अलेक 87 व्या वर्षीही उत्साहाने सळसळलेले असत. ते आता आपल्यात नसले तरी त्यांच्या कल्पक जाहिराती आणि त्यांचे कलासंपन्न आयुष्य दीर्घकाळ स्मरणात राहील.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com