esakal | ढिंग टांग :  आरए : एका विमानाचा शोध ! 
sakal

बोलून बातमी शोधा

ढिंग टांग :  आरए : एका विमानाचा शोध ! 

रावणाच्या विमानाबाबत काही पुरावे वा संशोधन असल्यास पाठवावे, येत्या पाचेक वर्षांत रावण हा पहिला विमानमालक व वैमानिक होता, हे आम्ही सिद्ध करून दाखवू असे श्रीलंका सरकारने जाहीर केले आहे.

ढिंग टांग :  आरए : एका विमानाचा शोध ! 

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

श्रीरामचंद्रांचे जन्मस्थान अयोध्या नसून नेपाळातील ठोरी हे गाव होते, हे आपण गेल्या आठवड्यात सोदाहरण पाहिले. तो विषय हातावेगळा केल्यावर थोडी उसंत घ्यावी असे म्हणेस्तोवर श्रीरामायणातील खलनायक जो की रावण याच्या विमानासंदर्भात काहीएक नवे संशोधन हाती आले. रावण हा महाज्ञानी, महापराक्रमी आणि महाशक्तिशाली होता हे साऱ्यांना माहीत आहेच. (पहा : रामायण मालिका-रिपीट टेलिकास्ट) भारतवर्षाच्या दक्षिणेला असलेल्या लंकापुरी नावाच्या स्वर्गाहुनि रम्य अशा बेटावर तो वास करीत असे. (खुलासा 1 : पहा किंवा ऐका : रम्य ही स्वर्गाहुनि लंका, हे पं. भीमसेन जोशी यांचे चित्रपटगीत. खुलासा 2 : रावण वास करीत असे, म्हंजे राहात असे! असो!!) सुमारे पाच हजार किंवा साडेतीन हजार वर्षांपूर्वी (खुलासा : रावणकालाच्या गणनेबाबत तज्ज्ञांमध्ये मतभेद आहेत. आमच्या मते हा काल सुमारे सव्वापाच हजार किंवा पावणेतीन हजार वर्षांच्या दरम्यान असावा! असो. ) सदर रावणाकडे विमान होते व याच विमानाच्या आधारे त्याने लंकापुरीतून दंडकारण्य गाठून सीताहरण केले. रिटर्न जर्नीमध्ये त्याने विमानातूनच जटायुचे पंख छाटले, ही ऐतिहासिक कथा सर्वविदित आहे. 

या कथेनुसार, विमानाचा शोध पाच हजार वर्षांपूर्वी रावणानेच लावला, असे आता श्रीलंका सरकारने जाहीर केले आहे. त्याबद्दल श्रीलंका सरकार अभिनंदनास पात्र आहे असे आम्ही म्हणू. श्रीरामचंद्रांची जन्मभूमी ठोरीत होती, हे आम्हाला जसे तत्काळ पटले, तसेच रावणाबद्दलचा श्रीलंका सरकारचा दावाही आम्हाला मान्य करणे भाग आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

तथापि, आमचे काही सूक्ष्म मतभेद आहेत. आमच्या संशोधनानुसार रावणाचा धनाढ्य बंधू श्रीकुबेर यांचे विमान होते व ते मनोवेगाने जात-येत असे. पाशिंजरांच्या संख्येनुसार ते लहान-मोठे करण्याची सोयदेखील होती, असे कळते. काही काळासाठी रावणाने ते लीजवर घेतले होते, असे आमचे स्वतंत्र संशोधन आहे. आजकाल निवडणुकीच्या काळात राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांना जसे खासगी हेलिकाप्टर पुरविले जाते, त्याच धर्तीवर कुबेर कंपनीचा हा उपक्रम असावा! 

तूर्त मुद्दा रावण पहिला वैमानिक होता की नाही? हा आहे. आमच्या मते येथे शंकेला वाव आहे. कारण रावणाने लंकेहून विमान दंडकारण्यात (डायरेक्‍ट फ्लाइट) आणले, तेव्हाही नाशिकजवळील (खुलासा : पहा, पंचवटी संदर्भ) ओझरचा विमानतळ उपलब्ध असणार! त्याशिवाय त्याला लॅंडिंग शक्‍य झाले नसतेच. ओझरलाच "हिंदुस्थान एरोनॉटिक्‍स'चा विमाने निर्मितीचा कारखाना आहे, याकडेही डोळेझांक करून चालणार नाही. ज्या अर्थी भारतवर्षात विमान कारखाने आणि विमानतळ होते, त्या अर्थी विमानेदेखील असणारच व भारतीय प्रजाजन त्यातून प्रवास करत असणारच. थोडक्‍यात, विमानाचा शोध रावणाने राईटबंधूंच्या (खुलासा : ऑर्विल आणि विलबर राइट यांनी 1903 मध्ये पहिले विमानोड्डाण केले, असा पाश्‍चात्यांचा दावा आहे...काहीही!! असो! ) आधी लावला, हे श्रीलंका सरकारचे म्हणणे आम्हाला अजिबात मान्य होणारे नाही. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

रावणाच्या विमानाबाबत काही पुरावे वा संशोधन असल्यास पाठवावे, येत्या पाचेक वर्षांत रावण हा पहिला विमानमालक व वैमानिक होता, हे आम्ही सिद्ध करून दाखवू असे श्रीलंका सरकारने जाहीर केले आहे. आम्ही तांतडीने "आरए - : ए फ्लाइटेड हिस्टरी ऑफ एन्शण्ट इंडिया' हा प्रबंध लिहावयास घेतला असून पूर्ण झाल्यावर श्रीलंका सरकारला धाडून देऊ. तयार रहा, कृपया अपनी कुर्सी की पेटी बांध लें!