उत्साहाचा पाया

डॉ. सपना शर्मा
मंगळवार, 18 एप्रिल 2017

काही वर्षांपूर्वीचीच गोष्ट. आयुष्यातील खरोखरच कठीण काळ होता. काहीच बरोबर होत नव्हतं. आजपर्यंत आयुष्यात जे जे महत्त्वाच्या स्थानी होतं, ते सगळंच हातातून निसटत चाललंय असं वाटायला लागलं होतं. त्यातच डिप्रेशन! असा तो काळ. पुढं काय? याचं उत्तर कुठंच दिसत नव्हतं. अशा वेळी सर्वांत कठीण काही असतं, तर ते म्हणजे सकाळी अंथरुणातून उठून दिवसाची सुरवात करणं. तसं न केल्यास, अंथरुणात उशिरापर्यंत पडून राहिल्यानं मन आणखीनच खचतं. आपल्या आसपासचं जग कामाला लागलेलं असताना आपण किती निकामी आहोत, असा एकदा विचार मनात शिरला, की मग नकारात्मक विचारांचं जाळं विणलं जातं.

काही वर्षांपूर्वीचीच गोष्ट. आयुष्यातील खरोखरच कठीण काळ होता. काहीच बरोबर होत नव्हतं. आजपर्यंत आयुष्यात जे जे महत्त्वाच्या स्थानी होतं, ते सगळंच हातातून निसटत चाललंय असं वाटायला लागलं होतं. त्यातच डिप्रेशन! असा तो काळ. पुढं काय? याचं उत्तर कुठंच दिसत नव्हतं. अशा वेळी सर्वांत कठीण काही असतं, तर ते म्हणजे सकाळी अंथरुणातून उठून दिवसाची सुरवात करणं. तसं न केल्यास, अंथरुणात उशिरापर्यंत पडून राहिल्यानं मन आणखीनच खचतं. आपल्या आसपासचं जग कामाला लागलेलं असताना आपण किती निकामी आहोत, असा एकदा विचार मनात शिरला, की मग नकारात्मक विचारांचं जाळं विणलं जातं. ‘माझंच आयुष्य इतकं वाईट का?’ पासून ‘माझ्या आयुष्याला काहीच अर्थ नाही’...पर्यंत सगळे विचार पिंगा घालत सुटतात. 

पण तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगते. असा आळस, अशी निराशा ही फक्त कठीण वेळी किंवा डिप्रेशनसारख्या आजारातच येते असं नाही. मला बरीच मंडळी अशी भेटतात, की ज्यांना सूर्य उगवण्याची भीती असते. कारण मग उठावं लागतं, लवकर आटपावं लागतं आणि कामावर किंवा शिकायला जावं लागतं. तुमच्या किंवा तुमच्या नातलगांपैकी कुणाची ही समस्या आहे काय? 

जीवन असं निराशेत जगण्याची सक्ती कुणावरच होऊ नये आणि दिवसाची सुरवात अशी असेल तर अख्खा दिवस कसा जात असेल हे ज्याचं त्यालाच कळतं; परंतु तुम्हाला कसं जगायचं आहे, हे तुम्ही कुठल्याही परिस्थितीत स्वतः निवडू शकता. तेव्हा सर्वांत आधी स्वतःलाच प्रश्न विचारा, की मला सकाळी उठल्यानंतर जे करायचं आहे ते करण्यात मला उत्साह, आवड, रस आहे काय? बहुतांश भारतीय कुठल्यातरी दडपणाखाली जगतात. ज्या कारणांमुळे आपण जो व्यवसाय, नोकरी किंवा शिक्षण पत्करलं आहे ते जमत नसेल, आवडत नसेल, तरी आयुष्यभर तेच करत राहणं आवश्‍यक आहे असं काहीसं ते दडपण. बरं याबद्दल कुणाशी बोलावं म्हटलं, तर बरेच जण पाठ थोपटत म्हणतात, ‘सगळ्यांचं असंच असतं रे’ आणि उरलीसुरली आशासुद्धा विरून जाते. ‘हेच करायचं? आयुष्यभर?’ मग सकाळी उठण्यात उत्साह कुठून येणार? 

पण तुम्ही हे बदलू शकता. आयुष्यात प्रत्येक वळणावर एक तरी नवीन लक्ष्य असायला हवं. लहान किंवा मोठं हे महत्त्वाचं नाही; पण ते तुमच्या आवडीचं नक्कीच असायला हवं. ते पैसे कमवण्यासाठी आहे काय हेही महत्त्वाचं नाही. काम आवडत नसेल तर ते कसं बदलता येईल, याबद्दल जाणकारांशी चर्चा करा. काहीही अशक्‍य नाही. रोज सकाळी अंथरुणातून उठताना उत्साह वाटेल असे लहान- मोठे लक्ष्य नेहमी आयुष्यात असावं. जगणं आणि आयुष्यात टिकून राहणं यात फरक आहे. जे जगतात ते आयुष्यातील उत्साह टिकून राहील याच प्रयत्नात असतात आणि नवनवीन लक्ष्य या उत्साहाचा पाया असतो. एकदा प्रयत्न तर करून पाहा.

Web Title: sapna sharma article on joy