शिल्पकलेतील भीष्माचार्य

शिल्पकलेतील भीष्माचार्य

ऐन तारुण्यात अजिंठा-वेरुळ येथील नितांतसुंदर शिल्पांच्या डागडुजीचे काम करताना राम सुतार यांच्या कलात्मकतेचा कस लागला. पुढे भारताच्या उज्ज्वल इतिहासाला स्मारकशिल्पांतून जिवंत करणारे शिल्पकार ही ओळख बनण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास विलक्षण प्रेरणादायी आहे. प्रचंड आकाराच्या शिल्पांइतकीच उंच कारकीर्द राहिलेले आणि देशभरातील अनेक शिल्पकार ज्यांना गुरुस्थानी मानतात, असे राम सुतार गुजरातेतील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अद्‌भुत शिल्पाकृतीमुळे चर्चेचा विषय बनलेच होते. जवाहरलाल नेहरू यांच्या काळापासून राम सुतार यांनी आपल्या शिल्पकलेचा ठसा राजधानीपर्यंत ठसठशीत उमटविला आणि गेली साठ वर्षे तो अबाधित राहिला. त्यांच्या कर्तृत्वावर केंद्रीय सांस्कृतिक खात्याने २०१६ या वर्षासाठीच्या ‘रवींद्रनाथ टागोर संस्कृती पुरस्कारा’ची घोषणा करून सुवर्णमोहोर उमटविली आहे.

संसद भवनाच्या आवारातील महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मौलाना आझाद, इंदिरा गांधी, गोविंदवल्लभ पंत, बाबू जगजीवनराम, राजीव गांधी यांचे भव्य पुतळे राम सुतार यांनीच घडविले आहेत. जपानची राजधानी टोकिओमधील रवींद्रनाथ टागोर यांच्या पुतळ्याचे जनकत्वही सुतारांकडेच जाते. त्यांच्याच स्टुडिओत बनलेले महात्मा गांधी यांचे अर्धपुतळे भारत सरकारमार्फत कित्येक देशांना भेट म्हणून दिले जातात. केवळ पुतळे बनविणारे शिल्पकार हीच त्यांची ओळख नाही, तर पुतळ्यांबरोबरच त्या महापुरुषांच्या जीवनप्रसंगांचे भित्तिचित्रण करून उभारलेली स्मारकेही अतिशय प्रेरणादायी ठरली आहेत. ज्यांचा जीवनपट समजावून घेण्यासाठी अख्खा ग्रंथ वाचावा लागेल, त्या थोरामोठ्यांच्या जीवनातील प्रसंगांचे मनोवेधक दर्शन घडविणारी भित्तिशिल्पे घडविणे, हेही सुतार यांचे वैशिष्ट्य. चंबळ नदीवरील गांधीसागर धरणाजवळचे ‘चंबळा आणि तिला बिलगलेल्या दोन बालकां’चे शिल्प या धरणाचे वरदान लाभलेल्या मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यांचे प्रतीक म्हणून त्यांनी उभे केले, तेव्हा भारतीय परंपरेतील एक आदर्श शिल्प म्हणून देशभर त्याचा गौरव झाला. गंगा आणि यमुना, हरिजन आणि गांधी ही त्यांची शिल्पेही नावाजली गेली. अरबी समुद्रातील शिवस्मारक, इंदू मिलचे प्रस्तावित डॉ. आंबेडकर स्मारक आणि सरदार पटेल यांचा गुजरातेतील पुतळा आदी शिल्पकृती त्यांच्याच संकल्पनेतून साकारत आहेत. अर्धे शतक दिल्लीत गेलेल्या मूळच्या धुळे जिल्ह्यातल्या आणि मुंबईच्या जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये शिकलेल्या पद्मविभूषण राम सुतार यांचा म्हणूनच महाराष्ट्राला अभिमान आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com