esakal | ढिंग टांग :  तंदुरुस्तदासांचे उपाय! 

बोलून बातमी शोधा

ढिंग टांग :  तंदुरुस्तदासांचे उपाय! 

कोरोनासोबत रहावयाची सवय केली पाहिजे, असे त्यांस एका परमभक़्ताने सांगितले असता संतकवी तंदुरुस्तदास अचानक उद्गारले : ""आम्ही कोरोनासोबत राहावयास तयार आहो, पण कोरोना आमच्यासोबत राहायला तयार आहे काय?''

ढिंग टांग :  तंदुरुस्तदासांचे उपाय! 
sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

मन चंगा तो सब चंगा, चंगा भये सरीर 
बीमार खाए दवाइयां, चंगा खाये खीर! 

-असे संतकवी तंदुरुस्तदास यांनी म्हणून ठेवलेच आहे. किती खरे आहे नै? माणसाने कसे हमेशा निरोगी राहावे. धष्टपुष्ट आणि फिट्ट राहावे. कां की, आरोग्य हीच खरी धनसंपदा आहे. धट्टीकट्टी गरिबी आणि लुळीपांगळी श्रीमंती असे म्हटलेच आहे. संतकवी तंदुरुस्तदास आणखी एका दोह्यात म्हणतात- 

क्‍यों कर खाए गोलियां, खाओ उपमा-पोहे, 
ढाई अक्‍सर व्यंजन के, यही कहत है दोहे! 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
 

पदार्थव्यंजनातच खरा परमेश्वर आहे, (औषधाच्या) गोळ्या कसल्या खाता? असे संतकवी सांगतात. रोगी गोळ्या औषधे खाऊन जगतो, तर तंदुरुस्त माणूस खीर खातो, असे संतकवी म्हणतात. संतकवी तंदुरुस्तदास यांना आमचे वंदन असो. 

कुणाची दृष्ट न लागो, पण संतकवी तंदुरुस्तदास यांची प्रकृती लहानपणापासूनच तशी ठणठणीत होती व आहे. त्यांना खाण्यापिण्याचा भारी षौक! इतका की "बारा माणसांचे हा एकटा खाईल!', अशी त्यांची पंचक्रोशीत ख्याती होती. "माणसाने यथास्थित, चाऱ्ही ठाव खावे आणि तंदुरुस्त रहावे' असा त्यांचा उपदेश असतो. "अण्णं पसवितं अण्णं' असे पाली की अर्धमागधीमध्ये त्यांनी म्हणून ठेवले आहे. त्याचा साधारणत: अर्थ एवढाच की अन्नाची भूक अन्न प्रसविते!! असो. संतकवी तंदुरुस्तदास तसे काहीच्या काहीच तंदुरुस्त असले, तरी त्यांना अधूनमधून गडगडाटी शिंका मात्र येतात. साहजिकच, त्यांच्यासमोर बसलेले भक्तगण त्या शिंकांमुळे तात्काळ अनुग्रहित होतात!! पण... 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

हल्लीच्या लॉकडाउन संवत्सरात, मास्क लावणे बंधनकारक झाल्यामुळे हा अनुग्रहसोहळा थांबला आहे. संतकवींना ही मास्कची मुस्कटदाबी अगदी सहन होत नाही. म्हणूनच त्यांनी "आर्सेनिक आल्बमच्या गोळ्या खा, आणि फिट्ट व्हा', "आयुष मंत्रालय पुरस्कृत कषाय काढा प्या, कोरोनाला पळवा', "रोज सकाळी उठून गिलोय, प्रवाळयुक़्त च्यवनप्राश खा, प्रतिकारशक्ती मिळवा' असा प्रसार सुरू केला आहे. स्वत:देखील ते ही सर्व औषधे वेळोवेळी घेतात. बहात्तर रोगांवर एकच अक्‍सीर इलाज शोधण्यापेक्षा एकाच अक्‍सीर रोगावर बहात्तर इलाज शोधणे इष्ट आहे, असे ते हल्ली म्हणू लागले आहेत. किती खरे आहे नै? एका दोह्यात ते म्हणतात : 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

एक बीमारी ठीक करै, तो बहत्तर इलाज होय 
बहत्तर इलाज की इक बीमारी, बहुरी करेगा कोय? 

अर्थ सोपा आहे. त्याची फोड करून सांगण्याची आवश्‍यकतादेखील नाही. (खुलासा : तो आम्हालाही ठाऊक नाही, हा भाग अलाहिदा. सॉरी!) या दोह्याची आठवण यावी, अशाप्रकारे कोरोनावर देशोदेशी लशी आणि औषधे धुंडण्याचे काम चालू आहे आणि आश्‍चर्य म्हंजे त्यातले एकही लागू पडत नाही!! कां की कोरोनावर काही औषधच नाही. संतकवी तंदुरुस्तदास यांच्या मते तिखटण झणझणीत मिसळपाव हे कोरोनावर कडक औषध ठरेल! ट्राय करायला हवे! हो की नाही? पुन्हा असो. 

कोरोनासोबत रहावयाची सवय केली पाहिजे, असे त्यांस एका परमभक़्ताने सांगितले असता संतकवी तंदुरुस्तदास अचानक उद्गारले : ""आम्ही कोरोनासोबत राहावयास तयार आहो, पण कोरोना आमच्यासोबत राहायला तयार आहे काय?'' 

वाचकहो, हा संतकवी तंदुरुस्तदास यांचा हा सवाल इतका गाजला की विचारता सोय नाही. या सवालापुढे कोरोना सपशेल निपचित पडेल याबाबत आमच्या मनी तरी बिल्कुल शंका नाही. संतकवी तंदुरुस्तदास यांना पुनश्‍च एकवार वंदन असो.