दहशतवादी मोकाट

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 जुलै 2016

बांगलादेशात जे हत्यासत्र सुरू आहे, त्यातून दहशतवाद्यांना मोकळे रान असल्यासारखी स्थिती आहे शेख हसीना सरकारचे गुळमुळीत आणि निष्क्रिय धोरणही हल्ले वाढण्यास कारणीभूत आहे. 

धार्मिक मूलतत्त्ववादाने पछाडलेले कट्टरपंथी मुस्लिम "रमजान‘च्या पवित्र महिन्याचाही अपवाद करायला तयार नाहीत, हे बांगलादेशात अतिरेक्‍यांनी घातलेल्या थैमानामुळे पुनश्‍च एकवार सिद्ध झाले आहे. रमजानच्या महिन्यात इस्तंबूलच्या विमानतळावरही हल्ला झाला होता आणि काश्‍मिरातही पाकिस्तानी घुसखोरांच्या कारवाया सुरू आहेत. इराकमध्ये शनिवारी दोन बॉंबस्फोट घडवून "इसिस‘च्या दहशतवाद्यांनी 82 जणांना ठार मारले. मात्र, ढाका येथे जे काही घडले, ते अंगावर शहारा आणणारे तर होतेच आणि तेथे एकेका निरपराध व्यक्तीला टिपून मारण्यात आले. मुंबईवर आठ वर्षांपूर्वी 26/11 रोजी झालेल्या भीषण हल्ल्याची आठवण करून देणारा हा हल्ला होता. शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास ढाक्‍यातील एका स्पॅनिश रेस्टॉरंटमध्ये शस्त्रास्त्रे आणि बॉंब यांनी सुसज्ज असलेले हे अर्धा डझन अतिरेकी घुसले आणि त्यांनी परदेशी नागरिकांना ओलीस धरले. मुंबईतही नरिमन पॉइंटवरच्या ट्रायडंट आणि ताजमहाल हॉटेलमध्ये घुसलेल्या अतिरेक्‍यांनी तेच केले होते. मात्र, मुंबईत एकाच वेळी अनेक ठिकाणी हल्ले झाले होते, तर बांगलादेशात "होली आर्टिझन बेकरी‘ या एकाच रेस्टॉरंटला अतिरेक्‍यांनी लक्ष्य केले होते. या सहाही अतिरेक्‍यांना कंठस्नान घालण्यात बांगलादेशच्या सुरक्षा यंत्रणांना यश आले असले तरी, या हल्ल्यात एका भारतीय युवतीसह 20 परदेशी नागरिकांना हकनाक प्राण गमवावे लागले. त्यामुळे जग एकीकडे शांततेच्या बाता करत असतानाही दहशतवाद कसा फोफावत चालला आहे, ते पुन्हा अधोरेखित झाले. 

बांगलादेशातील वातावरण सध्या किती असहिष्णू होत चालले आहे, ते गेल्या काही दिवसांत तेथे उदारमतवादी विचार मांडणाऱ्या ब्लॉगर्सच्या हत्यांमुळे दिसून येत होतेच. त्यातच ढाक्‍यात हा हल्ला झाला, त्याच दिवशी एक हिंदू पुजारी आणि एका बौद्धधर्मीयाची अतिरेक्‍यांनी अत्यंत अमानुष पद्धतीने हत्या केली होती. त्या हत्येची जबाबदारी "इसिस‘ने स्वीकारली असली तरी, या रेस्टॉरंटवरील भीषण हल्ल्याच्या मागे नक्की कोणती संघटना आहे, याबाबत गूढ निर्माण झाले आहे. कारण, "इसिस‘बरोबरच "अल कायदा‘ या संघटनेनेही ती जबाबदारी स्वीकारली आहे. बांगलादेशचे गृहमंत्री असादुझमान खान मात्र हा हल्ला "जमातेउल मुजाहिदीन बांगलादेश‘ या स्थानिक दहशतवाद्यांच्या गटाने केल्याचे सांगत आहेत, तर ढाक्‍याचे महापौर अनिसुल हक यांनी त्याबाबत "नरो वा कुंजरो वा‘ अशी भूमिका घेतली आहे. तरीही हल्लेखोरांनी ज्या काही मागण्या केल्या होत्या, त्यावरून यासंबंधातील अंदाज बांधता येतो. हा हल्ला "इसिस‘नेच केल्याचे सरकारने मान्य करावे, तसेच "जमातेउल मुजाहिदीन‘च्या दोन अतिरेक्‍यांची सुटका करावी, या त्यांच्या मागण्या बरेच काही सांगून जातात. गेल्या वर्षभरात "इसिस‘ तसेच अल कायदा यांनी बांगला देशात 30 निरपराध्यांची हत्या केली आहे आणि त्यामध्ये प्रामुख्याने उदारमतवादी, नास्तिक, विदेशी नागरिक, "गे‘ तसेच स्थानिक अल्पसख्याकांचा समावेश आहे. यावरून मुस्लिम कट्टरपंथीयांना नेमके काय हवे आहे, ते ठळकपणे सामोरे आले आहे. 

या पार्श्‍वभूमीवर तस्लिमा नसरीन यांनी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्यावर केलेल्या टीकेचा विचार करायला हवा. "इसिस‘ने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली असतानाही, शेख हसीना मात्र त्याकडे दुर्लक्ष करून, स्थानिक अतिरेकी संघटनांकडे बोट दाखवत आहेत, असे नसरीन यांनी म्हटले आहे. शेख हसीना या "इसिस‘ला थेट लक्ष्य करण्यास कचरत आहेत, हेच अप्रत्यक्षरीत्या सूचित झाले आहे. बांगलादेशात एकंदरीतच गेल्या दीड-दोन वर्षांत ज्या पद्धतीने असहिष्णुता वाढत चालली आहे, त्यासही शेख हसीना यांचे हेच गुळमुळीत धोरण कारणीभूत असल्याचा अर्थही अप्रत्यक्षपणे त्यातून निघू शकतो. त्यामुळे आता बांगलादेश सरकार तसेच व्यक्‍तिश: शेख हसीना यांना यासंदर्भात गांभीर्याने विचार करून काही कृतीही करावी लागेल. कुराणातील काही आयत येणाऱ्या आणि बंगाली भाषेतील स्थानिक बोली अस्खलित बोलता येणाऱ्या एक-दोघांची हल्लेखोरांनी सुटका केली. बाकीच्यांना अत्यंत क्रूरपणे ठार मारले. धर्माच्या आधाराने समाजाच्या चिरफाळ्या उडविण्याचा त्यांचा डाव यातून दिसतो. त्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची तयारी आहे, हे त्यांनी दाखवून दिले आहे. 

आता प्रश्‍न आहे तो शेख हसीना कोणत्या उपाययोजना करतात हा. त्या "राजधर्म‘ पाळतात की नाही, हा महत्त्वाचा प्रश्‍न आहे. अशा हल्ल्यांमध्ये कायमच बळी जाणाऱ्या सामान्य नागरिकांना हल्लेखोरांवर कठोर कारवाई होते की नाही, यात रस असतो. या हल्ल्यातील क्रौर्य पाहता बांगलादेशात गेल्या काही वर्षांत सुरू असलेल्या घटनांवरून सरकारने काहीच बोध घेतला नसल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे आता बांगलादेश सरकारला अत्यंत कठोरपणे आपल्याच देशातील कट्टरपंथीयांविरोधात "हल्लाबोल‘ करावा लागणार आहे. 

Web Title: Rising terror attacks in Bangladesh are dangerous for Asia