मागचं पान 

डॉ. सपना शर्मा
मंगळवार, 21 मार्च 2017

तुम्ही वाचक आहात म्हणजे बरीच पुस्तकं वाचत असाल. वाचकाला नेहमीच पुढं काय होईल, अशी उत्सुकता लागली असते. पुढं जाण्याच्या जिज्ञासेपायी आपण एकदा वाचलेली मागची पानं उलटून पाहत नाही. महत्त्वाच्या संदर्भासाठी गरज नसेल, तर सहसा कुणीच मागच्या पानांवर रेंगाळत नाही आणि महत्त्वाचं म्हणजं मागच्या पानावर कितीही दुःख किंवा कष्ट रेखाटले असतील तरी आपण या आशेनं वाचत राहतो, की पुढे काही न काही चांगलंच होणार. 

आपल्या आयुष्यात मात्र आपण वेगळेच वागतो. आयुष्याच्या एखाद्या पानावर थोडा जरी दुःखाचा किंवा मतभेदांचा डाग असला, तरी आपण त्याच पानाभोवती घुटमळत राहतो. तेच तेच दुःख पाहून, वाचून आपल्याला त्रास होत असतो. तो त्रास आपण आपल्या आप्तेष्टांकडेही हस्तांतर करत असतो. आयुष्यातील किती महत्त्वाचे क्षण, दिवस आणि वर्षं असेच निसटून जातात याकडं आपलं लक्षही नसतं. 

कालांतरानं जेव्हा पुढच्या पानांवर नवीन रंग, नवीन उमेद, आनंद आणि प्रेम लिहिलं जात असतं, त्या वेळीही आपण त्याच जुन्या पानांचा कीस काढत बसलेलो असतो. ‘तो असं का वागला? मी बोलावलं होतं तरी आला नव्हता... तिला माझं चांगलं बघवत नव्हतं... माझ्या यशाबद्दल तिनं अभिनंदन केलं नव्हतं ... मागल्या वेळी मी व्यासपीठावर बोलण्यात चूक केली होती, लोक आताही मला हसतील....’ एक ना अनेक... प्रत्येकाकडं काही ना काही वैयक्तिक कारणं आहेतच. काही लोक तर भूतकाळातील कुठल्यातरी अल्प यशालाच धरून बसतात. 

कुठंतरी मला हे जाणवतं, की आयुष्याच्या मागच्या पानावर जाऊन बसणं ही एक सवय आहे, जी बरेच लोक लावून घेतात. हो लावूनच घेतात. जन्मतः आयुष्य कसं असेल हे कुणालाच माहीत नसतं. त्यामुळे आयुष्याचा हा प्लॅन जन्मतःच असा असण्याची शक्‍यता नाहीच; परंतु जसजशी आयुष्यातील आव्हानं वाढत जातात, तसतसे लोक दोन प्रकारांमध्ये वाटले जातात. एक- आपल्या आयुष्याचा दोर आपल्या हातात घेऊन प्रत्येक परिस्थितीला सामोरे जाऊन आपला रस्ता बनवणारे आणि दोन - जे प्रत्येक दोरीचं एक टोक भूतकाळातील कुठल्यातरी व्यक्तीशी किंवा घटनेशी बांधून ठेवतात आणि मग जेव्हा त्यांचं आयुष्य पुढं सरकत नाही, तेव्हा ते त्या दोरीकडं आणि त्या दोरीला बांधलेल्या भूतकाळातल्या घटनेकडं बोट दाखवून आपलं नैराश्‍य व्यक्त करतात. 

तो दोर तुम्हीच बांधून ठेवलाय आणि तुम्ही कधीही सोडून देऊ शकता. मागचं पान तुम्ही वाचलंत आणि ते संपलं. आता पुढं वाचायला हवं.

Web Title: sapna sharma article