शिक्षक होण्याचे भाग्य!

santosh talekar
santosh talekar

दोन दिवसांच्या किरकोळ रजेनंतर शाळेच्या प्रांगणामध्ये पाऊल टाकलं अन्‌  प्रांगणातील आपल्याच कामात मग्न असलेल्या मुलांच्या घोळक्‍याकडे पाहून मुख्याध्यापक फक्त दोन शब्द पुटपुटले... ‘आलोच हं, तुमच्या सरांना घेऊन..!’ मुले त्यांच्या कामात मग्न होती; पण हे शब्द पडताच ती एकदम उल्हसित झाली. त्यांना कोणता आनंद झाला होता कोणास ठाऊक? मुलांनी लगेच मला गराडा घातला व ‘सर आले’, ‘सर आले’ म्हणून ती गलका करू लागली. त्यांनी प्रश्नांचा भडिमारच सुरू केला. ‘सर, कधी आलात?’ ‘प्रवास कसा झाला?’ प्रश्न विचारतानाचे त्यांचे हावभाव, त्या चिमुकल्या मुलांचा चेहऱ्यावरील आनंद मी शब्दांत नाही मांडू शकत. टचकन डोळ्यांत पाणी आले. आजपर्यंत शाळेबद्दल-मुलांबद्दल-शिक्षकांबद्दल कुठंतरी ऐकलं होतं, वाचलं होतं; परंतु आज हे सर्व आपल्या बाबतीत घडलं, याचा मी अनुभव घेतला आणि भरून पावलो. कसे तयार झाले हे नाते, याचा विचार करू लागलो.
आपले सकाळचे शाळेतले पहिले पाऊल मुलांच्या सोबतीने सुरू होते आणि सांजही त्यांचा निरोप घेत होते. या मधल्या काळात म्हणजे दिवसभरात आपल्या हालचालींवर, आपल्या देहबोलीवर चिमुकल्यांचे बारीक लक्ष असते. आपला पोशाख कोणता, आपले बोलणे, चालणे; एवढेच कशाला तर शिक्षकांचे नखशिखान्त असे निरीक्षण मुले करीत असतात. टीपकागदासारखी प्रत्येक गोष्ट टिपून घेत असतात. त्यामुळे शिक्षक म्हणून आपली जबाबदारी कितीतरी वाढते. आपले हे अनन्यसाधारण स्थान लक्षात घेऊनच या विद्यार्थ्यांशी बोलायला-वागायला हवं, असं मला आवर्जून सांगावंसं वाटतं. शिकवता शिकवता आपल्यालाही खूप काही शिकायला मिळतं.
पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्‍यातील खनिव येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकवताना हे जे अनुभव आले, ते सगळ्यांबरोबर, विशेषतः शिक्षकांबरोबर वाटून घ्यावेत म्हणून हा लेखनप्रयत्न. येत्या शिक्षकदिनाचे औचित्य साधून. सुपीक जमिनीवर नंदनवन फुलवणे सोपे असते; परंतु खडकाळ माळरानावर नंदनवन फुलवणे अवघड. हे आव्हान शिक्षकांपुढचे आहे. ते पार पाडताना आपण केवळ शिक्षक नव्हे, तर या चिमुकल्यांचे पालकच आहोत, याची जाणीव सदैव ठेवावी लागते. आदिवासींची बरीच वस्ती असलेल्या भागात काम करतानाही बाहेरच्या जगातील इंग्रजी माध्यमाच्या आणि शहरांतील तशाच अन्य काही मातब्बर शाळांशी नकळत तुलना होतेच. एकीकडे त्या स्पर्धेची जाणीव आणि दुसरीकडे या भागाचे, इथल्या जीवनशैलीचे, वैशिष्ट्यांचे भानही ठेवायचे, अशी काही आव्हाने असली तरी या लहानग्यांना शिकविणे हा एक नितातंसुंदर अनुभव असतो. प्रत्येक मूल हे आमच्यासाठी एक नवा प्रबंधच! त्यावर आम्हाला रोज नवीन प्रयोग करण्याची संधी मिळते हेसुद्धा भाग्यच!  शिक्षकांनी स्वतःला भाग्यवान समजले पाहिजे. त्या धन्यतेच्या भावनेतून काम केले तर केवढा मोठा बदल साकारेल!

आदिवासी मुलांची बोलीभाषा ही प्रमाण भाषेपेक्षा कितीतरी वेगळी आहे. मी ज्या वेळी सुरवातीला या भागात नोकरीस लागलो, तेव्हा ही नोकरी नको वाटायची. मी नोकरीचा पहिला दिवस कधीच विसरू शकत नाही. मी ‘जिल्हा परिषद शाळा रानशेत गेटीपाडा’ या वस्तीशाळेत पहिले पाऊल टाकले. तेथे गेलो तर जानेवारी महिना असल्याने नव्वद टक्के पालक हे वीटभट्टीवर कामासाठी वसई, विरार भागात, तसेच गुजरातमध्ये गेले होते. शाळा सुरू होण्याची वेळ झाली तरी एकही मूल आले नाही. कोणी चिंचेच्या झाडावर होते, तर कोणी आंब्याच्या. मग त्यांच्या कलाने घेत हळूहळू त्यांच्यात शिकण्याची गोडी निर्माण करावी लागली. त्यांच्या बोलीचा उपयोग करून त्यांच्याशी संवाद साधावा लागला; पण सततच्या प्रयत्नाने नक्कीच परिस्थिती बदलते. सहा वर्षांनंतर बदली होऊन मी खानिव शाळेत आलो. तेथे शिक्षकांनी सर्व शाळांसाठी अनेक देणगीदार शोधून काढले. पालकांचे सहकार्य घेतले आणि या भागाचा कायापालट केला आहे. सर्व शाळा डिजिटल केल्या आहेत. अनेक मुले स्पर्धा परीक्षेत, खेळात नावलौकिक मिळविताना दिसत आहेत.

शिक्षक, पालक एकत्र आले तर काय बदल घडू शकतात, याचा हा वस्तुपाठ. त्यातही शिक्षकाचे महत्त्व अपरंपार. विद्यार्थ्यांमध्ये पालकापेक्षाही आपले महत्त्व जास्त आहे, असेच मला वारंवार दिसून आले. शाळा- विद्यार्थी-शिक्षक यांच्यात एक ऋणानुबंध, एक जिव्हाळा निर्माण व्हावा, असे मला वाटते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com