गरज मानसिकता बदलण्याची 

 सारंग खानापूरकर 
रविवार, 23 फेब्रुवारी 2020

प्रश्‍न केवळ गुजरातचा नाही, तर एकूणच सर्व ठिकाणच्या समाजाच्या मानसिकतेचा आहे. महिलांच्या मासिक पाळीकडे समाजाची पाहण्याची दृष्टी हा मानसिक विकासातील मोठा अडथळा ठरत आहे.

गेल्या पंधरवड्यात गुजरातमध्ये घडलेल्या दोन घटनांमुळे या राज्याची इभ्रत वेशीवर टांगली गेली आहे. पहिली घटना साधारण काही दिवसांपूर्वी भूज जिल्ह्यात घडली. येथील एका मुलींसाठीच्या महाविद्यालयातील वसतिगृहाच्या आवारात सॅनिटरी पॅड आढळून आल्यानंतर प्रशासनाने ६८ मुलींना कपडे काढायला लावत त्यांना मासिक पाळी आहे की नाही, त्याची तपासणी केली. हा प्रकार मुलींसाठी अत्यंत अवमानजनक होता आणि चौकशीसाठी समितीची स्थापना झाली असली तरीही अद्याप याविरोधात कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही. वसतिगृह प्रशासनाने आपल्या कृत्याचे समर्थन करताना नियमांवर बोट ठेवले आहे. दुसरा प्रकार दोनच दिवसांपूर्वी सुरत येथे घडला. सुरत महापालिकेच्या रुग्णालयात प्रशिक्षणार्थी महिलांना एकाच खोलीत नग्न करून त्यांची गर्भचाचणी घेण्यात आली. येथेही, चाचणी नियमानुसार केल्याचे सांगितले गेले. मात्र, महिलांची स्वतंत्रपणे तपासणी करणे आवश्‍यक असताना रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना एकाच खोलीत आणून तपासणी करत त्यांचा अवमान केला आहे. या प्रकरणीही चौकशी समिती स्थापन झाली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी ई-सकाळचे ऍप डाऊनलोड करा 

वरील दोन्ही घटनांमध्ये चौकशी समितीच्या तपासानंतर दोषींवर कारवाई होईलही, मात्र विकासाच्या मार्गावर सर्वांत पुढे असल्याचा आव आणताना आपण कोणती मानसिकता घेऊन वावरत आहोत?, आपली विकासाची व्याख्या काय?, जगाची आध्यात्मिक राजधानी म्हणून मिरविणारा भारत पुढील पिढीकडे केवळ भौतिक विकासांचाच वारसा सोपविणार का?, असे प्रश्‍न उभे राहतात. महिलांवरील अत्याचारांना प्रसिद्धी मिळून त्यांची दखल घेण्याचेही प्रमाण वाढले आहे. मात्र, यामुळे महिलांवरील अत्याचारात खरोखरीच घट झाली आहे, समाज जागृत झाला आहे, असे म्हणण्यासारखी परिस्थिती नाही. गुजरातमधील वरील दोन्ही घटनांनंतर सोशल मीडियावरून गुजरात सरकारवर बरीच टीका झाली. या टीकेच्या जोरामुळेच चौकशी समित्या स्थापन झाल्या. मात्र, छोट्या-छोट्या गोष्टींवरून एकमेकांचे वाभाडे काढणाऱ्या राजकीय पक्षांनी फारशी तीव्र प्रतिक्रिया दिली नाही की पक्षातर्फे मोर्चे काढले नाहीत. 

प्रश्‍न केवळ गुजरातचा नाही, तर एकूणच सर्व ठिकाणच्या समाजाच्या मानसिकतेचा आहे. महिलांच्या मासिक पाळीकडे समाजाची पाहण्याची दृष्टी हा मानसिक विकासातील मोठा अडथळा ठरत आहे. पंजाबमध्येही दीड-दोन वर्षांपूर्वी सॅनिटरी पॅड सापडल्याने विद्यार्थीनींची तपासणी करण्याचे प्रकार घडले होते. इतर राज्यांतही ‘बाजूला’ बसण्याचे प्रकार घडतात. ‘मासिक पाळी सुरु असलेल्या महिलांनी अन्न शिजविले आणि ते इतरांना वाढले, तर त्यांना पुढील जन्म कुत्र्याचा मिळतो,’ असे विधान भूजच्या घटनेनंतर गुजरातमधील एका तथाकथित धर्ममार्तंडाने केले होते. अशी मानसिकता महिलांना, समाजाला पुढे नेणार का? या धर्ममार्तंडांच्या विधानाला आव्हान म्हणून दिल्लीतील ‘सच्ची सहेली’ या सामाजिक संस्थेने ‘पिरियड फिस्ट’चे आयोजन केले असून यामध्ये मासिक पाळी आलेल्या महिला अन्न शिजवून त्यांच्या कुटुंबीयांना आणि इतरांना खायला घालणार आहेत. मासिक पाळीबद्दल समाजात प्रचलित असलेल्या चुकीच्या संकल्पना दूर केल्यातर महिलांना होणारा मानसिक त्रास मोठ्या प्रमाणावर कमी होईल, असे मत ‘सच्ची सहेली’च्या संचालिका आणि स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सुरभी सिंह यांचे म्हणणे आहे. गुन्हा करणाऱ्याला शासन करणे तुलनेने सोपे असते. मात्र, गुन्ह्याची मानसिकता, त्याला पोषक असणारे वातावरण बदलणे हे एकट्या-दुकट्याचे काम नाही. त्यासाठी समाज प्रगल्भ होणे आवश्‍यक आहे. त्यामुळेच, समाजाचे नेते म्हणवून घेणारे लोक ज्या वेळी वादग्रस्त विधाने करतात, त्या वेळी ‘फालतू बडबड’ म्हणून त्याकडे दुर्लक्ष न करता, त्या विधानाचा सर्व स्तरांमधून तत्काळ निषेध व्हायला हवा. तरच, अशी विधाने करणाऱ्यांवर सामाजिक दबाव निर्माण होईल. कारण या नेत्यांचे नाव घेतले की ‘विज्जय असो’ म्हणणारे अनेक समर्थक असतात. त्यांनाही चाप बसणे आणि त्यांचेही सामाजिक शिक्षण आवश्‍यक आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sarang khanapurkar article Need to change mindset