पुन्हा पेटवू पराक्रमाच्या मशाली!

पानिपतच्या युद्धाचा गौरवशाली इतिहास समजून घेण्यासाठी ‘पुणे ते पानिपत आणि पानिपत ते शिवनेरी’ अशा ‘पानिपत गौरवगाथा अभियाना’चे आयोजन केले आहे.
panipat
panipatsakal
Summary

पानिपतच्या युद्धाचा गौरवशाली इतिहास समजून घेण्यासाठी ‘पुणे ते पानिपत आणि पानिपत ते शिवनेरी’ अशा ‘पानिपत गौरवगाथा अभियाना’चे आयोजन केले आहे.

- संदीप महिंद

पानिपतच्या युद्धाचा गौरवशाली इतिहास समजून घेण्यासाठी ‘पुणे ते पानिपत आणि पानिपत ते शिवनेरी’ अशा ‘पानिपत गौरवगाथा अभियाना’चे आयोजन केले आहे. हे अभियान सात ते २६ जानेवारी या दरम्यान दुचाकी रॅलीच्याद्वारे पूर्ण केले जाणार आहे. पानिपत युद्ध आणि आपल्या वीरांचा पराक्रम या निमित्ताने युवक पिढीला समजून घेता येणार आहे.

दहा वर्षांपूर्वी पानिपताच्या ऐतिहासिक रणसंग्रामास २५१ वर्षे पूर्ण झाल्याचे निमित्त साधून आम्ही शिवप्रभुंचे धारकरी आपल्या पराक्रमी पूर्वजांना भावांजली अर्पिण्यासाठी पानिपताच्या बलिदानभूमीवर गेलो होतो. मोहिमेत आठ राज्ये व ७६ जिल्ह्यांतून प्रवास करताना आपण उत्तर भारतास महाराष्ट्राशी स्नेहरज्जूने सांधण्याचा प्रयत्न केला. ‘आमची मातृभूमी-आमचंच शासन’ हीच जाज्वल्य भावना उराशी कवटाळून दिल्लीसह संपूर्ण उत्तर हिंदुस्थानाचं प्राणपणानं रक्षण करण्याचा वसा घेतलेले दत्ताजीराव शिंदे १७६०च्या १० जानेवारीस यमुनेच्या काठावरील बुराडी घाटावर झालेल्या भयंकर युद्धात धारातीर्थी पडले. त्यांच्या मृत्यूचा वचपा घेण्याच्या दुर्दम्य इच्छाशक्तीनं पछाडलेले मराठी योद्धे आग्रा, दिल्ली, कुंजपुरा जिंकून देशसीमा रक्षणार्थ सर्वथा सिद्ध होते. तथापि, १४ जानेवारी १७६१च्या पानिपताच्या युद्धानंतर काहीशा गलितगात्र झालेल्या मराठी सत्तेच्या तत्कालिक असहाय्यतेचा फायदा ‘ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी’ने घेतला. पानिपताच्या युद्धात मराठी सत्तेचे अल्पकालीन का होईना खच्चीकरण झाले नसते, तर या देशावर गुलामीचा युनियन जॅक फडकविण्याची वेळ आली नसती. इतिहासात ‘जर-तर’ला काहीच अर्थ नसतो, हेही खरेच.

पानिपताच्या युद्धाचं, मराठ्यांच्या देदीप्यमान पराक्रमाचं स्मरण या देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षांत करताना आपल्या पिढीला सहज मिळालेलं हे स्वातंत्र्य तरी चिरस्थायी व्हावं म्हणून बोध घेऊयात. हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीत जीवनार्पण करणाऱ्या प्रत्येक मराठी वीराचा वंशज म्हणून आता प्रत्येकाने कंबर कसली पाहिजे. यासाठीच ‘सशक्त भारत’ या ७६ संस्थांच्या संकल्पसमूहाने ‘पानिपत गौरवगाथा जागरण अभियान’ आखले आहे.

काय आहे अभियान?

देशाला सशक्त करण्यासाठी स्वतःला सशक्त केले पाहिजे. त्याची परीक्षा घेणारी ही ३,५२३ किलोमीटर आणि २१ दिवसांची दुचाकी (बाईक) रॅली जाणार आहे. लाल महाल ते श्री शनिवारवाडा मार्गे निघणारी ही रॅली पानिपतला जाऊन माघारी शिवनेरीपर्यंत येणार आहे.

भारताची पश्चिम सीमा व उर्वरित उत्तर भारतास आध्यात्मिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक आदी सर्वच आधारांवर जोडणारी ही मोहीम आहे. देश घडविण्यासाठी आणि देशाच्या रक्षणासाठी मराठ्यांचे पूर्ण योगदान पूर्वी होते. आताही आहेच आणि पुढेही असणारच. त्याची नांदी म्हणजेच हे पानिपत गौरवगाथा अभियान अर्थात कृतज्ञता जागरण मोहीम. जगातील सर्वाधिक तरुणांचा देश म्हणून जागतिक पटलावर लक्ष वेधून घेत असलेल्या आपल्या देशाच्या इतिहासात पुढील २०-३० वर्षे अतिशय महत्त्वाची आहेत. तेथे शौर्य, पराक्रम आणि कर्तृत्व गाजविण्यासाठी आसुसलेल्या तरूणांना एकत्र आणणे ही काळाची गरज आहे. जात-पात, धर्म, भाषा, प्रांत यांना थारा न देता उदात्त ध्येयाने आणि मनगटात जग बदलण्याची हिंमत असणाऱ्या प्रत्येक मराठी तरूणाला बळ देणारी ही मोहीम आहे.

मोहिमेचा मार्ग

- पुणे, आळंदी, वढू, सिंदखेडराजा, बुऱ्हाणपूर, श्रीरावेरखेडी, हंडिया घाट, सिरोंज, भरतपूर, पानिपत, दिल्ली, आग्रा, ग्वाल्हेर, इंदूर, महेश्वर, धुळे, नाशिक, आणि शिवनेरी - ३७ भूईकोट किल्ले, सात गिरीदुर्ग, २७ तीर्थक्षेत्र

मोहिमेचा कालावधी - ७ ते २६ जानेवारी

एकूण मुक्काम - २० दिवस

अभियानात सहभागासाठी संपर्क -

panipat250@gmail.com

yuvasangam2024@gmail.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com