रशियाशी मैत्रीला नवी झळाळी (अग्रलेख)

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 जून 2017

विविध क्षेत्रांत सहकार्यासाठी करार, तसेच दहशतवादाविरोधातील लढा आणि पर्यावरण संवर्धनाकरिता रशिया व युरोपीय देशांकडून मिळालेला सकारात्मक प्रतिसाद पाहता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा फलदायी ठरला आहे.

केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या त्रिवर्षपूर्तीच्या निमित्ताने देशभर "मोदी महोत्सव' साजरा केला जात असतानाच, दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्पेन, जर्मनी, फ्रान्स आणि रशिया या चार देशांच्या दौऱ्यावर रवाना झाले. मोदी यांच्या या दौऱ्याला, त्यांनी आपल्या पंतप्रधानपदाच्या पहिल्या वर्ष-दीड वर्षांच्या काळात केलेल्या "जागतिक पर्यटना'च्या वेळेपेक्षा अगदीच आगळीवेगळी पार्श्‍वभूमी होती. अमेरिकेच्या अध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प यांची निवड झाल्यानंतर, बराक ओबामा यांच्या अध्यक्षपदाच्या अखेरच्या पर्वात मोदी यांनी त्या देशाशी प्रस्थापित केलेल्या गाढ मैत्रीवर तणावाचे सावट आले आहे. त्याच वेळी चीन व पाकिस्तान यांच्याबरोबरचे संबंध रशिया अधिकाधिक घट्ट करत असल्याचे गेल्या काही दिवसांत स्पष्ट होऊ लागले होते. शिवाय, दहशतवादी संघटनाही आपली ताकद जगभरात ठिकठिकाणी दाखवून देत होत्या. मॅंचेस्टरमध्ये गेल्याच महिन्यात झालेल्या हल्ल्यामुळे दहशतवादाविरोधात संघटितपणे पावले उचलण्याची गरज पुन्हा ठळकपणे अधोरेखित झाली होती. या पार्श्‍वभूमीवर झालेल्या मोदी यांच्या दौऱ्याला अनेकार्थाने यश मिळाल्याचे दिसत आहे. या चारही देशांमध्ये पंतप्रधानांनी ही गरज ठामपणे तेथील नेत्यांपुढे मांडली आणि त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. दौरा संपवून मोदी भारतात परतत असतानाच, दहशतवाद्यांनी लंडनमध्ये आपली नखे बाहेर काढून घातपात घडविला असला तरी, त्यामुळे या चार देशांनी दहशतवादाविरोधात उभे राहण्यासाठी दिलेल्या सक्रिय प्रतिसादाचे महत्त्व कमी होत नाही.
पंतप्रधानांचा हा दौरा चार देशांचा असला तरी सर्वसामान्य भारतीय नागरिक हा त्यांच्या रशियाभेटीकडे अधिक औत्सुक्‍याने पाहत होता. त्याला पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या काळापासून सुरू झालेल्या भारत-रशिया मैत्रीच्या सात दशकांची पार्श्‍वभूमी जशी कारणीभूत होती; त्याचबरोबर पाकिस्तानच्या कारवायांच्या विरोधात रशियाने सातत्याने पुढे केलेला मैत्रीचा हातही भारतीय विसरलेले नव्हते. भारतीयांच्या मनात रशियाची प्रतिमा ही संकटकाळी मदत करणारा दोस्त अशीच आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत आर्थिक अडचणींमुळे डॉलरच्या शोधात असलेल्या रशियाने शस्त्रास्त्रविक्रीसाठी पाकिस्तानबरोबर "प्रेमळ संवाद' सुरू केला आणि त्याचवेळी चीनवरही मैत्रीचे कटाक्ष टाकायला सुरवात केली होती. या पार्श्‍वभूमीवर मोदी यांना रशियाने अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला असून, मोदी यांनीही रशियाशी असलेल्या सात दशकांच्या "दोस्तान्या'स या वेळी उजाळा दिला. हे एका अर्थाने पंडित नेहरू यांचे ऋण मान्य करण्यासारखेच होते! तमिळनाडूतील कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पात आणखी दोन अणुभट्ट्या उभारणीबाबत दीर्घकाळ रेंगाळलेला करार या निमित्ताने मार्गी लागला आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना भारत-रशिया मैत्रीचे महत्त्व पटवून देण्यात मोदी यांना आलेले यश हे या दौऱ्याचे मोठेच फलित आहे. ट्रम्प यांनी सत्ताग्रहणानंतर लगोलग स्थानिकांना म्हणजेच अमेरिकनांच्या रोजगारासंबंधात घेतलेल्या काही निर्णयांचा फटका भारताला आज ना उद्या बसणार आहे. या पार्श्‍वभूमीवर जुळू पाहत असलेली ही नवी आंतरराष्ट्रीय समीकरणे भारताच्या दृष्टीने फलदायी आहेत. या चारही देशांशी विविध क्षेत्रांतील सहकार्याबाबत झालेले करार हे त्याचेच निदर्शक आहे.

