हौस ऑफ बांबू : साहित्यक्षेत्रातील नवी जमीनदारी...!

नअस्कार! एका गंभीर विषयाला तोंड देते आहे. (इश्श...! काहीतरीच हं तुमचं!!), अमळनेरच्या ९७ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या तारखा जवळ येत चालल्या आहेत.
hous of bamboo
hous of bamboosakal

नअस्कार! एका गंभीर विषयाला तोंड देते आहे. (इश्श...! काहीतरीच हं तुमचं!!), अमळनेरच्या ९७ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या तारखा जवळ येत चालल्या आहेत. गावोगावचे लेखक-प्रकाशक, वाचक-रसिक बॅगा भरायला लागले आहेत.

कोण, कधी, कसं अमळनेरला पोचायचं, याच्या चौकशा सुरु झाल्या आहेत. काही अतिउत्साही मंडळींनी आपापल्या पुठ्ठ्यातल्या लोकांचे व्हॉटसॲप गटही तयार करुन बेत ठरवले आहेत. साहित्यातली कंपूशाही ही अशीच जन्म घेते बरं!!

या धामधुमीत, अमळनेरच्या साहित्य संमेलनाचे अंमलदार ऊर्फ प्रा. रवींद्रराजे शोभणे यांच्याकडे कुणाचं लक्ष आहे की नाही? या कंपूशाहीनं ते जाम हैराण झाले आहेत. संमेलन जवळ येत चाललेलं असताना त्यांनी त्यांच्या मनातली खंत व्यक्त केली आहे. मराठी साहित्यक्षेत्रातल्या बहुजनांच्या जमीनदारीच्या विरोधात त्यांनी अचानक दंड थोपटल्यानं एकच खळबळ उडाली आहे.

बहुजनांनी कंपूशाही केल्यानं आपल्यासारख्या साहित्यिक बलुतेदारांवर अन्याय झाला, असं ते मध्यंतरी एका ठिकाणी म्हणाले. यामुळे बहुजनवादी लेखक आणि अभिजनवादी लेखक असा नवा वाद उफाळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अमळनेरचा मांडव भरेभरेपर्यंत वाद शिगेला पोचेल, असा प्राथमिक अंदाज आहे.

प्रा. शोभणे यांनी गेल्या महिन्यात मुंबईत बांदऱ्याला एकदिवसीय महानगर साहित्य संमेलन झालं होतं, तिथंही मुंबईनं साहित्याला तारलं, अशा आशयाचे गौरवोद्गार (मुंबईकरांबद्दल) काढले होते. तेव्हाच माझ्या मनात संशयाची पाल चुकचुकली होती. नंतर हे बहुजनवादी कंपूशाहीचं खेंगट त्यांनी काढलं. त्यांच्यामते बहुजनवादी साहित्यिकांनी नेहमीच दुटप्पी भूमिका स्वीकारल्यानं बहुजन असूनही अनेक गुणी साहित्यिकांवर अन्याय झाला.

अन्याय झाला म्हणजे नेमकं सांगायचं तर योग्य ते पुरस्कार (वेळेत) मिळाले नाहीत. योग्य ते पुरस्कार म्हणजे कुठले? तर एकच. साहित्य अकादमीचे पुरस्कार. का? तर तिथं बहुजनवाद्यांची कंपूशाही! बहुजनवादी म्हणजे एकप्रकारचे नेमाडपंथीच!!

या मंडळींनी दुटप्पी राजकारण सुरु केल्यानं होनहार, गुणी (नागपूरला राहणाऱ्या) नावाजलेल्या प्राध्यापक, कादंबरीकार (सॉरी, कादंब्रीकार), समीक्षक, विद्वान साहित्यिकांना अकादमीचा पुरस्कार नाही म्हणजे अगदी नाहीच्च मिळाला. इतर सगळे तीस-चाळीस पुरस्कार मिळाले, वाचकांची, (अगदी विद्यार्थीवर्गातही हं!) लोकप्रियता मिळाली, साहित्य संमेलनाचं अध्यक्षपदही मिळालं, पण अकादमीचा पुरस्कार…तो नाही म्हणजे नाहीच मिळाला!! काय हे?

साहित्य अकादमीत कंपूशाही चालते, हा आरोप काही नवीन नाही. किंबहुना, कंपूशाही नसती, तर अकादमीला पुरस्कार देताना निकष कुठले ठरवायचे, हेच मुळी कळलं नसतं!! तिथं नेमाडपंथीयांनी बरीच वर्षं दादागिरी केली, हाही आरोप आता जुना झाला. त्याआधी अभिजनवादी साहित्यिक तिथं तेच करत होते, हा भाग आहेच.

प्रा. शोभणे यांना आमची सहानुभूती आहे. त्यांचं सांत्त्वन करायचं सोडून त्यांनाच दूषणं देणं हे शोभतं का? पण नागपूरचे आमचे पत्रकारमित्र रा. देवेंद्र गावंडे यांनी प्रा. शोभणे यांच्या बहुजनवादी आरोपावर नुकताच कडाडून शाब्दिक हल्ला चढवला. प्रा. शोभणे यांना नेमके कोणते बहुजनवादी अभिप्रेत आहेत, ते जातीनिहाय स्पष्ट करावं, असा तगडा सवाल त्यांनी केला आहे.

संमेलन असं उंबरठ्यावर आलं असताना गावंडेगुर्जींनी असं एकदम बाह्या सर्सावून उत्तर देणं बरं वाटलं नाही. शिवाय दोघंही नागपूरचे! गाववाल्यांनी एकमेकांना सांभाळून घ्यावं की नाही? (तेवढीच आपली कंपूशाही!) पण उगीच नव्या वादाला त्यांनी तोंड फोडलं. (आणि मला द्यावं लागलं!) आपण कुठल्या गावात आहोत, याचं तरी भान ठेवा म्हणते मी! पुण्यातल्या लेखकांसारखं उगीच वाद घालत बसणे नागपूरकरांना तरी शोभणे नाही. हो की नाही?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com