भारतीय क्रिकेट प्रकाशमान करणारा तारा

चंदू बोर्डे
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

अजित डावखुरा होता. त्यामुळे त्याची शैली नेत्रसुखद असायची. तो संघाची गरज आणि सामन्यातील परिस्थितीनुसार खेळायचा. आक्रमक फटकेबाजीप्रमाणेच किल्ला लढविण्याची क्षमताही त्याच्याकडे होती. पुढे निवड समितीचे अध्यक्ष आणि संघव्यवस्थापक म्हणून अजितने अनेक खेळाडूंना संधी दिली.

अजित वाडेकरविषयी कर्णधार, फलंदाज, पदाधिकारी आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे व्यक्ती म्हणून खूप काही बोलावेसे वाटते. त्याच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिजमध्ये आपल्या संघाने कसोटी मालिका जिंकून पराक्रम केला. विजयी संघाचे मुंबईत जंगी स्वागत करण्यात आले. विमानतळापासून "सीसीआय'पर्यंत उघड्या मोटारीतून मिरवणूक काढण्यात आली. ठिकठिकाणी संघाचे उत्स्फूर्त स्वागत झाले. तेव्हा मुंबईसह देशभर झालेल्या जल्लोषामुळे भारतीय क्रिकेट प्रकाशमान झाले. मग इंग्लंडमध्ये अजितच्या नेतृत्वाखाली संघाने पराक्रम केला, तेव्हा तर भारतीय क्रिकेटमध्ये बहार आली ! या दोन्ही विजयांमुळे भारतीय क्रिकेटची प्रतिष्ठा उंचावली. चाहत्यांचा क्रिकेटकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. त्या वेळी या दोन्ही देशांत जिंकणे कर्मकठीण मानले जायचे. अजितसारख्या बुद्धिमान कर्णधारामुळे हे यश साकार झाले. 

अजित डावखुरा होता. त्यामुळे त्याची शैली नेत्रसुखद असायची. तो संघाची गरज आणि सामन्यातील परिस्थितीनुसार खेळायचा. आक्रमक फटकेबाजीप्रमाणेच किल्ला लढविण्याची क्षमताही त्याच्याकडे होती. पुढे निवड समितीचे अध्यक्ष आणि संघव्यवस्थापक म्हणून अजितने अनेक खेळाडूंना संधी दिली. भारतीय क्रिकेटला विजयाची मालिका साकारण्याची सवय त्याने लावली. त्याच्या मार्गदर्शनाखाली अनेक खेळाडूंची जडणघडण झाली. अजितचे हे योगदान विसरता येणार नाही. 
अजितशी माझी चांगली मैत्री होती. तसा तो काहीसा मितभाषी, पण मिश्‍किल स्वभावाचा.

गप्पा सुरू असताना तो मध्येच एखादा विनोद करायचा आणि सर्वांची हसून हसून पुरेवाट व्हायची. बऱ्याचदा आम्ही एकमेकांची चेष्टामस्करी करायचो. तो म्हणायचा, की तुमच्या पुण्यात बटाटेवडा आणि कांदा पोहे सोडून आहे तरी काय...' त्यावर मी म्हणायचो, की अरे, तुला काय कळणार पुणेकरांच्या आवडीनिवडी? आम्ही पुणेकर अगदी नाटकांचेही शौकीन असतो. तू तर लेकाच्या नाटक सुरू झालं की झोपतोस... यावर हार मानेल तो अजित कसला? तो म्हणायचा, "अरे, डोळे मिटले की एकाग्रता चांगली साधली जाते. तुम्हाला वाटते मी झोपलोय, पण मी सगळे ऐकत असतो.' त्याच्या या वाक्‍यावर मी हसून टाळी द्यायचो आणि आम्ही पुन्हा हास्यात बुडायचो. 

माझ्या पंचाहत्तरीचा कार्यक्रम पुण्यात झाला त्या वेळी मुंबईहून बापू नाडकर्णी, सचिन तेंडुलकर यांच्यासह अजितही आला होता. त्याने भरभरून शुभेच्छा दिल्या. अगदी अलीकडेपर्यंत आम्ही फोनवर नेहमी गप्पा मारायचो. अजितची "इनिंग्ज' अचानक संपली असे वाटते. त्याच्या जाण्याने एक चांगला मित्र गमावल्याचे दुःख आहे. 

(शब्दांकन : मुकुंद पोतदार) 
 

Web Title: Pune Edition Editorial on Cricket