हौस ऑफ बांबू : आपुले ऐश्वर्य येथ उधळते मराठी...!

नवी मुंबईत जानेवारीअखेर होणाऱ्या विश्व मराठी संमेलनाला जायचं असेल तर सरकारतर्फे पन्नास हज्जार रुपये मिळतात, ही शेवटी अफवाच ठरली.
World Marathi Sammelan
World Marathi SammelanSakal

नअस्कार! नवी मुंबईत जानेवारीअखेर होणाऱ्या विश्व मराठी संमेलनाला जायचं असेल तर सरकारतर्फे पन्नास हज्जार रुपये मिळतात, ही शेवटी अफवाच ठरली. मी बॅग भरुन तयार होत्ये, सगळे कपडे पुन्हा कपाटात लावून ठेवले. मुळात ही अफवा उठवलीच कोणी, याचा शोध आता घेणार आहे. नतद्रष्ट मेले!

आपल्या सर्वांचे लाडके मराठी भाषा मंत्री दीपकजी केसरकरसाहेब यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘मराठा तितुका मेळवावा’ हा उपक्रम राबवायचं ठरवलं आहे. गेल्या वर्षी मुंबईत वरळीच्या नॅशनल स्पोर्टस क्लब मैदानावर पहिलं विश्व मराठी संमेलन पार पडलं होतं. त्यानंतर जगभर मराठी भाषेचा प्रचंड वेगानं प्रसार झाला, हे आपण पाहातोच आहोत.

या संमेलनासाठी खास परदेशातून मराठी माणसं आणवण्यात आली होती. काहीही करा; पण या आणि मराठी भाषेचं जतन आणि प्रसार करा, अशी केसरकरसाहेबांची सर्वांना विनंती होती. केसरकरसाहेब हे व्यक्तिमत्वच अतिलाघवी. मान तिरकी करुन चष्म्याच्या वरच्या भागातून आरती प्रभुटाइप मुमुरकेशें (खास कोंकणी शब्द!) हसून ते बोलू लागले की, मन चहात बुडवलेल्या खाज्यासारखं मऊ पडून जातं. मग तुम्ही कितीही कणखर मनाचे असा!! तुम्ही ‘नाही’ म्हणालात तर ते चक्क घरीच येऊन थडकतात, असा काही पुणेकरांचा भयंकर अनुभव आहे.

अशा या केसरकरसाहेबांचं निमंत्रण डावलणार कोण? जपान, ब्राझिल, ब्रिटन, आफ्रिका, अमेरिका. सौदी अरबस्तान अशा डझनावारी देशांमधून पाच-सातशे परदेशी मराठी पाहुणे या संमेलनासाठी येऊ घातले आहेत. प्रत्येकाला पाऊण लाख रुपये (सरासरी एका वेळचं विमानभाडं) सरकारनं देऊ केले आहेत. शिवाय जेवणखाण, राहण्याची सोय फुकट! लोक सुट्या टाकून भारताकडे यायला निघाले आहेत, असं कळतं.

हे तर काहीच नाही! खरी गंमत यापुढेच आहे. या पाहुण्यांसाठी काही खाजगी ट्रावल कंपन्या आता पुढे सरसावल्या आहेत. सवलतीच्या दरात विश्व मराठी संमेलनासकट अयोध्यावारी घडवण्याचं आमिष त्यांना दाखवलं जातंय म्हणे. काहींनी तर अष्टविनायक यात्रा उरकून घ्यावी, भीमाशंकर-महाबळेश्वरची ट्रिप करावी, असे बेत रचले आहेत!

पिकतं तिथं विकत नाही असं म्हणतात, देशी पाहुण्यांना मात्र अजून काही लाभ जाहीर झालेले नाहीत. नागपूरहून मुंबईला, (आणि तिथून नवी मुंबईला) जायचं म्हटलं तरी दहा-वीस हजाराची फोडणी बसते. शिवाय राहण्या-जेवण्याचा खर्च तेवढाच. म्हणजे चाळीस-पन्नास हजार तरी हवेत. पण केसरकरसाहेबांनी याबद्दल स्पष्ट काही न सांगितल्यानं इच्छुकांनी आपापल्या भरलेल्या ब्यागा रिकाम्या करण्याचा निर्णय घेतला. काय हे?

नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय एग्झिबिशन सेंटरमध्ये यंदा हा मराठीचा सरकारी सोहळा पार पडणार आहे. जगभरातल्या मराठी बंधू-भगिनींनी एकत्र येऊन मराठीचा जागर करावा, असा या सोहळ्यामागचा हेतू आहे, असं सरकारचं म्हणणं. संमेलनं, सोहाळे भरवणं हे सरकारचं काम आहे का, हा खरा मुद्दा! पण केसरकरसाहेबांना हे सांगणार कोण? सांगितलं तर पुन्हा ते घरी येणार, आणि मान तिरकी करुन किंचित हसत आपला खात्मा करणार!! भले भले गारद झाले, त्यांच्यापुढे (गरीब) बिचाऱ्या एनाराय मराठी बापड्यांनी काय करावं?

संमेलनावर तब्बल दहा कोटी रुपये उडवण्यात येणार आहेत, असं समजतं. निव्वळ पाहुण्यांच्या विमानभाड्यापोटी साडेतीन कोटी खर्ची पडणार आहेत. एवढा खर्च करुन मराठी भाषेचं जतन आणि प्रसार का करायचा? या खर्चावाचून इतकी वर्ष तो कुठं अडला? हे प्रश्न न विचारता, हौस असेल त्यानं नवी मुंबईला जावं. हौसेला मोल नसतं. कळलं का काही?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com