‘राहुल चमू’समोर मोठे आव्हान

‘राहुल चमू’समोर मोठे आव्हान

सोमवार, 12 जून 2017

भारतीय राज्यघटनेने जी मूल्ये स्थापित केलेली आहेत ती संकटात आल्यासारखी किंवा त्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाल्यासारखी परिस्थिती सध्या आहे, यात शंका नाही. शंका एवढीच की काँग्रेस अध्यक्षांनी या परिस्थितीला सामोरे जाण्याचे जे आवाहन पक्षजनांना केले आहे, त्याचा अर्थ समजण्याइतकी बौद्धिक कुवत, आकलनशक्ती पक्षातील नव्या नेत्यांकडे आहे का?

अनेक महिन्यांनंतर काँग्रेस कार्यकारिणीची अलीकडेच बैठक झाली. त्या बैठकीत बोलताना काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी ‘आयडिया ऑफ इंडिया’ म्हणजेच सर्वांच्या स्वप्नातल्या आदर्श भारताची संकल्पना संकटात असल्याचे निरीक्षण नोंदविले. उदारमतवादी, लोकशाही व धर्मनिरपेक्ष तत्त्वांच्या आधारे देश चालविण्याचे स्वप्न जतन करण्यासाठी आणि टिकविण्यासाठी २०१९च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने प्रयत्न पणास लावले पाहिजेत, असे आवाहनही त्यांनी केले. पक्षाध्यक्षा या नात्याने त्यांनी केलेल्या आवाहनात वावगे काहीच नाही. मात्र, याची गंभीरता समजण्याएवढी कुवत पक्षजनांकडे आहे का, याबाबत शंका आहे. ऑक्‍टोबर महिन्यात काँग्रेस अध्यक्षांची निवडणूक होईल. त्यावेळी राहुल गांधी विधिवत अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतील, अशी अपेक्षा आहे.

गेल्या काही काळातील पक्षातल्या घडामोडी पाहता सोनिया गांधी यांनी पक्ष संचालनाची जबाबदारी जवळपास राहुल गांधी यांच्याकडेच सोपविलेली दिसते. द्रमुकचे सर्वेसर्वा एम. करुणानिधी यांच्या वाढदिवसाला राहुल गांधी यांनीच काँग्रेसचे प्रतिनिधित्व केले. एवढेच नव्हे तर गुंटूरला त्यांनी इतर राजकीय पक्षांच्या साथीने एका संयुक्त विरोधी पक्षांच्या जाहीर सभेतही सहभाग घेतला. राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या ‘एकला चलो रे’ भूमिकेने राजकारणाची सुरवात केली होती. परंतु, पक्षाच्या पराभवाच्या मालिकेनंतर त्यांना वास्तवाची जाणीव झाली. त्यानंतर त्यांनी बिहार, पश्‍चिम बंगाल आणि आता उत्तर प्रदेशात आघाडीच्या संकल्पनेचा आधार घेण्यास सुरवात केली आहे. यापुढील काळात लोकशाही व धर्मनिरपेक्षतावादी शक्तींच्या मदतीनेच राजकारण करावे लागेल, हे त्यांनी ओळखले. आता ते विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये मिळूनमिसळून काम करू लागले आहेत.

राहुल गांधी यांनी समविचारी राजकीय पक्षांच्या नेत्यांबरोबर चांगल्या रीतीने संबंध प्रस्थापित केले हे खरे असले, तरी त्यांनी स्वतःच्याच पक्षातल्या नेत्यांबरोबर कितपत चांगले संबंध राखले आहेत हे पाहावे लागेल. पक्षाची सूत्रे ते हाती घेण्याच्या हालचाली सुरू झाल्यानंतर पक्षात पिढीबदल आणि त्यातून अपरिहार्यपणे होणारा जुने आणि नवे संघर्ष उफाळून येणे स्वाभाविक आहे. काँग्रेस कार्यकारिणीची बैठक संपल्यानंतर तिची माहिती माध्यम प्रतिनिधींना देण्यासाठी राहुल गांधी यांनीच जावे, असा प्रस्ताव काहींनी मांडताच पक्षातल्या जुन्यांनी ती कल्पना हाणून पाडली. बैठकीत राहुल गांधी लोकांशी अधिकाधिक जवळीक प्रस्थापित करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्याचा मुद्दा मांडला. दुर्दैवाने जुनाट खोडांनी बैठक संपता संपताच त्यांना तोंडघशी पाडले.

