प्रखर राष्ट्रवादी संघटक

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचा वर्षप्रतिपदा हा जन्मदिन.
dr. keshav baliram hegdewar
dr. keshav baliram hegdewarsakal

- जयंत रानडे

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचा वर्षप्रतिपदा हा जन्मदिन. संघाच्या स्थापनेमागचे डॉ. हेडगेवार यांचे चिंतन काय होते आणि त्यांनी दिलेल्या कार्यपद्धतीची वैशिष्ट्ये काय, याची मांडणी करणारा हा लेख.

वर्षप्रतिपदेला, एक एप्रिल १८८९ रोजी एका सर्वसामान्य वैदिक घराण्यात डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांचा जन्म झाला. त्यांना ज्वलंत राष्ट्रभक्तीचे वरदान जन्मजात लाभले होते. शाळेत असताना व्हिक्टोरिया राणीच्या राजवटीला साठ वर्षे झाली म्हणून वाटण्यात आलेली मिठाई आठ वर्षांच्या केशवाने, ‘ही मिठाई खाण्यात आनंद कसला?’ म्हणून कचरापेटीत फेकून दिली होती.

बाराव्या वर्षी सातवे एडवर्ड यांच्या राज्यारोहण समारंभाच्या दिवशीही त्याने शासकीय आनंदोत्सवात भाग घेतला नव्हता. राष्ट्रीय चळवळीत भाग घेण्यावर आणि ‘वंदे मातरम्’ घोषणेवर बंदी असताना, नागपूरच्या नील सिटी हायस्कूलमध्ये शाळा तपासनीसासमोर वर्गा-वर्गातून ‘वंदे मातरम्’चा जयघोष घडविण्यात केशवचाच पुढाकार होता. या घटनेमागे कोण होते? हे शाळा बंद होऊन दोन महिने झाल्यावरही कोणास समजले नाही, असे संघटन कौशल्य त्याने त्या वयातच सिद्ध करून दाखविले.

राष्ट्रीय आंदोलनाच्या चतु:सूत्रीवरील म्हणजे स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण यावरील लोकमान्य टिळकांची भाषणे केशवसह अनेक तरुणांच्या हृदयाला भिडली होती. ते सक्रियही झाले होते. लोकमान्य टिळकांचे अनेक विचार त्यांनी व्यवहारात सार्थ करून दाखविल्याचे दिसते. तारुण्यात रुजलेला राष्ट्रीयत्वाचा व्यापक विचार केशवच्या मनात जीवनभर ध्रुवताऱ्यासारखा दृष्टीपुढे राहिला.

डॉक्टर मुंजे यांच्या पाठिंब्याने केशवरावांनी कलकत्त्याच्या नॅशनल मेडिकल कॉलेजमध्ये १९१० मध्ये प्रवेश घेतला. तेथे क्रांतिकारकांच्या अंतर्गत गोटातही त्यांना प्रवेश मिळाला. त्यांच्यावर सोपविलेल्या सर्व जबाबदाऱ्या त्यांनी उत्तम प्रकारे पारही पाडल्या. तेथील पाच वर्षांच्या काळात बंगाली भाषा ते शिकलेच. शिवाय अनेक लोकांशी, नेत्यांशी त्यांनी आत्मीय संबंधही जोडले. डॉक्टर होऊन नागपूरला परतल्यावरही ते क्रांतिकार्यात होते.

काही क्रांतिकारक प्रखर देशभक्तीमुळे काही इंग्रज शत्रूंना ठारही करीत, हौतात्म्यही स्वीकारीत. पण आपलेच देशबांधव स्वार्थासाठी फितुरी करून त्यांना पकडून देत आणि होणाऱ्या परिणामास घाबरून मोठ्या संख्येने जनता लांबच राही. स्वराज्य प्राप्तीच्या दृष्टीने ही मोठी कमतरता होती. त्यामुळे लोकांत विशुद्ध राष्ट्रभक्तीची भावना स्थायी स्वरूपात जागृत करणे, त्यांच्यात अनुशासनबद्धता, नि:स्वार्थ वृत्ती जागविणे आणि राष्ट्रासाठी झिजण्याची भावना निर्माण करणे आवश्यक आहे, असे त्यांना वाटू लागले.

पुढील पाच-सात वर्षांत डॉ. हेडगेवार यांनी पदाधिकारी म्हणून पूर्ण झोकून काँग्रेसचे कार्यही केले. नागपूर नॅशनल युनियन ही जहाल विचारांची संस्था चालविली. राष्ट्रीय उत्सव मंडळ, भारत स्वयंसेवक मंडळ, अनाथ विद्यार्थी गृह अशा मार्गांनी ते प्रयत्न करीत होते. १९१९ मध्ये काँग्रेसने हिंदू-मुस्लिम ऐकण्यासाठी खिलाफत आंदोलनास पाठिंबा दिला. मुसलमानांचे अनुनय करणारे हे राजकारण डॉ. हेडगेवार यांना नुकसान करणारे वाटे. हिंदू-मुस्लिम ऐक्याविना स्वराज्य मिळणार नाही, या विचाराला त्यांचा मुळातूनच विरोध होता.

