करिष्म्याचे छत्र शोधण्याची धडपड (अग्रलेख)

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 फेब्रुवारी 2017

विधिमंडळाच्या कामाचा अजिबात अनुभव नसलेल्या शशिकला यांच्यापुढे तमिळनाडूचा शकट यशस्वीपणे हाकण्याचे आव्हान आहे. जनतेचा पाठिंबा मिळवण्यात त्या कितपत यशस्वी होतात, यावरच त्यांची पुढची वाटचाल अवलंबून आहे.

पक्ष फक्त नेत्याच्या करिष्म्यावर विसंबून राहिला की काय होते, याचा प्रत्यय सध्या तमिळनाडूतील अण्णा द्रविड मुनेत्र कळघमच्या राजकारणात दिसून येतो. त्यामुळेच तमिळनाडूच्या "करिष्मापर्वातील नायिका' म्हणून द्रविड जनतेवर अधिराज्य गाजवणाऱ्या जयललिता यांचे निधन झाल्यानंतर कारभाराचे सुकाणू बऱ्याच प्रमाणात यशस्वीरीत्या सांभाळणाऱ्या पनीरसेल्वम यांना दूर करून जयललिता यांच्या सखीची भूमिका प्रदीर्घ काळ बजावणाऱ्या शशिकला नटराजन यांना त्या खुर्चीवर बसविण्यात आले आहे. केवळ करिष्म्याच्या जोरावर राजकीय सत्तापदे जिंकणाऱ्या अण्णा द्रमुकच्या लोकप्रतिनिधींना राज्याचे भले नेमके कोणाच्या हातून होईल, यापेक्षा आपल्या राजकीय पदांमध्ये अधिक रस होता आणि त्यामुळेच त्यांनी शशिकला यांची प्रतिष्ठापना केली आहे. लवकरच शशिकला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील आणि कोणतीही निवडणूक न लढवलेल्या वा वक्‍तृत्वकला अवगत नसलेल्या, तसेच बेहिशेबी संपत्ती जमा केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची टांगती तलवार डोक्‍यावर असलेल्या एका महिलेच्या हातात राज्याची सूत्रे जातील.

वास्तविक, जयललिता यांना तुरुंगात जावे लागल्यावर त्यांनी स्वत:च शशिकला यांची नव्हे, तर पनीरसेल्वम यांची राज्याची धुरा सांभाळण्यासाठी निवड केली होती, एवढ्या एकाच मुद्द्यावरून खरे तर त्यांचे मुख्यमंत्रिपद किमान पुढच्या निवडणुकीपावेतो राहायला हरकत नव्हती. मात्र, एक कार्यक्षम कार्यकर्ता आणि केवळ आरोपांचे किटाळ असलेला नेता यांच्यातून या आमदारांनी शशिकला यांच्या पारड्यात आपला कौल टाकला आहे. त्यांच्या या निवडीस तेथील जनता व अनेक राजकीय पंडितांनी केलेला तीव्र विरोध लक्षात घेता जयललिता यांनी तमिळनाडूच्या इतिहासात सलग दुसऱ्यांदा विधानसभा जिंकून मिळवलेली सत्ता बुजुर्ग नेते एम. करुणानिधी आणि त्यांचे सुपुत्र स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखाली द्रमुक सहज खेचून घेईल, असे वातावरण शशिकला यांच्या निवडीनंतर अवघ्या 24 तासांत उभे राहिले आहे.

