ढिंग टांग : डिनर डिप्लोमसी! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ढिंग टांग

ढिंग टांग : डिनर डिप्लोमसी!

माझ्या तमाऽऽम आमदारांनो, जय महाराष्ट्र! गेले काही दिवस महाराष्ट्राच्या राजकारणात जे काही चालू आहे, त्यामुळे आपण सारे चिंतित असाल, याची मला जाणीव आहे. पण काय करु? हल्ली मीच घराबाहेर फारसा पडत नाही. आपल्या सर्वांची चिंता करीत मी घरातच बसलेला असतो. इडी नावाचा एक राक्षस सध्या मोकाट सुटला असून जनसेवेसाठी दिनरात झटणाऱ्या आपल्यासारख्या निरलस कार्यकर्त्यांच्या मागे तो राक्षस लागतो. या राक्षसाची भूक राक्षसी आहे. त्याच्यापासून सावध राहायला हवे. काहीही झाले तरी डगमगायचे नाही. हलायचे नाही की डुलायचे नाही. आमिषाला बळी पडायचे नाही नि ‘आ राक्षस मुझे खा’ असेही वागायचे नाही, हे आधी नीट समजून घ्या. थोडे कठीण आहे, पण टेन्शन आले की सगळे जमून जाते!!

रात्र वैऱ्याची आहे, हे मी तुम्हाला गेले कित्येक महिने सांगतो आहे. किंबहुना सांगून सांगून थकलो. आपल्या मित्रपक्षाच्या आमदारांनाही मी अधून मधून ‘रात्र वैऱ्याची आहे’ अशी सूचना देत होतो. कुटुंबप्रमुख म्हणून माझी ती जबाबदारीच आहे, असं मी समजतो. परंतु, मित्रपक्षातील आपल्या दोन सहकाऱ्यांनी अशी हयगय केली, त्यांच्या घरी पहाटे इडीचे लोक येऊन पोचले. पुढे त्यांचा मागमूस लागला नाही.

या कठीण काळात कसे वागावे, हे ठरवण्यासाठी आज रात्री महत्त्वाची डिनर बैठक आमच्या घरी आयोजित करण्यात आली आहे. तेव्हा साऱ्यांनी हजर राहावे. कोणीही दांडी मारु नये!

वैऱ्याची रात्र कशी काढावी? याबाबत काही मौलिक मार्गदर्शक सूचना सर्वांसाठी जारी करत आहे. त्याची हुकमेहुकूम तामिली करणे. या कामात हयगय करु नये. मार्गदर्शक तत्त्वे पुढीलप्रमाणे :

१. आपापल्या घराच्या खिडक्या दारे घट्ट लावून घ्यावीत. कड्या-कोयंडे दुरुस्त करुन घ्यावेत. इतकेच नव्हे तर खिडक्यांच्या तावदानाला काळे कागद (आतल्या बाजूने) चिकटवून घ्यावेत.

२. होताहोईतो घरातील दिवे लावू नयेत. खिशात नेहमी बारका टॉर्च बाळगावा.

३. कुठल्याही क्षणी दारावर टकटक होण्याची शक्यता आहे. लागलीच दार उघडू नये. घात होईल.

४. मोठमोठ्या आवाजात बोलू नये. बोलणाऱ्याला तोंडघशी पडायची वेळ येईल, याची नोंद घ्यावी.

५. इडीचे लोक रात्रपाळीतच काम करीत असावेत, असा संशय आहे. दिवसाढवळ्या यायला त्यांना काय धाड भरते, हे अद्याप कळलेले नाही. ही इडीची माणसे सभ्य नसावीत, हे तर उघडच दिसते. झोपण्याच्या वेळेत दुसऱ्याच्या घरी जाऊन दार वाजवणे, हे अत्यंत असंस्कृत, असभ्य आणि अडाणीपणाचे आहे, असे माझे स्पष्ट मत आहे.

६. नूडलची पाकिटे, अंडी-ब्रेड, बिस्कुटे-खारी आदी जीवनावश्यक माल घरी आणून ठेवावा. दोन वर्षांपूर्वी कोरोनामुळे लॉकडाऊन करावा लागला होता. तसा लॉकडाऊन सध्या इडीमुळे करावा लागेल की काय, याचा विचार आपला टास्क फोर्स करत आहे.

७. टास्क फोर्सच सध्या घरात बंदिस्त झाला असल्याने निर्णयाला थोडा वेळ लागेल.

८. महत्त्वाचे : आज रात्री प्रत्येकाने गपचूप (वेषांतर करुन) घराबाहेर पडावे व लपत छपत आमच्या घरी जेवायला यावे. जेवताना आपल्याला पुढील रणनीती ठरवायची आहे.

९. जेवायला (आमच्याकडे) येण्यापूर्वी घरी जेवूनच यावे!!

१०. डरना मना है! डर के आगे जीत है! जो डर गया, समझो... कमळ पार्टी में गया!

बाकी प्रत्यक्ष भेटीत.

जय महाराष्ट्र.

Web Title: Sakal Special Marathi Editorial Dhing Tang Article Drl98

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :SakalEditorial Article