esakal | नायक ते खलनायक 
sakal

बोलून बातमी शोधा

Robert Mugabe Former Prime Minister of Zimbabwe

मूठभर श्वेतवर्णी वर्गाच्या हातातून सत्ता काढून घेणारा बंडखोरांचा नेता जनतेसाठी स्वातंत्र्याचा उद्गाता ठरला. मात्र, त्यानंतर या नेत्याचा प्रवास जनतेच्या स्वातंत्र्याचा गळा घोटण्यापर्यंत झाला. हा नेता होता रॉबर्ट मुगाबे. झिम्बाब्वेवर अनेक दशके सत्ता गाजविलेला हा नेता नुकताच काळाच्या पडद्याआड गेला. 

नायक ते खलनायक 

sakal_logo
By
संजय जाधव

मूठभर श्वेतवर्णी वर्गाच्या हातातून सत्ता काढून घेणारा बंडखोरांचा नेता जनतेसाठी स्वातंत्र्याचा उद्गाता ठरला. मात्र, त्यानंतर या नेत्याचा प्रवास जनतेच्या स्वातंत्र्याचा गळा घोटण्यापर्यंत झाला. हा नेता होता रॉबर्ट मुगाबे. झिम्बाब्वेवर अनेक दशके सत्ता गाजविलेला हा नेता नुकताच काळाच्या पडद्याआड गेला. 

वसाहतवादी ब्रिटिश राजवटीच्या जोखडातून झिम्बाब्वे मुक्त झाला आणि वसाहतोत्तर काळातील देशाचे पहिले नेते म्हणून रॉबर्ट मुगाबे यांनी सूत्रे हाती घेतली. सत्ता हाती आल्यानंतर त्यांनी श्‍वेतवर्णी कुटुंबांच्या जमिनी बळाचा वापर करून जप्त केल्या. यामुळे ते आफ्रिकेत नायक बनले. मात्र, पश्‍चिमेत खलनायकांमध्ये गणले जाऊ लागले. आयुष्यभर पाश्‍चात्त्य देशांच्या विरोधातील आपल्या भूमिकेवर ते ठाम राहिले. पाश्‍चात्त्य देशांचा नववसाहतवाद झुगारून आफ्रिकी देशांनी स्वतःची नैसर्गिक साधनसंपत्ती स्वतःच्या ताब्यात घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले होते. त्यांचे हे आवाहन लोकप्रिय ठरले. यातून अनेक देशांनी लोकशाहीकडे वाटचाल करण्यास सुरवात केली. सुरवातीच्या काळात झिम्बाब्वेची प्रगती चांगल्या पद्घतीने होत राहिली आणि हा देश आफ्रिकेतील इतर देशांसाठी आदर्श ठरला. मात्र,  १९८७ मध्ये देशाच्या काही भागांत झालेले बंड मुगाबे यांनी लष्कराचा वापर करून शमविले. तेथूनच त्यांचा ‘सत्तेसाठी सारे काही’ हा प्रवास सुरू झाला. यानंतरच्या काळात त्यांनी सत्ता मिळविण्यासाठी हिंसाचारासह मतदानातील गैरप्रकारांचाही अवलंब केला. राजकीय पातळीवर देशाची वाताहत सुरू असताना कृषी, खनिजसमृद्ध झिम्बाब्वेच्या अर्थव्यवस्थेला घरघर लागली. कारखाने बंद पडू लागले आणि बेरोजगारी वाढू लागली. महागाई गगनाला भिडली. यामुळे जनतेचा भ्रमनिरास झाला. या आर्थिक घसरणीचे मूळ श्‍वेतवर्णी कुटुंबांच्या जमिनी ताब्यात घेण्याच्या धोरणात आहे. या जमिनी सरकारच्या ताब्यात आल्या. मात्र, त्या गरिबांपर्यंत पोचल्या नाहीत. त्यांचे वाटप सरकारमधील नेते, पक्षाचे नेते, लष्करी अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना करण्यात आले. 

मुगाबे यांच्या कार्यकाळात झिम्बाब्वेवर दीर्घकाळ आंतरराष्ट्रीय निर्बंध कायम राहिले. मात्र, आफ्रिकेतील इतर समकालीन नेत्यांप्रमाणे त्यांना ब्रिटन, अमेरिका आणि इतर पाश्‍चात्त्य देशांकडून मान्यता मिळाली नाही. पाश्‍चात्त्य देशांसाठी ते क्रूर हुकूमशहा होते, तर आफ्रिकेतील जनतेसाठी ते वर्णद्वेषी लढ्याचे नेते आणि पाश्‍चात्त्य साम्राज्यवाद व नववसाहतवादाला आव्हान देणारे होते. झिम्बाब्वेवर त्यांनी सुमारे ३७ वर्षे सत्ता गाजविली. या काळात त्यांनी एकांगी आर्थिक निर्णय घेतले. त्यांचे दुष्परिणाम आजही तेथील जनता भोगत आहे. वार्धक्‍याच्या खुणा ठळकपणे दिसू लागल्यानंतरही पायउतार होण्याची कल्पना मुगाबे यांना मान्य नव्हती. त्यांना जबरदस्तीने अध्यक्षपदावरून पायउतार करण्याच्या हालचाली यशस्वी झाल्यानंतर देशातील जनतेने रस्त्यावर उतरून जल्लोष केला. जननायकापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास कुठल्या टप्प्यावर पोचला होता, याची प्रचिती यातून येते. आफ्रिकेतील जनतेच्या मानवी हक्कांची भाषा करणारा हा नेता नंतर मात्र मानवाधिकाराचा गळा घोटणारा ठरला.

loading image