तमिळनाडूच्या राजकारणातील शशिकला हे गूढ व्यक्‍तिमत्त्व आहे आणि आपल्या या व्यक्‍तिमत्त्वाच्या जोरावरच पनीरसेल्वम मुख्यमंत्री झाल्यावरही त्यांनी पक्षाची सारी सूत्रे हस्तगत करण्यात यश मिळवले होते. त्याच जोरावर त्यांनी आता मुख्यमंत्रिपदही ताब्यात घेतले आहे. मात्र, त्यांचा मार्ग जयललिता यांच्याप्रमाणे सुलभ असू शकत नाही. मुळात जयललिता यांचे निधन झाले, तेव्हाच त्याबद्दल अनेक प्रवाद उभे राहिले होते. त्याबद्दल शंका घेणारी याचिकाही न्यायालयात दाखल करण्यात आली होती आणि शशिकला यांची सरचिटणीसपदी निवड झाल्यानंतरच्या काही तासांतच न्यायालयाने त्यासंबंधात तपासाचे आदेश दिले आहेत. ती चौकशी अद्याप प्रलंबित आहे. शिवाय, बेहिशेबी संपत्तीच्या खटल्यात त्या दोषी ठरल्या असून, तोही खटला सर्वोच्च न्यायालयात उभा आहे. मात्र, यापेक्षाही महत्त्वाची बाब म्हणजे संसदीय कामगिरीचा कोणताही अनुभव नसताना, त्या राज्यशकट हाकू शकतील काय, हा आहे. शिवाय, 2011 मध्ये जयललिता यांना केमिकलच्या माध्यमातून "स्लो पॉयझनिंग' करत असल्याचा आरोपही त्यांच्यावर झाला होता.

आपले पती नटराजन यांना मुख्यमंत्रिपदी बसवण्यासाठी शशिकला या थराला गेल्या असल्याचे बोलले गेले. मात्र, त्यानंतर त्यांनी आपल्या कुटुंबीयांबरोबरील सारे संबंध तोडून टाकले आणि त्या जयललिता यांच्या आलिशान निवासस्थानी राहावयास गेल्या. "पोएस गार्डन' या नावाने प्रसिद्ध असलेल्या या बंगल्यावरही त्यांनी जयललिता यांच्या निधनानंतर ताबा मिळवला आहे. यावरून आपले ईप्सित साध्य करण्यासाठी त्या कोणत्याही थराला जाऊ शकतात, हेच स्पष्ट झाले आहे. जयललिता यांच्याभोवती रामचंद्रन यांच्या सहवासाने उभे राहिलेले करिष्म्याचे वलय होतेच आणि मुख्य म्हणजे वक्‍तृत्वाची अमोघ देणगीही होती. शशिकला यांच्याकडे वक्तृत्व नसले तरी निदान त्या नावाभोवती वलय निर्माण होण्याची शक्‍यता आहे, असे अण्णा द्रमुकच्या आमदारांना वाटले असणे शक्‍य आहे.

'
शशिकला यांच्यापुढे खरे आव्हान आहे ते आपल्या मुख्यमंत्रिपदास जनतेचा कौल मिळवण्याचे. विरोधी पक्षनेते स्टॅलिन यांनी "जनतेने गेल्या निवडणुकीत दिलेला कौल हा अण्णा द्रमुक व जयललिता यांना होता; त्यांच्या घरातून कारभार चालवण्यास नव्हता!' असे सांगून या लढाईस तोंड फोडले आहे. अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेल्या शशिकला यांना तमिळनाडूच्या दुसऱ्या महिला मुख्यमंत्री म्हणून इतिहासात नाव नोंदवायचे होते. त्यामुळेच त्यांनी इतक्‍या घाईने हा निर्णय घेतला. पुढे पनीरसेल्वम यांनी चांगला कारभार केल्यास हे पद आपल्या हातातून कायमचे जाईल, अशी भीती त्यांना होती आणि आता "पनीरसेल्वम यांनीच आपल्याला मुख्यमंत्रिपद स्वीकारण्यास भरीस घातले!' असा बचावात्मक पवित्रा त्या घेत आहेत. या साऱ्या पार्श्‍वभूमीवर अण्णा द्रमुक आमदारांनी शशिकला यांची निवड केली असली, तरी जनतेचा पाठिंबा मिळवण्यात त्या कितपत यशस्वी ठरतात, यावरच त्यांची पुढची वाटचाल अवलंबून आहे.

Web Title: sashikala's struggle to have charisma