वृक्षाधार (पहाटपावलं)

डॉ. श्रीकांत चोरघडे 
सोमवार, 15 एप्रिल 2019

तब्बल 107 वर्षांच्या थिमक्का यांना यंदा राष्ट्रपतींच्या हस्ते "पद्मश्री' सन्मानाने गौरविण्यात आलं.

तब्बल 107 वर्षांच्या थिमक्का यांना यंदा राष्ट्रपतींच्या हस्ते "पद्मश्री' सन्मानाने गौरविण्यात आलं. थिमक्कांनी चालत जात राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान स्वीकारला आणि शिरस्ता सोडून राष्ट्रपतींनी त्यांचे आशीर्वाद घेतले. थिमक्कांचा जीवनपट अद्‌भुत आहे. घरी अठराविश्‍वे दारिद्य्र असलेली, मोलमजुरी करणारी ही स्त्री "पद्मश्री'पर्यंत कशी पोचली? सगळंच अतर्क्‍य व कल्पनेपलीकडचं! त्यांचं नाव अलादा मरादा थिमक्का. जन्म, बालपण कर्नाटकातील हळीकुल या गावात गेलं.

लहानपणीच लग्न झालं. नवरा गरीब असला, तरी मेहनती होता. संसार सुखाचा होता. पण चाळिशी आली तरी संतानप्राप्ती नव्हती. आई न होण्याचं दुःख तर होतंच; पण सासरच्या मंडळींच्या टोचून बोलण्यामुळं त्या व्यथित झाल्या. त्यातून एक दिवस त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. नवऱ्यानं त्यांना समजावलं. हे दुःख विसरण्यासाठी या दाम्पत्यानं वृक्षारोपणाचा संकल्प केला. गेल्या 80 वर्षांपासून हा उपक्रम सुरू असून, या काळात त्यांनी वडाची 385 झाडं लावली व जगवली आहेत. हळीकुल ते कुडूर रस्त्यावर त्यांनी दोन्ही बाजूंना वृक्ष लावले. पोटच्या मुलांची काळजी घ्यावी तशी रोपं लावून ती जगवली. पतीच्या निधनानंतरही एक व्रत म्हणून हा उपक्रम थिमक्कांनी सुरू ठेवला. गावकऱ्यांनी त्यांनी "साजूमरादा' म्हणजे "झाडांची रांग' अशी उपाधी दिली आहे. त्यांनी आतापर्यंत सुमारे आठ हजार वृक्षांची लागवड केली आहे. दोन वर्षांपूर्वी त्यांना जगातील अतिविशेष शंभर महिलांमध्ये स्थान दिले गेले. याशिवाय 1995 मध्ये "नॅशनल सिटिझन' पुरस्कार, 1997 मध्ये प्रियदर्शिनी व वीरचक्र पुरस्कार, 2016 मध्ये तस्पवल्ली पुरस्कार आणि 2010मध्ये फिलिप्स प्रेमी पुरस्कार देऊन थिमक्कांचा गौरव करण्यात आला. 

"आर्ट ऑफ लिव्हिंग'चे पुरस्कर्ते श्री श्री रविशंकर यांनी थिमक्कांचा सत्कार केला व हॅपी विश्‍वविद्यालयानेसुद्धा त्यांना सन्मानित केले. इतके विविध पुरस्कार मिळविणाऱ्या थिमक्का "पद्मश्री' सन्मान स्वीकारण्यासाठी साधी सुती साडी नेसून, अनवाणी पायाने गेल्या. आजही वयाच्या 107 वर्षी वृक्षलागवडीचा त्यांचा उपक्रम सुरू आहे. मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत असताना या आर्थिकदृष्ट्या दुर्बल व अल्पशिक्षित महिलेने आपल्या गावाचा परिसर स्वकष्टाने हिरवागार केला आहे. मी शाळेत एक श्‍लोक उदाहरणादाखल सांगितला जात असे. एका भिकाऱ्याने राजाला उद्देशून म्हटलेला हा श्‍लोक. 

अहं च त्वं च राजेंद्र लोकनार्थो उभौ अपि। 
बहुव्रीही अहं राजन वल्ली तत्पुरुषो भवान।। 

थिमक्कावरून हे आठवायचं कारण म्हणजे थिमक्का म्हणजे "वृक्षाचा आधार' आहे. त्या अर्थानं ती वृक्षाधार आहे आणि आपण सर्व वृक्षाधार आहोत ते वेगळ्या अर्थानं. वृक्ष ज्यांचे आधार आहेत असे आपण सर्व. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Edition Pahatpawal Article