हौस ऑफ बांबू : गुरु महाराज, गुरु!

नअस्कार! कवी म्हटलं की किरकोळ देहयष्टीचा, चष्मिष्ट, उसासे टाकणारा नवथर इसम डोळ्यासमोर उभा राहातो. पण सगळेच कवी तसे नसतात हं!
Hous of bamboo
Hous of bambooSakal
Summary

नअस्कार! कवी म्हटलं की किरकोळ देहयष्टीचा, चष्मिष्ट, उसासे टाकणारा नवथर इसम डोळ्यासमोर उभा राहातो. पण सगळेच कवी तसे नसतात हं!

नअस्कार! कवी म्हटलं की किरकोळ देहयष्टीचा, चष्मिष्ट, उसासे टाकणारा नवथर इसम डोळ्यासमोर उभा राहातो. पण सगळेच कवी तसे नसतात हं! परवा शांता शेळके पुरस्कार स्वीकारताना कवी-गीतकार गुरु ठाकूर उभे राहिले आणि…काळजाचा ठोकाच चुकला. कित्ती हँडसम गं बाई!

साहित्य शारदा शांताबाई शेळक्यांच्या जन्मशताब्दीची सांगता या कार्यक्रमात झाली. पुरस्कारासोबत ’आठवणीतल्या शांताबाई’ हा गाण्यांचा कार्यक्रमही झाला. त्यानिमित्तानं गुरुवर्य ठाकूर यांचे पाय आमच्या कोथरुडाला लागले! अरुणाताई ढेऱे या स्वत: नाणावलेल्या कवयित्री. शिवाय शांताबाईंसारखाच भाषेचा व्यासंग. त्यांच्या हस्ते गुरुमहाराजांना पुरस्कार देण्यात आला. त्यांचं भाषणही अतिशय समयोचित, आणि मोजकं झालं. त्या बोलायला लागल्या की गाणं ऐकल्यासारखी तंद्री लागते. (गुरुवर्यांचीही लागली होती, मी पाहिली ना!)

प्रवीण दवणे यांनी ‘शंभरी अनेकांची होते,शताब्दी दुर्मिळ असते’ असं सांगून माफक हशा पिकवला. छान बोलले दवणेसर! वेळ सकाळी साडेआठाची होती. तरीही यशवंतराव चव्हाण हॉल भरला होता, आणि इराण्याकडे चहा-आमलेट खाण्याच्या वेळेला कविवर्य गुरुनाथ ठाकूर चक्क पगडी घालून पुरस्कार घ्यायला बसले होते!! बाकी पुणेरी पगडीतही आमचा गुरु…कित्ती गं बाई…

‘मन उधाण वाऱ्याचे’ हे माझं गाणं वीस वर्षानंतरही रसिक मन लावून ऐकतात, याचा अर्थ मी योग्य मार्गावर असलो पाहिजे, असं ते गुरुवर्य पुरस्कार स्वीकारल्यानंतर म्हणाले. ‘मला जाऊ द्याना घरी, आता वाजले की बारा’ ही लावणी लिहिताना माझ्यासमोर शांताबाईंनी लिहिलेलं ‘तुझी चाल तुरुतुरु, उडती केस भुरुभुरु’ हेच गीत आदर्श म्हणून होतं, असा गौप्यस्फोट त्यांनी केला, तेव्हा उपस्थितांच्या चेहऱ्यावर आश्चर्याने बारा वाजले होते. ‘‘स्त्रीनं पुरुषाच्या संवेदना मांडणं, आणि पुरुषानं स्त्रीच्या… हे कवितेतच घडतं.

हा परकाया प्रवेशच आहे,’’ असं गुरु ठाकूर म्हणाले, तेव्हा (प्रेक्षकांमध्ये बसलेली) मी लाजून चूर होऊन गेले.कित्ती गं बाई…

कवी गुरु ठाकूर कवी वाटतच नाहीत. लांबून तर सलमान खान आला की काय, असं वाटतं. चित्रपटातल्या सिताऱ्याप्रमाणे ग्लॅमरस दिसणारे मराठी कवी असतात तरी कुठं? - म्हंजे, गुरु ठाकूरचा अपवाद सोडून? बाकी कवि मन, सेन्स ऑफ ह्यूमर, व्यायामशाळेत कमावलेली शरीरयष्टी, चित्रकलेचा ब्रश, गाणी लिहिणारी लेखणी…कसलं ‘कंटेट’ आहे या माणसात. कित्ती गं बाई…

मेधाताई कुलकर्णी यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं. आमच्या मेधाताई तशा जिद्दीच्या. पुणेकरांना सकाळी साडेआठला बोलावण्याची कामगिरी फक्त त्याच करू धजतात.

महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी अतिशय रुचकर भाषण करतात. ऐकताना आपण पूना बेकरीचा क्रीमरोलच खातोय, असं वाटत राहातं. शांताबाईंचे अनेक किस्से त्यांनी सांगितले. शांताबाईंच्या घरी चिक्कार मांजरी होत्या, आणि त्या लिहित बसल्या की एखादी पाल त्यांच्या कुशीत सहज येऊन बसायची, असं त्यांनी सांगताच श्रोत्यांमधल्या अनेक होतकरु चेहरे कॉलरीत झुरळ शिरल्यागत दचकले! पाल पाळायची, ही कवितेसाठीची पूर्वअट त्यांना भलतीच वाटली असावी! मी चटकन गुरुजींकडे पाहिले. तेव्हा ‘डोण्ट वरी, मी नाही पाळत’ असा खुणेनंच त्यांनी दिलासा दिल्याचा भास मला झाला आणि…जाऊ दे.

‘तुझा’ आणि ‘तुझ्यासाठी’, शब्द सारे खोटे, खरी असतात क्वचित कधी, बिलगणारी बोटे…

….या शांताबाईंच्याच सुंदर चार ओळी गुरुवर्यांना ऐकवायच्या होत्या. राहून गेलं. कित्ती गं बाई…जाऊ दे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com