raj thackeray in support of bjp lok sabha election politics
raj thackeray in support of bjp lok sabha election politicsSakal

ढिंग टांग : पाच अपेक्षांचे ओझे..!

प्रारंभी वंदनीय नमोजीभाईंचा थोडा गैरसमज झाला. ते बुचकळ्यात पडले होते. दोन दिवसांपूर्वीच घाटकोपरला झालेल्या रोड शोला लाखोंची गर्दी बघून ते उत्साहाने फुलले होते.

महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचे कंकण हाती बांधलेले, अखिल मऱ्हाटी तरुणहृदयसम्राट श्रीमान राजेसाहेब यांसी शतप्रतिशत प्रणाम. शिवाजी पार्कवरली सभा प्रचंड गाजते आहे. तुमच्या पाच मिनिटांच्या भाषणाचे पडसाद दिल्लीपर्यंत उमटले. अभिनंदन! पार्कावरील गर्दी बघून आमचे वंदनीय नमोजीभाई भयंकर खुश झाले होते.

गर्दी बघूनच त्यांनी ऐतिहासिक उद्गार काढले, ते सुवर्णाक्षरांनी कोरुन ठेवण्याजोगे आहेत. गर्दीकडे बघून हसत त्यांनी टाळी वाजवली आणि म्हणाले : ‘‘पती गयो! हवे तो घमंडिया अग्घाडीना सूपडा साफ थईश!! ’’ तुम्हाला सांगतो, कृतकृत्यतेने माझ्या गळ्यात हुंदका दाटून आला होता.

प्रारंभी वंदनीय नमोजीभाईंचा थोडा गैरसमज झाला. ते बुचकळ्यात पडले होते. दोन दिवसांपूर्वीच घाटकोपरला झालेल्या रोड शोला लाखोंची गर्दी बघून ते उत्साहाने फुलले होते. त्यानंतर अठ्ठेचाळीस तास उलटण्याच्या आतच पुन्हा लाखोंची गर्दी बघण्याची वेळ आली!! मुंबईकर आपल्यासाठी एवढे का जमताहेत, हेच त्यांना कळेना. शेवटी मीच मनाचा हिय्या करुन ही गर्दी राजेसाहेबांसाठी आहे, असे सांगून टाकले. त्यांना बहुधा ते ऐकूच आले नाही!! असो.

राजेसाहेब, तुम्ही तुमच्या पाच मिनिटांच्या भाषणात पाच अपेक्षा वंदनीय नमोजीभाईंना सांगितल्या. असे का केलेत? माझ्याकडे चिठ्ठी दिली असती, तरी मी गपचूप त्यांच्याकडे पोचवली असती. तुमच्या मागण्यांमुळे दिल्लीत ‘पीएमओ’मध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

या मागण्या पूर्ण केल्या तर बाकीच्या राज्यांचे (विशेषत: गुजरातचे) काय करायचे, असा राष्ट्रीय प्रश्न पडला आहे. तरीही वंदनीय नमोजीभाई काहीतरी करतीलच, काळजी करु नये. आणखीही काही मागण्या असल्या तरी हरकत नाही.

माझ्याकडे चिठ्ठी द्या, मी नेऊन देईन. पण चिठ्ठी माझ्याकडेच द्यावी ही विनंती. आमचे आशिषराव शेलारमामा मागतील, किंवा वीर विनोद तावडेजीही मागतील, त्यांच्या हातात मुळीच देऊ नये!! बाकी आता भेटी वारंवार होतीलच. लौकरच भेटू. उत्तराची(ही) अपेक्षा आहे!!

कळावे

आपला नवाकोरा मित्र

नानासाहेब फ.

मा. ना. नानासाहेब, जय महाराष्ट्र!

तुमची चिठ्ठी मिळाली. मजकूर वाचून कपाळाला हात लावला. सात अपेक्षा व्यक्त केल्या, तर ‘पीएमओ’त खळबळ झाल्याचे समजले. अशाने पुढे काय होईल, याची चिंता वाटू लागली आहे. माझ्याकडे खरे तर एकोणसत्तर अपेक्षा लिहून तयार आहेत. त्यातल्या सात फक्त परवाच्या सभेत सांगितल्या.

अपेक्षांची यादी मी तुमच्या वंदनीय नमोजीभाईंना सभेतच दिली होती. गुलाबांचा पुष्पगुच्छ दिला, तेव्हाच त्यांच्या डाव्या हातात सरकवली होती. पण त्यांनी ती यादी पुष्पगुच्छासोबत सुरक्षारक्षकाकडे देऊन टाकली असणार. माझ्या भाषणानंतर त्यांचे भाषण झाले, त्यात अपेक्षांचा उल्लेखही नव्हता. आमचे महाराष्ट्र सैनिक फार अस्वस्थ झाले.

तुमचे श्री. शेलारमामा आणि वीर विनोदजी या दोघांना मी अपेक्षांच्या यादीची एकेक फोटोकॉपी अगोदरच देऊन ठेवली आहे. दोघांनीही ‘काही काळजी करु नका, योग्य ठिकाणी पोचवतो,’असे आश्वासन दिले आहे. शिवाय हेदेखील सांगितले की, ही यादी नानासाहेबांच्या हाती लागू देऊ नका म्हणून! अशा परिस्थितीत मी काय करावे?

गर्दीचे मला विशेष काही वाटत नाही. गर्दी नेहमीचीच! पण शिंचे टाळ्या वाजवतात, पण एक जण मत देईल तर शपथ!! त्यांनी आपल्याला मते द्यावीत, यासाठी नेमके काय करायला हवे, हे मला तुमच्या वंदनीय नमोजीभाईंकडून जाणून घ्यायचे आहे. थोडक्यात, आमचे बंद पडलेले इंजिन चालू होण्यासाठी त्याला विजेची मोटार बसवायची आहे. बाकी बासष्ट अपेक्षांची यादी पाठवत आहे. भेटीअंती बोलूच.

कळावे

आपला

साहेब (शिवाजी पार्क)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com