esakal | ढिंग टांग  : एक कंपौंडर..!
sakal

बोलून बातमी शोधा

raut

‘‘अहो, शुक शुक! मी इकडे उभा आहे!’’ आम्ही त्यांचा मोहरा आवाजाच्या दिशेने वळवला. मास्क लावला की हे असे होते! श्वासोच्छ्वासागणिक चष्म्याच्या काचा दुधी होतात आणि काही दिसेनासे होते.

ढिंग टांग  : एक कंपौंडर..!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

आतला पेशंट बाहेर येण्याची वाट न पाहता आम्ही उठून डॉक्‍टरांच्या खोलीत गेलो. आश्‍चर्य म्हंजे खोलीत डॉक़्टर एकटेच बसले होते. शिरस्त्याप्रमाणे पेशंटसाठी ठेवलेल्या स्टुलावर जाऊन बसलो. (हे स्टूल ज्याने शोधून काढले, त्या लेकाच्याला पकडून त्याच स्टुलावर सहा तास बसवणार आहे! सापडू दे लेकाचा!!) 

‘‘तिथं बसू नका! लांब रहा!’’ डॉक्‍टर किंचाळले. आम्ही तटकन उठून कोपऱ्यात जाऊन उभे राहिलो. डॉक्‍टरांनी मास्क ठीकठाक केला. एक निःश्वास सोडला. तत्क्षणी त्यांच्या चष्म्यावर धुके आले.  

‘‘काय होतंय?’’ तिसरीकडेच पाहात डॉक्‍टऱांनी विचारले.

‘‘अहो, शुक शुक! मी इकडे उभा आहे!’’ आम्ही त्यांचा मोहरा आवाजाच्या दिशेने वळवला. मास्क लावला की हे असे होते! श्वासोच्छ्वासागणिक चष्म्याच्या काचा दुधी होतात आणि काही दिसेनासे होते. परवा मंडईत आम्ही काकड्या मागितल्या आणि श्रावण घेवडा पिशवीतून घेऊन आलो! जाऊ दे.

‘‘काय होताय?’’ आमच्या आवाजाचा (अर्जुनाप्रमाणे) वेध घेत डॉक्‍टरांनी मोहरा वळवला. 

‘‘होत काहीच नाहीए! पण तुमच्याकडे जे कं-’’ आमचे वाक्‍य अर्धवट राहिले.

‘‘मग आलात कशाला इथं कडमडायला? गरजेशिवाय बाहेर पडू नका, असं सांगितलंय ना?’’ डॉक़्टरांच्या चष्म्याच्या कांचा संतापाने आणखी दुधी झाल्या.

‘‘विशेष काही नाही, थोडं पडसं...घशात खवखवतंय!,’’ डॉक़्टरांना अगदीच ‘हे’ वाटायला नको म्हणून आम्ही उगीचच किरकोळ तक्रारींची मनातल्या मनात जुळवाजुळव करू लागलो. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘‘अरे बापरे!’’ डॉक्‍टर खचल्यासारखे खोल आवाजात म्हणाले. हल्ली डॉक़्टर मंडळींचे सारे काही बदलले आहे. ‘विशेष काही नाही, क्‍यान्सर झालाय’ असे आरामात सांगतील आणि पडसे झाल्यावर चेहरा उभा करतील! कालाय तस्मै नम:!!

‘‘तुमचा आरोग्य क्रमांक काय?’’ पुढ्यातल्या संगणकाकडे वळून डॉक्‍टर म्हणाले. आम्ही सांगितला, ‘बीएन ४२० !’

‘‘हा आरोग्य क्रमांक आहे की मोटारीचा नंबर?’’ डॉक़्टर पुटपुटले. आमचा नंबर संगणकात टाइप करताक्षणी आमची आरोग्य कुंडली त्यांच्या समोर प्रकटली! 

इथे आम्हाला आरोग्य क्रमांकाबद्दल थोडेसे सांगावे लागणार. महाकरुणामय ममत्त्वमूर्ती मा. नमोजी यांनी आम्हाला हल्ली आरोग्य कार्ड दिले आहे. पॅनकार्ड, आधार कार्ड, रेशन कार्डासारखे हे आणखी एक आरोग्य कार्ड!! त्यावरचा नंबर सांगितला की सारे उपचार फटाफट होतात म्हणे. पंधरा ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून त्यांनी ‘हेल्द कार्डा’ची घोषणा केली होती, तेच हे! कालाय तस्मै नम:!!

‘‘तुमचं आरोग्य कार्ड सांगतंय की तुम्हाला गेल्या कैक वर्षांत काहीही धाड भरलेली नाही. साडेसात वर्षांच्या वळूप्रमाणे तुम्ही टणटणीत आहात! तुम्हाला काही म्हणता काहीही झालेलं नाही! निघा!!,’’ डॉक़्टरांनी धाडकन निदान केले आणि बाहेरचा रस्ता बोटाने दाखवलान!

‘‘अहो, असं काय एकदम बाहेर घालवताय?’’ आम्ही कळवळून म्हणालो.

‘‘आरोग्य सेवा म्हंजे पोरखेळ वाटतो का तुम्हा लोकांना? आँ?’’ डॉक़्टरांच्या चष्म्याच्या दुधी काचा आता संतापातिरेकाने तडकणार, असे आम्हाला वाटू लागले.

‘‘आम्ही तुम्हाला भेटायला आलोच नव्हतो हो!’’ आम्ही धीर करून एकदाचे म्हणालो.

‘‘मग कशाला कडमडलात?’’ डॉक़्टर ओरडले. आम्ही सांगावे की न सांगावे, या विचारात थोडेसे घुटमळलो. शेवटी मनाचा हिय्या करून खरे काय ते सांगून टाकले- ‘‘ तुमच्या कंपौंडरची अपॉइण्टमेंट मिळेल का? एवढंच विचारायचं होतं!’’

शेवटी एक कंपौंडर, (इज इक्वल टू) लाख डॉक़्टर!