हुशार कोण?

डॉ. सपना शर्मा
मंगळवार, 28 फेब्रुवारी 2017

‘माझ्यासोबत काम करणारे सगळेच हुशार आहेत; पण मी तेवढा हुशार नाही म्हणून मला सारखं टेन्शन येतं,’ अशी स्वतःविरुद्ध तक्रार घेऊन बरीच मंडळी माझ्याकडे समुपदेशनासाठी येत असतात. आपल्या देशात अजूनही नैराश्‍य विकोपाला गेल्यानंतरच समुपदेशनाचा विचार केला जातो. त्यामुळे ही मंडळी बऱ्याच दिवसांपासून किंवा वर्षांपासून अशा निराशेत जगत असतात. 

‘माझ्यासोबत काम करणारे सगळेच हुशार आहेत; पण मी तेवढा हुशार नाही म्हणून मला सारखं टेन्शन येतं,’ अशी स्वतःविरुद्ध तक्रार घेऊन बरीच मंडळी माझ्याकडे समुपदेशनासाठी येत असतात. आपल्या देशात अजूनही नैराश्‍य विकोपाला गेल्यानंतरच समुपदेशनाचा विचार केला जातो. त्यामुळे ही मंडळी बऱ्याच दिवसांपासून किंवा वर्षांपासून अशा निराशेत जगत असतात. 

माझ्या वीस वर्षांच्या समुपदेशनाच्या अनुभवांमुळे, सहजच कुणी स्वतःवर केलेले आरोप मी मान्य करीत नाही. त्यामुळे माझा त्यांच्यासाठी प्रश्‍न असतो, ‘तुमच्या लेखी हुशार म्हणजे कोण?’ या प्रश्नाचे उत्तर सहजपणे कुणी देऊ शकत नाही आणि दिलेच तर कुठले तरी तुलनात्मक मापदंड वापरले जातात. ‘मला शाळेत तसे कमीच मार्क मिळायचे.’ ‘मला हवं असलेलं कॉलेज मिळू शकलं नाही’ किंवा ‘अमुक करायचं होतं, पण करू शकलो नाही,’... म्हणून मी हुशार नाही. 

परंतु, हुशारीची ही व्याख्या आपल्याला सांगितली कुणी? आणि अशी हुशारी असेल तरच आपण आयुष्यात यशस्वी होऊ शकतो, हे आपण का गृहीत धरून चालतो? समाज आपल्याला अशा बऱ्याच व्याख्या देत असतो. स्मार्ट, हुशार, सुंदर, चांगला, वाईट या सारखे शब्द देऊन काही उदाहरणांप्रमाणे त्यांच्या पक्‍क्‍या व्याख्याही ठरवून टाकतो. आपण त्या शब्दांनाच अंतिम सत्य मानून स्वतःला त्यांच्यात बसवण्याचा प्रयत्न करतो; परंतु शब्दांना मर्यादा असते. 

महान वैज्ञानिक अलबर्ट आईन्स्टाइन यांना लहानपणी शाळेत हळू शिकणारा असे म्हटले जायचे. पुढे त्यांनी विज्ञानाच्या जगात नाव कमावले, तेव्हा तेच लोक त्यांची तारीफ करू लागले; पण स्वतःबद्दल बोलताना आईन्स्टाइन म्हणाले, ‘‘मी खूप स्मार्ट किंवा हुशार नाही. मी प्रत्येक समस्येला भरपूर वेळ देतो आणि मला तिचे उत्तर सापडते.’’ 

आणि इथेच बहुतांश लोक कमी पडतात. समस्या कुठल्याही रूपात असो, तिचे उत्तरही तिच्यातच असते; परंतु आपल्यात सहनशीलता कमी आहे आणि चिकाटीही. आपल्याला रेडिमेड म्हणजे तयार उत्तरे हवी असतात. ती न मिळाल्यास आपण हताश होतो आणि स्वतःला किंवा दुसऱ्याला किंवा नशिबाला दोष देतो.  

मी दोन मुद्यांवर काम करते. कुठलेही काम माझ्या प्रयत्नांनंतरही पुढे सरकत नसेल, तर मी स्वतःला प्रश्न विचारते: मी शक्‍य तेवढी मेहनत घेतली काय? आणि मेहनत कमी नसेल, तर मी कुणातरी जाणकारांकडून शिकण्याचा प्रयत्न करते; परंतु कुठल्याही वेळी मी स्वतःच्या बुद्धीविषयी शंका घेत नाही किंवा इतर कुणालाही तसे करण्याची मुभा देत नाही. 

तुम्ही काय करता?

Web Title: sapna sharma article