शिकार ! (ढिंगटांग !) 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 नोव्हेंबर 2018

प्रिय मा. सुधीरभाऊ, यवतमाळमधली पांढरकवड्याची टी-वन वाघीण ऊर्फ अवनी हिला शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजता झोपेत गोळी घालून ठार करण्याचे कारण काय? ह्याचे अठ्‌ठेचाळीस तासात उत्तर देणे. मुक्‍या बिचाऱ्या वन्यजीवाला असे विश्‍वासघाताने ठार मारून काय साधलेत? असा सवाल प्राणीप्रेमी संघटना करू लागल्या आहेत. ह्या बनावट एन्काउण्टरची चौकशी करण्याचे आदेश काढण्याची बाब सध्या (आमच्या) विचाराधीन आहे. वनखाते तुमच्याकडे आहे, त्यामुळे ह्या एन्काउण्टरची जबाबदारी अंतिमत: तुमच्यावर येते. समाधानकारक उत्तर न मिळाल्यास येत्या दिवाळीनंतर मंत्रिमंडळात खातेपालट होण्याची शक्‍यता आहे, हे ध्यानी घ्यावे.

प्रिय मा. सुधीरभाऊ, यवतमाळमधली पांढरकवड्याची टी-वन वाघीण ऊर्फ अवनी हिला शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजता झोपेत गोळी घालून ठार करण्याचे कारण काय? ह्याचे अठ्‌ठेचाळीस तासात उत्तर देणे. मुक्‍या बिचाऱ्या वन्यजीवाला असे विश्‍वासघाताने ठार मारून काय साधलेत? असा सवाल प्राणीप्रेमी संघटना करू लागल्या आहेत. ह्या बनावट एन्काउण्टरची चौकशी करण्याचे आदेश काढण्याची बाब सध्या (आमच्या) विचाराधीन आहे. वनखाते तुमच्याकडे आहे, त्यामुळे ह्या एन्काउण्टरची जबाबदारी अंतिमत: तुमच्यावर येते. समाधानकारक उत्तर न मिळाल्यास येत्या दिवाळीनंतर मंत्रिमंडळात खातेपालट होण्याची शक्‍यता आहे, हे ध्यानी घ्यावे. तेव्हा तांतडीने अहवाल द्यावा. कळावे. नाना फडणवीस. 
* * * 

प्रिय.आ. मा. ना. नानासाहेब, तुमची नोटीस मिळाली. आभार! सदर टी-वन वाघिणीचा बनावट चकमकीत मृत्यू झाला, ही बाब खरी नाही, हे मी निक्षून सांगतो. किंबहुना, वनखात्याच्या ह्या कामगिरीसाठी मला एखादे शौर्यपदक द्यावे, अशी शिफारस करणारे बनावट पत्र मीच लिहून तुमच्याकडे धाडणार होतो. गेल्या कित्येक वर्षात महाराष्ट्रात वाघाची (अधिकृत) शिकार झालेली नाही. कारण वाघच शिल्लक उरले नव्हते. आमच्या वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी जंगलात फिरून फिरून वाघांची संख्या वाढवली व शिकार करण्यापुरते वाघ निर्माण झाले, ही वस्तुस्थिती आहे. 

वनखात्याचा प्रमुख म्हणून मी ह्या संपूर्ण मिशनवर लक्ष ठेवून होतो. सदर वाघीण नरभक्षक झाली होती व तिला जेरबंद करण्यासाठी हर तऱ्हेचे प्रयत्न गेले काही महिने सुरू होते. यवतमाळ, पांढरकवडा, राळगावच्या जंगलात सदर वाघीण हिंडत होती. वन अधिकाऱ्यांनी खूप पायपीट केली. शिकारी नेमले. शिकारी कुत्रीदेखील आणली, पण त्या कुत्र्यांना रोज मुर्गी लागते हे ऐकल्यावर त्यांना "हाड' करण्यात आले. अखेरचा उपाय म्हणून आपले जळगाववाले गिरीशभाऊ महाजन ह्यांना पाठवण्याची तयारीही केली होती. त्यांच्याकडे पिस्तूल आहे! 
इतके प्रयत्न करूनही ती पठ्‌ठी गुंगारा द्यायची. गुंगारा देऊन मधल्या काळात तिने दोन बछडीदेखील जन्माला घातली...आता बोला! हे काय वागणे झाले? शुक्रवारी रात्री सदर वाघीण झुडपात लोळत पडलेली दिसली.

रात्री साडेअकराला सहसा लोक आडवे पडतात, पण झोपत नाहीत. सदर वाघिणीला गुंगीचे औषध असलेला डार्ट मारण्यात आला. तो तिच्या पार्श्‍वभागावर लागला. त्यामुळे ती खवळली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. बेसावध असताना कुणीही असे (पार्श्‍वभागाला) टोचले तर डोके फिरणारच. "तुमच्या मारी ***...' अशी शिवीगाळ करत तिने संताप व्यक्‍त केला. मग तिला शरण येण्याचा आदेश देण्यात आला.- 

"पुलिसने तुमकू चारो तरफ से घेर लिया है, अब तुम भाग नही सकती. बऱ्या बोलाने शरण आव!' असे भोंग्यावरून सांगण्यात आले. पण वाघिणीने उलट गोळीबार केल्याने शिकारी नबाब अजगर अली ह्यांनी तांतडीने बंदूक उचलली. त्यांना हवेत गोळीबार करायचा होता, पण बंदूक त्यांच्या कमरेच्या पट्ट्यात अडकून ते साफ खाली पडले. भूमीला समांतर अशा अवस्थेतच ते असताना बंदुकीचा चाप ओढला जाऊन गोळी सुटली व वाघिणीच्या वर्मी बसली. अतएव स्वसंरक्षणार्थ तिच्यावर गोळ्या झाडाव्या लागल्या, असेच म्हणावे लागेल.

टीवन वाघिणीला ठार मारण्याचा वनखात्याचा अजिबात हेतू नव्हता. ही चकमक बनावट तर बिलकुल नव्हती. ह्या चकमकीत अनेक वन अधिकारी धडपडून जखमी झाले असून वेगाने धावल्यामुळे काही जणांच्या पायाला फोड आले आहेत. आपण वाघ मारला, ह्या कल्पनेने हादरून गेलेले शिकारी शॉक खाऊन हैदराबादेत परत गेले आहेत. ह्याउप्पर ही चकमक बनावट होती की खरीखुरी, हे तुम्हीच ठरवा! कळावे. आपला नम्र. सुधीर्जी. (चंद्रपूरचा वाघ) 

- ब्रिटिश नंदी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Edition Editorial Dhing Tang