युतीतील गुणगुण नि भुणभुण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 जून 2017

कर्जमाफीच्या निर्णयाच्या श्रेयावरून भाजप व शिवसेना यांच्यात सुरू असलेला कलगीतुरा म्हणजे या दोन्ही पक्षांतील संबंधांचे रूपांतर टिंगल-टवाळीत झाल्याचेच निदर्शक आहे.

शिवसेनेचा कोणे एके काळी धाक वाटत असे आणि त्याला बाळासाहेब ठाकरे यांचा दराराच कारणीभूत होता. तोच धाक आणि तोच दरारा यांचे रूपांतर पुढे काळाच्या ओघात दहशतीत होऊन गेले आणि आता उद्धव ठाकरे यांच्या जमान्यात शिवसेनेचे रूपांतर टिंगल-टवाळीपुरते मर्यादित होऊन गेले आहे! "येत्या जुलैमध्ये महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार!' हे शिवसेना नेते संजय राऊत यांचे विधान काय आणि त्याला भाजपतर्फे दिले गेलेले "चिलटं-डासांमुळे भूकंप होत नाही!' हे उत्तर काय, यामुळे या दोन्ही पक्षांमधील संबंध हे सौहार्दाचे सोडाच, सत्तेसाठी कराव्या लागलेल्या राजकीय तडजोडीपुरतेही मर्यादित राहिलेले नसून, ते टिंगल-टवाळीत रूपांतरित झाल्याचीच साक्ष देत आहेत. शिवसेनेचा एके काळचा दरारा किंवा दहशत नेमकी कधी कमी झाली, या प्रश्‍नाचे उत्तर स्पष्ट आहे. विधानसभा निवडणूक उद्धव ठाकरे यांना स्वबळावर लढवण्यास भाजपने भाग पाडल्यावरही खरे तर ते कचरले नव्हते. त्यांनी अक्षरश: एकट्याच्या बलबुत्यावर ती निवडणूक लढवून कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यापेक्षा अधिक जागा जिंकून विरोधी पक्षनेतेपदही मिळवले. मात्र, त्यानंतर महिनाभरातच भाजपपुढे साष्टांग लोटांगण घालत, शिवसेना विरोधी पक्षनेतेपदाच्या लाल दिव्याच्या गाडीत बसून सरकारपक्षाच्या छावणीत दाखल झाली आणि शिवसेनेने गेल्या पाच दशकांत जे काही तथाकथित "सत्त्व' कमावले होते, ते संपुष्टात आले. तेव्हापासून सरकारात तर राहायचे आणि आपल्याच सरकारच्या विरोधात सातत्याने बडबड करत राहायची, असे शिवसेनेचे वर्तन आहे. शेतकरी कर्जमाफीच्या प्रश्‍नावरून महाराष्ट्रात झालेल्या अभूतपूर्व आंदोलनाच्या आठ-दहा दिवसांच्या काळात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव यांचे वास्तव्य लंडनमध्ये होते आणि त्या काळात त्यांचे तथाकथित नेते जी काही जबाबदार किंवा खरे तर बेजबाबदार वक्‍तव्ये करत होते, ती बघितल्यावर तर हसू येणेही कठीण झाले आहे. या साऱ्या काळात मुख्यमंत्री या नात्याने देवेंद्र फडणवीस यांनी कमालीचा संयम पाळला किंवा त्यांना तो पाळणे विधानसभेत पूर्ण बहुमत नसल्यामुळे भाग पडले असले तरी, त्यांनी त्याचा राजकीय फायदा उठवत आपले "वजन' वाढवले, यात शंकाच नाही!

शेतकरी कर्जमाफीचा प्रश्‍न शिवसेनेनेच गेल्या हिवाळी अधिवेशनापासून लावून धरला असला तरी, गेल्या आठवड्यातील आंदोलन मात्र हे पूर्णपणे उत्स्फूर्तच होते. कॉंग्रेस आणि "राष्ट्रवादी' यांनाही आंदोलनाचा जोर, व्याप्ती बघून त्यात सामील होणे भाग पडले. तरीही या सर्व काळात शिवसेना नेते जणू काही आपणच या आंदोलनाचे सूत्रधार असल्याच्या थाटात वक्‍तव्ये करत होते. त्याकडे दुर्लक्ष करून या आंदोलनातून मार्ग काढण्याची व्यूहरचना सरकार म्हणजेच फडणवीस हे मंत्रिमंडळातील आपल्या शिवसेनेच्या सहकाऱ्यांना सुगावा लागू न देता आखत होते. त्यामुळे संतप्त होऊन शिवसेनेने मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यामुळे शिवसेना कर्जमाफीच्या निर्णयात वा त्यासंबंधीच्या हालचालीत सामील नाही, यावरच शिक्‍कामोर्तब झाले! परंतु, त्याची जराही तमा न बाळगता "आम्ही आंदोलनाला पाठिंबा दिल्यामुळेच कर्जमाफीचा निर्णय घेणे सरकारला भाग पडले!' असे तुणतुणे वाजवण्याचे सत्र सुरू झाले. हे सारे केवळ हास्यास्पदच नव्हते, तर राजकीय अपरिपक्‍वतेचेही द्योतक होते. खरे तर शिवसेनेला गेले काही महिने आणि विशेषत: मुंबई महापालिकेच्या निवडणुकीनंतर भाजप म्हणजेच फडणवीस जी काही वागणूक देत आहेत, ते बघता शिवसेनेने सत्तेवर लाथ मारण्याच्या केवळ गमजा न करता, ते प्रत्यक्षात आणून दाखवले असते तर शिवसेनेची थोडीबहुत अब्रू वाचली असती. अर्थात, त्याचवेळी सरकारात राहून रोजच्या रोज फुकाच्या धमक्‍या सहन करत राहावयाची रणनीतीच फडणवीस अवलंबित राहिले. त्यामुळे राष्ट्रपतिपदी आपलाच उमेदवार निवडून यावा म्हणून भाजप किती लाचारी करत आहे, हेच दिसून आले. त्यामुळे भाजपचा टक्‍काही जनमानसातून थोडाफार का होईना घसरला.

आपल्या या लाचारीमुळे शिवसैनिकांची तळाच्या स्तरावर काम करताना किती फरफट होत असेल आणि त्यांना कोणत्या नामुष्कीला तोंड द्यावे लागत असेल, याची जराही फिकीर शिवसेनेच्या नेतृत्वाला राहिलेली दिसत नाही. सत्तेत असल्यामुळे साहजिकच जनतेची या स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांकडून काही ना काही अपेक्षा असणार. मात्र, "मातोश्री'वर जाण्याने काहीच होणार नाही, हे लक्षात आल्यामुळे ते थेट भाजप नेत्यांशी संधान बांधून आहेत. या पार्श्‍वभूमीवर सरकारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाच, तर आपल्याच या "डबल-ढोलकी'छाप वर्तनामुळे घसरत्या टक्‍क्‍यावर नजर ठेवून शिवसेनेतून अनेक जण भाजपप्रवेशही करू शकतात. त्यातून संजय राऊत यांची मजल "भाजपनेच हवे तर सरकारातून बाहेर पडावे!' असे बाष्कळ आणि निरर्थक विधान करण्यापर्यंत गेली; पण या सगळ्या सततच्या वादंगामुळे डासांची गुणगुण जशी त्रासदायक वाटते, तसाच अनुभव सर्वसामान्य नागरिकांना येत आहे. या गुणगुणीला आणि भुणभुणीला तो वैतागला आहे, याची दखल संबंधित घेणार का?

Web Title: sakal editorial marathyi news bhp shivsena