असहकाराच्या आंदोलनात डॉ. हेडगेवार यांनी स्वतःला झोकून दिले. बंदी हुकूम झुगारल्याने आणि चिथावणीखोर भाषणे केल्यामुळे त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला झाला. खटला झाल्यास बचाव करावयाचा नाही, हा असहकार आंदोलनाचा नियम डॉक्टरांनी सपशेल झुगारून लावला. त्यांनी केलेले बचावाचे भाषण ऐकून इंग्रज न्यायाधीशाने, त्यांच्या ‘मूळ भाषणापेक्षा त्यांचे हे समर्थन अधिक राजद्रोहपूर्ण आहे’ असे उद्गार काढले.

डॉक्टरांना न्यायालयाने एक वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली. १२ जुलै १९२२ रोजी त्यांची सुटका झाली. त्यांच्या नागपुरातील स्वागत समारंभास पंडित मोतीलाल नेहरू, डॉक्टर अन्सारी, विठ्ठलभाई पटेल, हकीम अजमलखान, कस्तुरीरंग अय्यंगार आदी काँग्रेसचे बडे नेते उपस्थित होते.

मूलगामी स्वरूपाचे चिंतन

डॉक्टर हेडगेवार यांना या दीड तपाच्या कालखंडाने जीवनकार्याच्या वास्तविक चिंतनासच प्रवृत्त केले. आंदोलने होतात, पण त्यांचा जोम टिकून का राहत नाही? भली भली म्हणविणारी माणसेही स्वार्थी, दुटप्पी प्रवृत्तीची आणि उद्घोषित ध्येयवादाशी प्रतारणा करणारी का असतात? अनुशासन हीनतेचे प्रदर्शन आपल्या सार्वजनिक जीवनात एवढे ढळढळीतपणे का होते? मूठभर इंग्रज या देशावर सुखाने राज्य करूच कसे शकतात?

आपल्या समाजाची अवनती झाली ती केवळ आक्रमकांच्या श्रेष्ठत्वामुळेच काय? आक्रमणे व भारताचा जय-पराजयाचा इतिहास काय सांगतो? भारत इंग्रजांच्या जोखडातून मुक्त झाला तरी त्याचे स्वातंत्र्य टिकून राहील याची शाश्वती काय? खिलाफत व असहकार या आंदोलनाची फलनिष्पत्ती काय? तुरुंग भरतीने काय साधले? अशा अनेक प्रश्नांचे तुफान डॉक्टरांच्या अंतरंगात उठले होते. निष्णात धन्वंतरी अवघड व जुनाट दुखण्याच्या मुळाशी जातो, त्याप्रमाणे डॉक्टरांनी जो विचार चालविला होता तो मूलगामी स्वरूपाचा होता.

संघटनाचे महत्त्व

हिंदूंनी संघटित होणे हाच हिंदू-मुस्लिम ऐक्याच्या प्रश्नावरील एकमात्र तोडगा आहे, या निष्कर्षावर ते पोहोचले होते. रूढ राजकीय कामापेक्षा अगदी वेगळे आणि तरुणांवर राष्ट्रीय संस्कार करणारे व गुणवत्तेवर भर देणारे कार्य करण्याची कल्पना त्यांच्या मनात बळावत चालली होती. या सर्वांची परिणती म्हणजे ‘हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व’ हा सिद्धांत घेऊन ते समाजकार्यासाठी उभे ठाकले.

हिंदू संघटित झाले पाहिजेत, असे अनेक नेत्यांना वाटत होते. पण ते कसे करायचे? हे कोणाला सुचत नव्हते. या पार्श्‍वभूमीवर १९२५ मध्ये विजयादशमीला डॉक्टर हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सुरवात केली. त्याचे सर्व पैलू सहकाऱ्यांशी संवाद, चर्चा करून आणि सर्वांच्या सहमतीने व अनौपचारिक पद्धतीने, हिंदूंच्या सांस्कृतिक परंपरेच्या प्रकाशात, कुटुंब पद्धतीच्या अंगाने ते विकसित करीत गेले. त्यात त्यांच्या प्रतिभेची झेप स्पष्ट दिसते. डॉक्टरांच्या निधनाला आता ८३ वर्षे झाली तरी त्यांची राष्ट्रीय पुनरुत्थानाची अचूक दृष्टी व हिंदू समाजाचे संघटन करणारी कार्यपद्धती यात कोणताही फरक न होता आज अनेक पटीने ती विकसित झाली आहे.

(लेखक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्‍चिम महाराष्ट्र प्रांताचे माजी सहकार्यवाहकआहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com