कुरतडीचा डाव! (अग्रलेख)

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 मार्च 2018

ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी निव्वळ चेंडू कुरतडला नाही, तर क्रिकेटरसिकांची मने कुरतडून घायाळ केली. एका जगज्जेत्या संघाचा लौकिकच या अखिलाडू वृत्तीमुळे त्रिफळाचीत झाला आहे. 

ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी निव्वळ चेंडू कुरतडला नाही, तर क्रिकेटरसिकांची मने कुरतडून घायाळ केली. एका जगज्जेत्या संघाचा लौकिकच या अखिलाडू वृत्तीमुळे त्रिफळाचीत झाला आहे. 

केपटाऊन येथील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी लढतीत ऑस्ट्रेलियन संघाने दाखवलेल्या बेइमानीच्या खेळाने अवघे क्रिकेटविश्‍व हादरलेच; पण क्रिकेटशी संबंध नसलेल्या उर्वरित जगालादेखील या कृत्याने धक्का बसला. सभ्य माणसांच्या ह्या सदाबहार खेळाने आता आपले मूलभूत वैशिष्ट्यदेखील गमावले की काय, असे कुणास वाटावे. दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज बाद होणे कठीण आहे, हे दिसताच कांगारूंचा धीर सुटला आणि चेंडू कुरतडून त्याची लकाकी घालवल्यानंतर केपटाऊनच्या खेळपट्टीकडून काही मदत मिळवता येते का, ह्या खटाटोपात त्यांनी सभ्यतेची लक्‍तरे वेशीवर टांगली. कांगारूंची अखिलाडूवृत्ती तशी नवी नाही, किंबहुना चेंडू कुरतडण्याचे प्रकारही क्रिकेटला नवीन नाहीत. परंतु स्लेजिंगच्या खेळात "लौकिक' कमावून असणाऱ्या ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंनी हताशेतून, पराभूत होण्याच्या भीतीतून इतका खालचा तळ गाठावा, हे मात्र कुठल्याही क्रिकेटरसिकाला वैषम्य वाटायला लावणारे आहे.

येत्या सहा एप्रिलपासून भारतात "आयपीएल'चा दणकेबाज उरूस सुरू होईल. ह्याच रांगड्या क्रिकेटसिताऱ्यांसाठी आपण टाळ्या, पिपाटणी वाजवत असतो. तेच सितारे वेळ आली की किती कुटिल उद्योग करतात, हे ह्या निमित्ताने बघायला मिळाले. चेंडू कुरतडणारा बॅनक्रॉफ्ट आणि कर्णधार स्टीव्ह स्मिथ ह्यांनी त्यासाठी अगदी पद्धतशीर कारस्थान रचले. त्याचे गांभीर्य लक्षात घेता कठोर कारवाईच आवश्‍यक होती. परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने स्मिथला फक्त एका सामन्याची बंदी आणि बॅनक्रॉफ्टला ताकीद अशी फुसकी शिक्षा दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. स्मिथने तर "आयपीएल'मधील राजस्थान रॉयल्सचे कर्णधारपदही सोडले आहे. चेंडू कुरतडण्याची आणखी एक उथळ घटना अशा दृष्टिकोनातून ह्याकडे पाहिले तर ही शिक्षा पुरेशी वाटेलही; पण ह्या घटनेचे "आफ्टरशॉक्‍स' क्रिकेटविश्‍वाला या पुढेही जाणवणार असल्याने त्याकडे जरा गंभीरपणाने पाहायला हवे. 

आपल्या संघाचे हे कृत्य अत्यंत लांछनास्पद असल्याची खरमरीत टीका ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टर्नबुल ह्यांनी केली. ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना त्यांच्याच देशात शिव्याशापांचे धनी व्हावे लागत आहे. एका जगज्जेत्या संघाला रसातळाला जाताना पाहणे, क्रिकेटवेड्यांच्या नशिबी आले! 

193-32च्या बदनाम ऍशेस मालिकेत इंग्लंडचा कर्णधार डग्लस जार्डिन ह्याने ऑस्ट्रेलियन फलंदाजांवर बॉडीलाइन, म्हणजेच शरीरवेधी गोलंदाजी केली होती. तेव्हा कांगारू हे बळी होते. पण त्यानंतरच्या अनेक दशकांमध्ये कांगारूंनी क्रिकेटच्या क्षेत्रात दबदबा निर्माण केला. वेस्ट इंडीजचा नक्षा उतरवण्याचाही पराक्रम केला. तीन वेळा जगज्जेता ठरलेला हा प्रबळ संघ, आज स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वाखाली मात्र क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅट्‌समध्ये चाचपडताना दिसतो आहे. अपयशाची ही मालिका खंडित करण्याच्या ऊर्मीतून वाट्टेल ते करण्याकडे कर्णधार स्मिथचा कल झुकला, त्याचे मस्तक फिरले. "मती गुंग झाल्याने अक्षम्य अपराध घडल्याची' कबुलीही त्याने भर पत्रकार परिषदेत दिली. 

केपटाऊनच्या सामन्याच्या वेळी थेट प्रक्षेपण करणाऱ्या डझनावारी टीव्ही कॅमेऱ्यांनी जे "सत्य' दाखवले त्याने साऱ्यांचीच तोंडे कडू पडली. खिश्‍यात दडवलेल्या खरखरीत कागदाने चेंडू घासून त्याची लकाकी घालवण्याचा बॅनक्रॉफ्टचा उद्योग साऱ्या जगाने पाहिला. कॅमेऱ्याने हे सारे टिपल्याने उलट्या बोंबा मारण्याची कांगारूंना काही सोयदेखील राहिली नाही. 2008 च्या उन्हाळ्यात सिडनीत झालेल्या भारताविरुद्धच्या लढतीत ह्याच कांगारूंनी रडीचा डाव खेळत विजय लाटला होता, हे क्रिकेटच्या जाणकारांना आठवत असेलच. "मंकीगेट' नावाने कुप्रसिद्ध असलेल्या ह्या सामन्यात भारतीय संघातील खेळाडूंनी प्रमाणाबाहेर आरडाओरडा करत अपील केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. हरभजन सिंगवर तर तीन सामन्यांची बंदी लादली होती. सचिन तेंडुलकरपासून विराट कोहलीपर्यंत अनेक भारतीय सिताऱ्यांना कांगारूंच्या ह्या धटिंगण खेळाचे शिकार व्हावे लागले आहे. स्मिथ-बॅनक्रॉफ्टचा उद्योग हा त्याच वळणाचा मानायला हवा. बॅनक्रॉफ्टने निव्वळ चेंडू कुरतडला नाही, तर क्रिकेटरसिकांची मने कुरतडून घायाळ केली, असेच म्हणावे लागेल. "जे वर जाते, ते खाली येतेच' ह्या गुरुत्वाकर्षणाच्या नियमाची आठवण यावी, असे अध:पतन एका जगज्जेत्या संघाचे व्हावे, ही बाब क्‍लेशदायकच आहे. खरे म्हणजे ऑस्ट्रेलियातील क्रिकेटचा ढाचा भक्कम आहे. आत्ताचे सर्व खेळाडू यातून तयार झाले आहेत आणि नवी पिढी त्यांना आदर्श मानते; पण ताज्या प्रकारामुळे ही नवी पिढीही हादरली असणार.

Web Title: Sakal Editorial on Sandpaper gate in South Africa versus Australia test match