हौस ऑफ बांबू : ...हॅप्पी मराठी डे इज राऊण्ड द कॉर्नर!

Hous-of-Bamboo
Hous-of-Bamboo

नअस्कार! कालच मला एक व्हॉट्‌सअपवर मेसेज आला : ‘हाय, एनी प्लान्स फॉर मराठी लॅंग्वेज डे नेक्‍स्ट वीकेंड?’ म्हटलं : ‘‘ओह, प्लेंटी! आय हॅव अ वीक लाँग प्लान!’’ त्यावर अंगठे, स्मायली, बदाम, चुम्मे वगैरे. (खुलासा : चुम्म्याचीही एक स्मायलीच असते हं! उगीच तुमचं काहीतरी...) ‘‘लेटस सेलेब्रेट मराठी डे’’ असं त्याच्यासोबत आवाहन होतं. शिवाय एक ऑडिओ क्‍लिप : लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी...

तुम्ही विचाराल कोणाचा मेसेज आला? खोटं वाटेल सांगितलं तर. साक्षात अमिताभचा! आता कामाधामानिमित्त माझी या कलावंतांमध्ये उठबस असते. (उठ अधिक, बस कमी!) त्यामुळे, व्हॅलेंटाइन डे असो, मदर्स डे असो, दसरा डे असो किंवा हॅप्पी न्यू इयर असो, आमची मेसेजामेसेजी होत्येच. (‘‘सरु, यु आर सो क्‍यूट’’ असं रणदीप हुडा म्हणाला होता मागे! खुखु... वेडाच्चे!!) करण जोहर तर ‘‘पार्टीला आज कुठला ड्रेस घालू? आय हॅव नथ्थिंग टु विअर...’’ असंही विचारतो. ते जाऊ दे. यंदाचा मराठी लॅंग्वेज डे ऑनलाइन सेलेब्रेट करायचा का, असं विचारायला या डझनभर बॉलिवुडच्या सिताऱ्यांनीही फोन आणि मेसेज केले. महाराष्ट्र ही माझी दुसरी मां आहे, असं सगळ्यांनी गदगदून सांगितलं. असं म्हणताना, ते तोडकंमोडकं मराठी बोलूनही दाखवतात. मी टाळ्या वाजवत्ये! खरंच, कुणीही मराठी बोललं की मला भारी आनंद होतो.

मला तर ‘मराठी राजभाषा’ दिन म्हटलं की भरुनच येतं. दिवाळी-दसऱ्याला आपण चितळ्यांचं श्रीखंड आणतो की नाही, तस्सं मराठी दिनालाही आणावं असं भारी वाटतं. पण दुर्दैव! मराठी भाषा दिन मंथेंडला येतो. २७ फेब्रुवारी ही काय सेलेब्रेशनची तारीख झाली? महिनाअखेरीला मराठी घरांमध्ये खिचडी-पापडाशिवाय बेत नसतो. श्रीखंड कोणाला पर्वडणार? जाऊ द्या.

पण मी मात्र यंदा मराठी दिनाला किमान एक चॉकलेट आणून खाणार आहे. सदानकदा पाचवीला पुजलेली मंथेंड आणि त्यात कोरोनाचे निर्बंध. नाही तर गणेश कला क्रीडा केंद्रात (पुणे!) तीन तासाचा कार्यक्रम ठेवून अमिताभ बच्चन यांना पुन्हा बोलावून ‘लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी’ ही भटसाहेबांची कविता नीट म्हणायला लावली असती.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मराठी दिनाच्या आदल्या दिवसापास्नंच व्हाट्‌सअप मेसेजेसची टुंग टुंग सुरु होते. त्यात काही नवल नाही. हल्ली सर्वपित्री अमावस्येच्या शुभेच्छाही येतात! पण मी यंदा ठरवलंय, काहीही करुन मराठी भाषा दिवस साजरा करायचाच. ‘जो घरी कधीकधी मराठीत बोलतो, आणि बाहेर हिंदीत भांडतो, सगळी कामं इंग्रजीत करतो, तो मराठी माणूस’ अशी मराठी माणसाची साधीसोप्पी (अर्थ : सिंपल) व्याख्या (अर्थ : डेफिनिशन) आहे. आय कॅन डु एनिथिंग फॉर मराठी!
मराठी भाषा ही मरणोन्मुख भाषा आहे, असं इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी प्राचीन काळी लिहून ठेवलंय. आय बेग टु डिफर... आफ्टर ऑल ती आपली मातृभाषा आहे. हाऊ कॅन शी डाय? क्‍यों, सही कहा ना?

आपला गंभीर आणि आव्हानात्मक संकल्प : सर्व मराठी न्यूज आणि एंटरटेन्मेंट च्यानलच्या होस्ट आणि अँकर जमातीला नीट मराठीत बोलायला शिकवणे. ‘तो व्यक्ती आला’, ‘माझी मदत कर’, ‘साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी वर्णी लागली...’ हे असलं मराठी बोलतात हे लोक! क्‍या बोलनेका?

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com