ढिंग टांग  :  रॉकस्टार आणि तात्या!

ब्रिटिश नंदी
Thursday, 26 September 2019

भारताचे परममित्र श्रीमान ट्रम्पतात्या आणि भारताचे फादर श्रीमान नमोजी यांच्यात बंद दाराआड चाललेल्या संवादात अनेक प्रश्‍नांचा ऊहापोह करण्यात आला.

भारताचे परममित्र श्रीमान ट्रम्पतात्या आणि भारताचे फादर श्रीमान नमोजी यांच्यात बंद दाराआड चाललेल्या संवादात अनेक प्रश्‍नांचा ऊहापोह करण्यात आला. या मित्र-भेटीचा तपशील सर्वांना ठाऊक नाही, कारण सदर संवाद बंद दाराआड झाला, हे वर सांगण्यात आले आहेच. तथापि, आम्ही तेथे उपस्थित असल्यामुळे आम्हाला ही चर्चा ऐकता आली. अवघ्या विश्‍वाचे पर्यावरण व भविष्य या संवादावर अवलंबून होते. संवादातला अंश येथे देत आहोत. त्यावरून ही भेट किती महत्त्वाची होती, हे तुमच्या लक्षात येईल.

ट्रम्पतात्या : हौडी मोदी!

नमोजी : हौडी डोनाल्डभाई!

ट्रम्पतात्या : जाम मायलेज मारता हां तुम्ही! 

नमोजी : (संकोचून) कसलं मायलेज?

ट्रम्पतात्या : (दाद देत) मानलं पायजे तुम्हाला! ज्यात त्यात मायलेज मारता!! 

नमोजी : (विनम्रतेने) कसचं कसचं! मी एक साधासिंपल चहावाला आहे! एकसो तीस करोड भारतवासीयों के बिना ये अकेला नमोजी कुछ नहीं!

ट्रम्पतात्या : (ओठांचा चंबू करत) अंहं! बनो मत...परवा ह्यूस्टनला काय जोरदार कार्यक्रम केलात! 

नमोजी : लोक प्रेम करतात आपल्यावर! काय करणार?

ट्रम्पतात्या : (खांद्यावर थाप मारत) तुम्ही तर रॉकस्टार आहात! तुम्ही इंडियाचे एल्विस प्रिस्ले आहात!!

नमोजी : कोण एल्विस?

ट्रम्पतात्या : प्रिस्ले, प्रिस्ले!!

नमोजी : (विषय बदलत) असू दे, असू दे! मायकेल जॅक्‍सन म्हटलं नाहीत त्याबद्दल थॅंक्‍यू! बाकी तुम्ही त्या पाकिस्तानवाल्यांना झापलंत, त्याबद्दलही थॅंक्‍यू हं!

ट्रम्पतात्या : झापलं? छे!! मी तर सहज बोललो होतो! मी असंच बोलतो!! इमरॅनसुद्धा माझा चांगला फ्रेंड आहे! परवाच त्याची फ्रेंड रिक्‍वेस्ट मी फेसबुकवर ॲक्‍सेप्ट केली! 

नमोजी : (हळहळत) पुलवामा हल्ल्यानंतर मी त्यांना ब्लॉक करून टाकलं! फार वाईट पोस्टी टाकत होते!! (विषय बदलत) ते जाऊ दे! बाकी परवाचा आपला इव्हेंट सुपरहिट गेला हे मात्र खरं!

ट्रम्पतात्या : तुम्ही खरोखर बापमाणूस आहात! पुढल्या वेळेला मीसुद्धा असा इव्हेंट करून बघणार आहे!

नमोजी : एक मोफत सल्ला देतो! असा इव्हेंट स्वत:च्या देशात करायचा नसतो! परदेशात जाऊन करावा! 

ट्रम्पतात्या : त्यानं काय होईल!

नमोजी : गर्दी...गर्दी होईल! पिकतं तिथं विकत नसतं! तुम्ही ‘आर्ट ऑफ डील’मध्ये माहीर आहात! धंद्याची बात मी तुम्हाला काय सांगावी?

ट्रम्पतात्या : मी तर तुम्हाला फादर ऑफ इंडिया म्हणेन!

नमोजी : (दचकून) फादर?

ट्रम्पतात्या : येस...फादरच! खरं तर ग्रॅंण्ड फादर म्हणणार होतो!

नमोजी : थॅंक्‍यू! आय मीन...न म्हटल्याबद्दल!

ट्रम्पतात्या : रॉकस्टार फादर एल्विस प्रिस्ले! हाहा!!

नमोजी : (प्रसंगावधान राखून) तुम्हीही इंडियात आलात की आपण असाच जोरदार कार्यक्रम करू!

ट्रम्पतात्या : इथे अडीच कोटी इंडियन राहतात! तुमच्या इंडियात अमेरिकन किती असणार?

नमोजी : एकशेतीस कोटी अमेरिकन राहतात असं समजा! आमच्या भारतात तुमची क्रेझ सॉलिड आहे! उगीच नाही लोक तुम्हाला तात्या म्हणत!!

ट्रम्पतात्या : तात्या म्हंजे काय?

नमोजी : तात्या म्हणजे रॉकस्टारच!!

ट्रम्पतात्या : अस्सं होय! म्हणजे मीसुद्धा रॉकस्टार आहे?

नमोजी : अफकोर्स! ठरलं तर...तुम्ही मला रॉकस्टार फादर एल्विस प्रिस्ले म्हणालात त्याबद्दल मी तुम्हाला ‘ग्लोबल तात्या’ असा किताब देईन! डील?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rockstar trump