हौस ऑफ बांबू : आला रे आला…मराठी भाषा दिन!

नअस्कार! मुलांनो, मराठी भाषा गौरव दिवस उंबरठ्यावर आला आहे. मंगळवारी कार्यक्रमांची रेलचेल असेल. कार्यक्रम म्हटलं तर ‘डाऊनमार्केट’ वाटतं.
Hous of bamboo
Hous of bamboosakal

नअस्कार! मुलांनो, मराठी भाषा गौरव दिवस उंबरठ्यावर आला आहे. मंगळवारी कार्यक्रमांची रेलचेल असेल. कार्यक्रम म्हटलं तर ‘डाऊनमार्केट’ वाटतं. इव्हेंट…इव्हेंटच म्हणायला हवं. आपली मातृभाषा मराठी आहे, याची अनेकांना आठवण होईल. तसे व्हाटसॲपवर संदेश पाठवले जातील. मराठी कविता पाठ करुन जाहीर काव्यवाचनाचे कार्यक्रम होतील. अभिवाचने, परिसंवाद, परिचर्चा, सत्कार सोहळे, बक्षीस समारंभ…बरंच काही होईल.

या प्रत्येक कार्यक्रमाच्या प्रारंभी ‘लाभलेऽऽ अम्हाऽऽस भाग्य बोऽऽऽलतो मराऽऽठी..,’ हे अभिमानगीत म्हटलं किंवा वाजवलं जाईल. जुनी माणसं एकत्र गोळा झाली तर ‘प्रिय अमुचा एकमहा राष्ट्रदेश हा’ हे महाराष्ट्रगीत म्हटलं जाईल. सगळं काही ठरल्याप्रमाणे पार पडेल. नाही म्हटलं तरी आपल्याकडे स्वतंत्र मराठी भाषाविभाग आहे, आणि दीपकभाऊ केसरकरांसारखा मंत्रीही लाभला आहे. कार्यक्रम तर होणारच!

मुलांनो, पण यात मराठी भाषा नेमकी कुठं असेल? आपण हा दिवस ‘साजरा’ का करतो? ‘पाळत’ का नाही? एक दिवस ढोलताशे वाजवले की बाकीचे तीनशे चौसष्ट दिवस आपण मराठी भाषेचं काय करतो? एक दिवस गौरव, बाकी वर्षभर रौरव, असं मराठी भाषेचं नशीब फुटकं का?

हाच दिवस उगवला की अभिजात दर्जाचं कुठवर आलं, असं का विचारतो आपण एकमेकांना? मराठी भाषेला चांगले दिवस यायला हवेत, म्हणजे सरकारनंच काहीतरी करायला हवं, असं का? एक दिवस अभिमानगीत गाऊन काय उपयोग होणार आहे? संपूर्ण वर्षभरात आपण किती मराठी पुस्तकं वाचली?

मराठी भाषेचं संवर्धन, प्रचार आणि प्रसारासाठी वर्षभर अनेक सरकारी योजना आखल्या जातात. त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद वगैरेही असते. उदाहरणार्थ, गेल्या वर्षी ही तरतूद अडीच-तीन कोटी रुपयांची होती. (फू:!!) इतकी कमी? म्हणून नाकं मुरडू नका. कारण एवढुशा तरतुदीतली निम्मी रक्कमही खर्च झालेली नाही!! ‘पुस्तकांचा गाव’ ही योजना ऐकून तरी माहीत असेल.

या उपक्रमावर एक दिडकीही खर्च झालेली नाही. कसली डोंबलाची पुस्तकांची गावं उभारणार? मराठी भाषा गौरव दिवसाला इव्हेंट करत बसण्याऐवजी भाषाकेंद्री उपक्रम राबवावेत, अशी मागणी करणारं एक लांब पल्ल्याचं गायडेड मिसाइलरुपी पत्रास्त्र आमचे परममित्र रा. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी नुकतंच डागलं आहे. हे पत्र मिळाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे आणि भाऊ केसरकर काहीकाळ निपचितच पडले.

भाषाकेंद्री करायचं म्हंजे नेमकं काय करायचं, हेच त्यांना कळेना!! शेवटी नाइलाजाने भाऊ केसरकरांनी मलाच फोन केला. (प्रत्यक्ष येऊन भेटतो, असा सज्जड इशाराही त्यांनी दिला.) म्हणाले, ‘‘सरोजमॅडम, बघा ना ,शिंदेसाहेब हैराण झालेत हो, काहीतरी करा!’ मलाही काही सुचेना.

‘आधीच वेगवेगळ्या आंदोलनांनी सीएमसाहेबांचा जीव अर्धा झाला, त्यात ही श्रीपाद भालचंद्रांची पत्रं! माणसानं गतिमान कारभार करायचा तरी कसा?’ भाऊ केसरकरांनी हतबलता मांडली. माझं मन द्रवलं. श्रीपाद भालचंद्रांनी मराठी भाषेचा मुद्दा असा काही लावून धरला आहे की यंव रे यंव! जरा कुठे राज्यकर्त्यांचं दुर्लक्ष झालं की त्यांचं क्षेपणास्त्र आलंच म्हणून समजा. एवढी सभासंमेलनं होतात, पण तिथंही त्यांच्याइतकं पोटतिडकीनं मराठी भाषेबद्दल कुणी बोलत अथवा लिहित नाही.

‘मराठी दिनाला श्रीपाद भालचंद्रांचंच ‘मराठी भाषाकेंद्री कार्यक्रम नेमके काय करावेत?’ या विषयावर प्रबोधनपर व्याख्यान ठेवा!’’ अशी सूचना करुन मी फोन ठेवला. बघू या आता काय होतं ते. तोवर मराठी भाषा दिनाच्या सर्वांना शुभेच्छा! म्हणा एकसाथ- ‘‘लाभलेऽऽ अम्हाऽऽस भाग्य बोऽऽलतो मराऽऽठी...!’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com