संपादकीय : ‘डेटा’ची संपत्ती आणि आपत्तीही

येत्या दहा ते पंधरा वर्षांमध्ये माहिती-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात (आयटी) नेमके काय बदल होतील, याचा आताच अंदाज घेणं खूप कठीण आहे.
Technology
Technologysakal

ब्लॉकचेन तंत्रज्ञानामुळं साठा केलेल्या माहितीत बदल करण्याचा आणि ती इतरांकडून हॅक होण्याचा धोका जवळपास संपुष्टात आला आहे. भविष्यात डेटा सुरक्षेला या तंत्रज्ञानाचे भक्कम कवच मिळण्याची शक्यता आहे. सध्या ‘डेटा’ला नवं ‘तेल’ म्हटलं जातं ते उगाच नाही.

भविष्याचा अचूक वेध घेणं हे तसं सोपं काम नसतं अन् प्रश्न जर माहिती-तंत्रज्ञानाशी अन् सायबर जगताशी संबंधित असेल, तर हे काम अधिकच कठीण होऊन जातं. येत्या दहा ते पंधरा वर्षांमध्ये माहिती-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात (आयटी) नेमके काय बदल होतील, याचा आताच अंदाज घेणं खूप कठीण आहे. याचे कारण या क्षेत्राशी संबंधित तंत्रज्ञान आणि अॅपमध्ये मागील काही दशकांमध्ये अभूतपूर्व म्हणावेत, असे बदल झाले आहेत. कोरोना काळामध्ये तर याच तंत्रज्ञानानं जगभरातील सर्वच क्षेत्रांतील कार्यपद्धतीला एक वेगळं वळण दिलं. कामाच्या पद्धती आणि वातावरणामध्ये खूप मोठे बदल झाले. खऱ्या अर्थानं कोरोना काळानंच या तंत्रज्ञानाची ताकद दाखवून दिली. याच तंत्रज्ञानाच्या प्रभावामुळं नवी दालनंही खुली झाली.

जगभरातील काही जाणकारांच्या मते, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मागील दोन वर्षांमध्ये जे बदल झाले, तेच बदल होण्यासाठी कोरोना नसता तर काही दशकांचा कालावधी लागला असता. मागील दोन वर्षांच्या काळामध्येच या क्षेत्राच्या मागण्या आणि गरजा यांच्यात अभूतपूर्व असे स्थित्यंतर पाहायला मिळाले. कोरोनाची तीव्रता कमी होताच अवतरलेल्या ‘न्यू नॉर्मल’नं याच तंत्रज्ञानाचं महत्त्व लोकांच्या लक्षात आलं. आता सगळ्यांचाच या आभासी जगामध्ये लीलया संचार सुरू आहे. ‘न्यू नॉर्मल’मधील गरजांनुसार या क्षेत्रातील वाढीचा वेग निश्चित होईल.

नव्या क्रांतीच्या दिशेने

सध्याच्या आधुनिक काळामध्ये सायबरविश्वाच्या सीमा अधिक विस्तारल्या आहेत. आजच्या अनेक नव्या तंत्रज्ञानांचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष याच सायबरविश्वाशी संबंध आहे. वेग हा तंत्रज्ञानाच्या सर्वच क्षेत्राचा अविभाज्य घटक बनल्याचे दिसून येतो. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) क्षेत्रात होणारे अभूतपूर्व असे बदल सायबर क्षेत्रावर सखोल परिणाम घडवतील. सध्या या सॉफ्टवेअर आणि अॅप्लिकेशन्सच्या विकासामध्ये आयटी तज्ज्ञांचा मोठा वाटा आहे. ‘एआय’ ज्या वेगानं विश्वासार्ह आणि मजबूत होत जाईल, त्या प्रमाणात मनुष्यबळाची गरज संपत जाणार आहे. ‘मशिन लर्निंग’ आणि ‘एआय’ यांच्या एकत्र येण्यामुळे एक नवी क्रांती होऊ शकते.

ब्लॉकचेन तंत्रज्ञानामुळं साठा केलेल्या माहितीत बदल करण्याचा आणि ती इतरांकडून हॅक होण्याचा धोका जवळपास संपुष्टात आला आहे. भविष्यात डेटा सुरक्षेला या तंत्रज्ञानाचे भक्कम कवच मिळण्याची शक्यता आहे. सध्या ‘डेटा’ला नवं ‘तेल’ म्हटलं जातं ते उगाच नाही. भविष्यात एखादा देश किंवा संस्थेच्या संपत्तीचे निकष हे ते त्यांच्याकडे साठा करण्यात आलेला ‘डेटा’ कशा पद्धतीनं वापरतात यावरूनही निश्चित होतील. भविष्यात डेटा सुरक्षेचे महत्त्व वाढत जाईल. एआय, बिग डेटा, इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी) आणि थ्री-डी प्रिटिंग यांच्यासारख्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून स्मार्ट कारखान्यांची उभारणी केली जाईल. सायबर क्षेत्रात होऊ घातलेल्या मोठ्या बदलांमुळे विद्यमान औद्योगिक उत्पादन प्रक्रियेत मोठे बदल होण्याची शक्यता आहे. कालपरवापर्यंत स्वयंचलित कार हे केवळ स्वप्न वाटत होतं; पण आज ते प्रत्यक्षात येताना दिसत आहे.

