esakal | ढिंग टांग : बर्थडे आणि ‘पॉ-पॉ’ आंदोलन!
sakal

बोलून बातमी शोधा

ढिंग टांग : बर्थडे आणि ‘पॉ-पॉ’ आंदोलन!

दादू : (घाईघाईने) सध्या परिस्थिती भयंकर आहे ना! अगदीच आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा, असं मी नेहमी लोकांना सांगतो! तेवढं आवश्यक काम माझ्याकडे नाहीए, मग मी कशाला घराबाहेर जाऊ? तूच सांग!

ढिंग टांग : बर्थडे आणि ‘पॉ-पॉ’ आंदोलन!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

दादू : (प्रेमळ चेहऱ्याने फोन फिरवत) म्यांव म्यांव…जय महाराष्ट्र!

सदू : (जांभई देत) होऽऽऽईऽऽ…हाहाहाऽऽऽ!! किती वाजलेत?

दादू : (मोठ्या आवाजात) दुपारचे बारा वाजायला आले! ऊठ बरं आता!!

सदू : (कंटाळून) हंऽऽ…इतक्या सकाळी फोन कां केलास?

दादू : (हर्षभरीत होत्साते)… हॅपी बर्थ डे टू यू! सदूराजसाहेबांचा विजय असो! 

सदू : (डोळे मिटून पडल्या पडल्या) थँक्यू! पण मी यंदा वाढदिवस साजरा करणार नाहीए! 

दादू : (हिरमुसून) का रे?

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

सदू : (गांभीर्याने)…परिस्थिती ही अशी! आम्हाला शुभेच्छा द्यायला येणारे उगीचच गर्दी करतील, आणि सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडेल! नवनिर्माणाच्या आमच्या कामात सामील झालेले लाखो मनसैनिक उत्साहाच्या भरात काय काय करतात, हे उभ्या महाराष्ट्राने पाहिलं आहे!!

दादू : (कौतुकानं)…किती समंजस आहेस तू, सदूराया! शोभतोस हो माझा भाऊ!! मीसुद्धा समंजस आहेच! ही लॉकडाउनची भानगड नसती तर मीसुद्धा प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या असत्या! खास बटाटेवडे घेऊन आलो असतो, तुझ्यासाठी! दोघे मिळून वडापाव पार्टी केली असती! मगर यह हो न सका! कारण एकच-समंजसपणा! हो की नाही? 

सदू : (कुरकुरत) तू एरवी तरी कुठे फिरतोस लोकांमध्ये? साधे फोन घेत नाहीस!!

दादू : (घाईघाईने) सध्या परिस्थिती भयंकर आहे ना! अगदीच आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा, असं मी नेहमी लोकांना सांगतो! तेवढं आवश्यक काम माझ्याकडे नाहीए, मग मी कशाला घराबाहेर जाऊ? तूच सांग! 

सदू : (दिलासा देत) मी तरी कुठे बाहेर पडतोय? चौथ्या मजल्यावरून खालीसुद्धा उतरलेलो नाही! 

दादू : (कुतूहलानं) मग आज घरी काय बेत? शिक्रण का?

सदू : (नाक मुरडत) शिक्रण? आणि रविवारी? ह्या:!!

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दादू : (घाईघाईने विषय बदलत) ते जाऊ दे! काहीही बेत असू दे, पण रोज धात हुवत जा…आयमीन हात धुवत जा हो!! मास्क लाव! डोळ्यांवर चष्मा किंवा गॉगल लाव! मी तर म्हणेन की कानातसुद्धा बोळे घालून बसत जा! आपण आपली काळजी घ्यावी!

सदू : (आश्चर्यानं) कानात बोळे कशाला घालायचे दादू?

दादू : (डोळे मिटून) नको ते आवाजसुद्धा ऐकू येता कामा नयेत…म्हणून! मी गेले तीनेक महिने कानात जे बोळे घातलेत, काढलेच नाहीत! हाहा!!

सदू : (चिडून) तरीच! परवा आमच्या लोकांनी ‘पॉ-पॉ’ आंदोलन केलं, ते तुमच्या कानावर आलेलं दिसत नाही!

दादू : (गोंधळून) आँ? काय म्हणालास?

सदू : (आणखी चिडून) ते कानातले बोळे काढ बरं आधी! 

दादू : (आपण त्या गावचेच नाही, अशा बेतानं-) कोणी कसलं आंदोलन केलं म्हणालास?

सदू : (जमेल तितक्या संयमानं) आमच्या मनसैनिकांनी टॅक्सीचे हॉर्न वाजवले, बहिऱ्या सरकारला ऐकू जावं म्हणून!

दादू : (आश्चर्यानं) असं आंदोलन केलं का तुम्ही? अरेच्चा, मला कोणी कसं सांगितलं नाही?

सदू : (संतापून) तुम्ही कानात बोळे घालून बसला होता ना! कसं येणार ऐकू?

दादू : (एक पॉज घेत) तुझ्या तरी कानावर आले का सदूराया? जे वाजत नाही, ते गाजतही नाही, हे लक्षात ठेव! पुन्हा एकदा हॅपी बर्थडे! जय महाराष्ट्र!