ढिंग टांग : जागर मराठीचा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जागर मराठीचा

ढिंग टांग : जागर मराठीचा!

माय मराठी तुझी लेकरे किती कौतुकाची

अस्तित्त्वाच्या तुझ्या साजरा उत्सव करती साची

माय मराठी, तुझी थोरवी ओसंडून वाहे

तुझ्याचसाठी दिवसभराचा प्रोग्रामचि आहे!

गुढ्या उभारा, लावा तोरण, रांगोळ्या घाला

बघा, लोकहो, दारावरुनी लवाजमा गेला…

मेण्यामध्ये माय मराठी बसे धरुनि गोंडा

भल्यांस देऊ टाळी आणिक द्वेष्ट्यांना धोंडा

माय मराठी, तुझ्याचसाठी खड्ग हाति राहे

तुझ्याचसाठी दिवसभराचा प्रोग्रामचि आहे…

माय मराठी, तुझ्या अंगणी सोनसळा मंगळ

दारी झुलतो सळसळ करतो सोन्याचा पिंपळ

मांगल्याचे सडे माय गे, तुळस तुझ्या अंगणी

तुझियापोटी लख्ख चांदणे, ओठांवर चांदणी

माय मराठी तुझ्यावाचुनि जगणे मला न साहे

तुझ्याचसाठी दिवसभराचा प्रोग्रामचि आहे…

शब्दशारदे! तुझ्या प्रांगणी साहित्याची लेणी

लोककलांचा जागर आणिक कोकिळकंठी गाणी

गोरोबाचे कच्वे मडके, मुक्तेचे धावे

पुष्पामाजी पुष्प मोगरी, गंध तिचे ल्यावे

माय मराठी, बाराखडीचा कृतज्ञ मी आहे

तुझ्याचसाठी दिवसभराचा प्रोग्रामचि आहे…

शब्दशारदे! तुझ्या अंगणी काव्याचा प्राजक्त

नवरस वाहति नसानसांतून गालहि आरक्त

तुझिया मागे उभा राहतो शतकांचा इतिहास

तुझ्याच ठायी होती मजला किती दिव्य भास

माय मराठी, पदरी घे मज, ये गे, लवलाहे,

तुझ्याचसाठी दिवसभराचा प्रोग्रामचि आहे…

माय मराठी अजिंक्य माझी पचवी हलाहला

पैजा जिंकित हरवत आली तुच्छ अमृताला

कृतज्ञतेने किती पवाडे गाऊ माय मराठी

कितिही लुटले तरीही उरतो माल तुझ्या पेठी

माय मराठी, माझ्यापाशी सुदाम्याचे पोहे

तुझ्याचसाठी दिवसभराचा प्रोग्रामचि आहे…

कितीयेकांनी केला माये, श्रमु अक्षरांचा

कितियेकांनी वसा घेतला मराठी भाषेचा

ज्ञानोबाची ओवी आणिक तुकयाची वाणी

कधी फडावर भल्या पहाटे शुक्राची चांदणी

लोककलांचा प्रवाह ऐसा वळणाने वाहे,

तुझ्याचसाठी दिवसभराचा प्रोग्रामचि आहे…

माय मराठी होशिल कधी तू भाकरिची भाषा

परचक्राच्या पुढ्यात दुबळे गुंडाळती गाशा

ताठ कण्याने रहा उभी तू -फौज लेकरांची

तुझ्यामागुनी सज्ज असे ती शस्त्रे परजत साची

अकरा कोटी मुक्त कंठ हे गाति गर्वगीत

माय मराठी वाहे अमुच्या पेशीपेशीत!

तुझ्या मनगटी सौभाग्याचे कंकण किणकिणताहे

तुझ्याचसाठी दिवसभराचा प्रोग्रामचि आहे…

दिवसभराची मंजुळ गाणी, चर्चा परिसंवाद

भाषासंचित, व्यवहाराचे नसते वाद-प्रवाद

‘अभिजाताचा दर्जा हा तर निव्वळ उपचार

गुमान द्यावा करीत नाही, तुम्ही उपकार!’

माय मराठी, तुझे लेकरु ऐसे भांडत आहे

तुझ्याचसाठी दिवसभराचा प्रोग्रामचि आहे…

सणासुदीचा दिन तो सरला, उरला फक्त फराळ

दिवसभराच्या ‘इव्हेंट’नंतर जो तो होई गहाळ

माय मराठी, दिवस संपला, आता काय करावे?

ज्याने त्याने अपुलाल्या घरि निमूट चालत जावे!

माय मराठी, कितीक वर्षे असाच परिपाठाहे

तुझ्याचसाठी वर्षाकाठी प्रोग्रामचि आहे…

अभिजाताची ओढ तुला गे अर्ज करी दरबारी

‘बाई, उमर सांगा’ वदला तो बाबू सरकारी!

माय मराठी मुकी बिचारी करी पायपीट

कारकुनांची जमात सांगे, द्या की अफिडेविट

कुठुनि आणशिल माये आता उमरीचा दाखला

तुझ्याचसाठी जीवनभरीचा प्रोग्रामचि झाला…

Web Title: Sakal Special Dhing Tang Sampadakiy Article

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Editorial Article
go to top