पेशवाईत ‘बारभाईंनी’ सवाई माधवराव लहान असल्याने त्यांच्या नावाने राज्य कारभार चालविण्याचा प्रकार केला होता. तसाच काहीसा प्रकार काँग्रेसमध्ये बघायला मिळत आहे. राहुल गांधी आणि त्यांचा ‘चमू’ या जुनाट मंडळींना जुमानेनासा झाला आहे. त्यामुळेच सध्या काँग्रेस महासमितीच्या कार्यालयात विनोदी वातावरण पाहण्यास मिळते. पक्षसंघटनेतील नव्या नेमणुकांची घोषणा करण्यावरूनदेखील वादंग होताना दिसतो. अगदी अलीकडेच ‘राहुल चमू’तील बिनीचे पदाधिकारी रणदीप सुरजेवाला यांनी प्रमुख पक्षप्रवक्ते या नात्याने हाताने एका कागदावर लिहून आणलेल्या नेमणुकांची नावे पत्रकारांना वाचून दाखवली. यानंतर पक्षाचे रीतसर परिपत्रक तयार करण्यात आले आणि संघटनेची जबाबदारी असलेल्या जुन्याजाणत्या सरचिटणीसांकडे ते सहीसाठी पाठविण्यात आले. ते एवढे संतापले की त्यांनी त्यावर सही करण्यास नकार दिला. असे अनेक किस्से सांगता येतील. काँग्रेसमध्ये या पिढीबदलाचा झटका बसणार आहे ते अस्वस्थ आहेत आणि त्याचा (गैर) फायदा ‘राहुल-चमू’तील मंडळी घेत आहेत. तात्पर्य हे की पक्षातील जुन्या मंडळींची नाराजी ‘राहुल-चमू’तील काही मंडळींच्या आचरणामुळे वाढत चालली आहे. अर्थात सोनिया गांधी यांचे राजकीय सचिव असलेल्या अहमद पटेल यांचे महत्त्व अद्याप टिकून आहे आणि त्यामुळे त्यांचे नव्या व्यवस्थेतील स्थानही कायम राहील, अशी दाट शक्‍यता आहे.

या पार्श्‍वभूमीवरच सोनिया गांधी यांनी आदर्श भारताची संकल्पना टिकवून धरण्याचे आव्हान पक्षापुढे असल्याचे निवेदन कार्यकारिणीच्या बैठकीत केले. ते पेलण्याची क्षमता या नव्या ‘राहुल चमू’कडे असेल काय, हा खरा प्रश्‍न आहे. भावी भारत कसा असला पाहिजे हे स्वप्न पंडित नेहरूंनी पाहिले आणि त्यासाठी त्यांना साथ देणारे सरदार पटेल, मौलाना आझाद आणि काँग्रेसचे अन्य दिग्गज नेते होते. हा वारसा इंदिरा गांधी यांच्यापर्यंत काही प्रमाणात टिकला; परंतु, त्यानंतर राजीव गांधी यांनी पक्षातल्या दलालांना बाहेर काढण्याच्या शुद्धीकरण मोहिमेअंतर्गत उपऱ्या, अ-राजकीय आणि समाजाशी कोणताही थेट संबंध नसलेल्या तंत्रज्ञांचा भरणा पक्षात सुरू केला. समाजात कोणताही आधार नसलेल्या या बिगर-राजकीय लोकांनी स्वतःचे अस्तित्व टिकविण्यासाठी घराणेशाहीला आणखी जोराने प्रोत्साहन दिले. बारभाई संकल्पना राबविण्यास सुरवात केली. यात मूळ काँग्रेस, काँग्रेसच्या भूमिका आणि सोनिया गांधी म्हणाल्या त्याप्रमाणे ‘आयडिया ऑफ इंडिया’ यांचा चक्काचूर झाला. यामुळे भारतीय समाजात एक व्यापक उदारमतवादी वर्ग तयार करण्याची ऐतिहासिक जबाबदारी काँग्रेस संघटना पार पाडत असे ती प्रक्रिया थांबली. त्याची जागा आक्रमक व धार्मिक ध्रुवीकरणाच्या आधारे मते मागणाऱ्या शक्तींनी घेतली आणि त्या शक्ती फोफावून त्यांनी काँग्रेसला भुईसपाट करण्याचे प्रयत्न चालू केले. या आव्हानाचा मुकाबला करण्याची क्षमता ‘राहूल चमू’कडे आहे काय? उत्तरासाठी प्रतीक्षा करू!

Web Title: rahul gandhi congress bhp rahul team marathi news