आयटीमधील आजमितीचा सर्वांत मोठा ट्रेंड हा बिग डेटा आणि अॅनेलॅटिक्स हा आहे. या माध्यमातून काही छुपे आकृतिबंध आणि त्यांचा परस्पर सहसंबंध स्पष्टपणे दिसू लागला आहे. तांत्रिक अंगानं जेव्हा एखाद्या माहितीचं विश्लेषण केले जातं, तेव्हा एखाद्याच्या विचार प्रक्रियेवर बारकाईने नजर ठेवली जाऊ शकते. सध्या ग्राहकांच्या वर्तनशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी याच तंत्रज्ञानाचा वापर केला जातो आहे. भविष्यामध्ये अशा प्रकारचं डेटा शोषण वाढणार असून व्यक्तीच्या आकलनशास्त्राचा वेध घेत त्यातून एखादी व्यक्ती आणि समाज यांचं मन वाचलं जाईल. समाज माध्यमांच्या विस्फोटाची प्रक्रिया सातत्यानं तुमच्याकडून काहीतरी वसूल करत राहील. राजकारणापासून ते उद्योगापर्यंत विविध क्षेत्रांवर याचे दूरगामी परिणाम होतील.

सायबर सुरक्षा हे जगासमोरील सर्वांत मोठं आव्हान असून त्याची तीव्रता आणखी वाढत जाईल. मागील काही दशकांतील ‘रॅन्समवेअर’चे वाढलेले हल्ले आणि सायबर तंत्राच्या माध्यमातून निवडणुकीत वाढलेलं हस्तक्षेपाचं प्रमाण हे स्पष्टपणं अधोरेखित करतं. कॉर्पोरेट हेरगिरीचे प्रमाण वाढले असून इलेक्ट्रिक ग्रीड आणि संरक्षण आस्थापनांवरील सायबर हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. डार्क वेबचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या आव्हानांना सामोरे जाऊ शकेल अशी जागतिक पातळीवरील यंत्रणा आज तरी आपल्याभोवती दिसून येत नाही. ही परिस्थिती नजीकच्या भविष्यात तरी बदलण्याची शक्यता नाही. अशा प्रकारच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी नेमके कोणते नियम असावेत, त्यासाठीची आचारसंहिता काय असावी, याबाबत वेगवेगळी मते आहेत.

दुसऱ्या बाजूला सायबर करन्सीची (बिटकॉइन) जगभरातील स्वीकारार्हता वाढताना दिसते आहे. भविष्यात जागतिक अर्थकारणाची सूत्रे ही केवळ डॉलरच्याच हाती नसतील तर सायबर करन्सीचीदेखील त्यात महत्त्वपूर्ण भूमिका असेल. हे आभासी चलन कितपत सत्यात येईल, याचं उत्तर येणारा काळच देऊ शकेल. या चलनाचा स्वीकार करताना देशांना मात्र फार काळजी घ्यावी लागेल, याचे कारण त्यांचा परिणाम व्यापारपेठा, स्टॉक एक्सचेंज आणि बॅँकिंग व्यवस्था या सगळ्यांवरच होणार आहे. भविष्यात क्वांटम तंत्रज्ञान खऱ्या अर्थानं गेमचेंजर ठरेल. आजमितीस जगातील अनेक संस्था या क्षेत्रात मूलगामी म्हणता येईल, असं संशोधन करत आहेत.

क्वांटम कॉम्प्युटिंग आणि क्वांटम क्रिप्टोग्राफीत एखादं मोठं संशोधन झालं, तर त्यामुळं संपूर्ण माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा चेहरामोहरा बदलून जाईल. सध्या जो ‘ओएस’ आणि ‘१- एस’चा खेळ अॅटम, फोनोस आणि इलेक्ट्रॉनमुळं सुरू आहे, त्यात आमूलाग्र बदल होऊ शकतो. क्वांटमआधारित व्यवस्था आणि यंत्रणा जेव्हा पोक्तपणाच्या विशिष्ट पातळीवर पोहचतील, तेव्हा त्यांची ताकद एक हजार पटीनं वाढेल, त्यामुळं या यंत्रणा महासंगणकालाही सहज ओव्हरटेक करू शकतील. अनहॅकेबल कॉम्प्युटिंग, विनिमय पद्धतीमध्येही त्यामुळे मोठे बदल संभवतात. सायबर क्षेत्राचं भवितव्य अनेक संधींनी परिपूर्ण असलं तरीसुद्धा सुरक्षेची आव्हानंही खूप मोठी आहेत. त्यामुळे या बदलांच्या वेगाशी जुळवून घेत भारताची सर्वांगीण प्रगती साधण्यासाठी त्याचा कसा उपयोग करता येईल, या धोरणदृष्टीची नितांत गरज या पुढच्या काळात आपल्याला आहे.

(अनुवाद ः गोपाळ कुलकर्णी)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com