या दौऱ्यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील वाढत्या दहशतवादाची गंभीर दखल घेतली गेली, तशीच पर्यावरणाच्या जतनासाठी बांधिलकी व्यक्त केली गेली. मोदी यांच्या या दौऱ्याच्या दरम्यानच ट्रम्प यांनी आपल्या कारकिर्दीतील सर्वात विघातक निर्णय जाहीर केला आणि तो होता, जागतिक हवामानबदलाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या "पॅरिस करारा'तून बाहेर पडण्याचा. ओबामा यांचे निर्णय फिरवण्यास ट्रम्प यांनी आपल्या कारकिर्दीच्या पहिल्या दिवसापासूनच सुरवात केली होती; पण त्यांचा हा निर्णय त्याचा कळसाध्याय म्हणता येईल. शिवाय, हा निर्णय जाहीर करताना त्यांनी वास्तवाकडे संपूर्ण दुर्लक्ष करत, सत्याचा अपलाप करत भारतावर यथेच्छ दुगाण्याही झाडल्या. आता मोदी यांच्या याच महिन्याच्या अखेरीस होऊ घातलेल्या अमेरिका दौऱ्यावर त्याचा काय परिणाम व्हायचा तो होवो; मात्र, मोदी यांनी त्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करत आपली पॅरिसभेट फलदायी ठरवली.

"निसर्गाशी असलेले आपले पिढ्यान्‌ पिढ्याचे नाते आपण तोडता कामा तर नयेच; शिवाय नव्या पिढीसाठी आपण काही नैसर्गिक संचित पुढे ठेवायला हवे,' असे त्यांनी पॅरिसमध्ये सांगितले. "धरतीमाता' असा वसुंधरेचा उल्लेख करून पृथ्वीचे संवर्धन करण्याच्या प्राचीन भारतीय परंपरेचा दाखलाही मोदी यांनी फ्रान्सचे अध्यक्ष इम्यॅन्युअल मॅक्रॉन यांना दिला आणि आता त्याहीपुढे जाण्याची गरज प्रतिपादन केली. अर्थात, हे प्रतिपादन "शब्द बापुडे केवळ वारा..' राहता कामा नये. सृष्टीच्या संवर्धनाची हीच भूमिका त्यांनी देशातील विकासप्रकल्पांना परवानग्या देतानाही लक्षात घ्यायला हवी. एकूणात, दहशतवादाच्या विरोधातील जागतिक आघाडी अधिक बळकट करण्यासाठी आणि पर्यावरण संवर्धनासाठी रशिया व युरोपीय देशांकडून मिळालेला सकारात्मक प्रतिसाद लक्षात घेता, मोदी यांचा हा दौरा यशस्वी ठरला, असेच म्हणता येईल.

Web Title: sakal editorial india russia relationship