गांधी घराण्याच्या जाळ्यातील काँग्रेस (अग्रलेख)

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 जून 2017

काँग्रेसचे नेतृत्व लवकरच राहुल गांधी यांच्याकडे सोपविले जाईल, असे दिसते. हा त्या पक्षाचा अंतर्गत प्रश्‍न असला, तरी गांधी घराण्यापलीकडे जाऊन नेतृत्वाचा विचार करायला काँग्रेसजन अद्यापही तयार नाहीत, हेच यावरून दिसते.

लोकसभा निवडणुकीत तीन वर्षांपूर्वी पदरी आलेल्या दारुण पराभवानंतर अखेर काँग्रेसला जाग आली असून, काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी भारतीय जनता पक्षावर जबरदस्त "हल्लाबोल' केला आहे. त्याला अर्थातच गेल्या काही महिन्यांत देशातील बदलत चाललेले वातावरण कारणीभूत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटाबंदीच्या निर्णयाचा फटका नोकरदार आणि कष्टकरी अशा दोन्ही स्तरांवरील जनतेला बसला होताच. त्या पाठोपाठ आता देशभरातील अस्वस्थ शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. त्यामुळे सोनिया गांधी यांनी विविध स्तरांवर आलेल्या अपयशाचा पाढा वाचत सरकारला धारेवर धरणे, हे अपेक्षितच होते. त्याचवेळी कार्यकारिणीच्या याच बैठकीत उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या "राज्याभिषेका'चा मार्गही खुला केला गेला आणि आता हे विधिवत राज्यारोहण येत्या ऑक्‍टोबरमध्ये होईल, अशी चिन्हे आहेत. मात्र एकामागोमाग अशा पराभवांच्या गर्तेत सापडलेल्या काँग्रेसला संजीवनी देणे, हे काम सोपे नाही आणि राहुल यांच्या हाती पक्षाची सूत्रे सोपवल्यामुळे ते अधिकच कठीण होण्याची शक्‍यता आहे. मात्र तरीही कार्यकारिणीच्या नोव्हेंबर 2016 मधील बैठकीत त्यासंबंधात एकमताने झालेल्या निर्णयावर मंगळवारच्या बैठकीत शिक्‍कामोर्तब करण्यात आल्यामुळे काँग्रेस नेते अद्यापही गांधी घराण्याच्याच हाती नेतृत्वाची धुरा सोपवण्याच्या जाळ्यात कसे अडकलेले आहेत, तेच दिसून आले. खरे तर लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर एकामागोमाग एक असे पराभवाचे जबर फटके काँग्रेसला बसले आणि या बुडत्या जहाजातून उड्या घेऊन कार्यकर्त्यांबरोबरच नेतेमंडळींनीही भाजपच्या छावणीत डेरेदाखल होण्याचा मार्ग पत्करला. मात्र, या तीन वर्षांत बिहारमध्ये नितीशकुमार आणि लालूप्रसाद यादव यांच्याशी राहुल गांधी यांनी केलेली युती काहीसे यश देऊन गेली. त्यानंतर उत्तर प्रदेशातही अखिलेश यादव यांच्याशी हातमिळवणी करून राहुल यांनी प्रचारमोहिमेत प्रयत्नांची शिकस्त केली. मात्र, उत्तर प्रदेशच्या जनतेने ही हातमिळवणी धुडकावून लावली आणि राहुल यांच्या नेतृत्वावर पुनःश्‍च अपयशाचा शिक्‍का बसला. तरीही आता पुन्हा राहुल यांनाच पक्षाध्यक्षपद बहाल करण्याबाबत निर्णय घेताना पक्षनेत्यांनी किमान सारासार विचार केल्याचेही दिसत नाही.

काँग्रेस कार्यकारिणीच्या या बैठकीस पार्श्‍वभूमी होती, ती पुढच्या महिन्यात होणाऱ्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीची आणि त्याचे रणशिंग सोनिया यांनी मोदी सरकारच्या त्रिवर्षपूर्तीच्या मुहूर्तावरच विरोधी पक्षनेत्यांची बैठक आयोजित करून फुंकलेही होते. त्या बैठकीस उपस्थित असलेल्या 17 पक्षांच्या नेत्यांनी एका अर्थाने सोनिया यांचे नेतृत्व मान्य केल्याचे दिसत होते. अशावेळी राहुल यांच्या हाती नेतृत्व सोपवणे उचित होईल काय, याचा विचारही या बैठकीत झाल्याचे दिसत नाही. त्याचे प्रमुख कारण म्हणजे शरद पवार, नितीशकुमार, लालूप्रसाद यादव, मुलायमसिंह यादव, ममता बॅनर्जी आणि डाव्या पक्षांचे नेते हे सोनिया गांधी यांचा शब्द मानताना दिसत असले, तरी असाच प्रतिसाद ते राहुल यांना देतील काय, हा भाजपविरोधात "महागठबंधन' उभारताना समोर येणारा कळीचा प्रश्‍न आहे. अर्थात, हा काँग्रेसचा अंतर्गत प्रश्‍न आहे आणि गांधी घराण्यापलीकडे जाऊन नेतृत्वाचा विचार करायला ही मंडळी तयार नाहीत, हे अनेकदा दिसून आले आहे. मात्र, त्यापलीकडे जाऊन या बैठकीत सोनिया यांनी भाजप, तसेच मोदी यांच्यावर चढवलेल्या हल्ल्याचा विचार करावा लागेल. शेती, तसेच काश्‍मीर आणि अन्य अनेक प्रश्‍नांवर सरकारला आलेल्या अपयशाचा उल्लेख सोनिया यांनी जरूर केला; पण त्यांच्या भाषणातील मुख्य मुद्दा हा मोदी सरकार उद्‌ध्वस्त करू पाहत असलेल्या भारताच्या "संकल्पने'चा होता. भारताची संकल्पना म्हणजेच "आयडिया ऑफ इंडिया' ही अनेक बाबींवर आधारित आहे. या संकल्पनेत प्रामुख्याने भारताची बहुविध अशी बहुभाषिक, बहुधर्मीय, बहुजातीय संस्कृती गृहीत धरलेली आहे आणि नेमकी हीच संकल्पना मोदी सरकार नष्ट करू पाहत आहे, अशी तिखट टीका सोनिया यांनी केली.
याच बैठकीत पक्षांतर्गत निवडणुकांचा कार्यक्रमही निश्‍चित करण्यात आला आणि त्याबरोबरच पक्षाने यापुढे नेमकी काय भूमिका घ्यावी, याबाबत कार्यकर्त्यांची मते आजमावून पाहण्यासाठी काही समित्याही स्वत:च्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्याची घोषणा राहुल यांनी केली. खरे तर अशा समित्यांच्या अध्यक्षपदासाठी ज्योतिरादित्य शिंदे, सचिन पायलट आदी मंडळी पक्षात आहेत. त्यांना पुढे केल्यास जनमानसात काँग्रेसची वेगळी प्रतिमा उभी राहू शकते. लोकसभेतील काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या जागी ज्योतिरादित्य यांना नेमण्याबाबत चर्चा मध्यंतरी सुरूही झाली होती. मात्र, या बैठकीत त्यासंदर्भात चकार शब्दही निघालेला दिसत नाही. अशा परिस्थितीत काँग्रेसला राहुल कशी संजीवनी देणार, ते काँग्रेसच जाणो!

Web Title: sakal editorial marathi news congress rahul gandhi