esakal | ढिंग टांग!  :  रुग्णाईताची शायरी! 
sakal

बोलून बातमी शोधा

ढिंग टांग!  :  रुग्णाईताची शायरी! 

सरणावरी अन लेटुनी, तो पाहतो स्वप्ने नवी, 
जनन आणि मरण दोनच, उंबरे असती शुभंकर 

अवकळा आली कशाने, जन्मभय का दाटले 
चाक फिरते, धूळ उडते, लोट उठती गा दिगंतर 

ढिंग टांग!  :  रुग्णाईताची शायरी! 

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

नष्ट झाला प्राणवायू, गुदमरे सारे चराचर 
रुग्णता कण्हते उशाला, श्वास झाला जीर्ण जर्जर 

बंद इथल्या गाववस्त्या, चौकही ओसाड झाले 
येथली रुग्णालयेही जाहली गा अस्थिपंजर 

चित्रगुप्ताच्या वहीतिल रोज भरती तीस पाने, 
लेखणी झिजवू नको रे, घे जरा ना खोडरब्बर 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दूर रोंरावीत जातो, रुग्णवाही सायरन तो, 
मृत्यूचा कर्णा पुकारे, वाट द्या हो यास सत्त्वर 

मृत्यूचे गाणे नभीं, गाती गिधाडांचे थवे, 
मृत्यूची भारी सुरावट, पाखरांची गोलचक्कर 

सरणावरी अन लेटुनी, तो पाहतो स्वप्ने नवी, 
जनन आणि मरण दोनच, उंबरे असती शुभंकर 

अवकळा आली कशाने, जन्मभय का दाटले 
चाक फिरते, धूळ उडते, लोट उठती गा दिगंतर 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

श्वास खेचून संपली, येथली जहरी हवा 
रे उदारा, त्यावरी तू घाल अमृताचीच फुंकर 

धुगधुगी प्राणात आहे, नाडीहि अजुनी चालते 
मोजके उरलेत आता, नि:श्वास ते काही निरंतर 

मोजले नाही कधी मी, घेतलेले श्वास तेव्हा 
आणि आता मोजितो गा, दोन बोटांचेच अंतर 

उंदरे सोकावली, बळदात दंगल माजली, 
झोपले परसात माझ्या आळशी ते काळमांजर 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

काय माझा येथला का, शेर आता संपला? 
खातेवहीच्या शेवटाला काय लिहितो हा कलंदर? 

कोठला आकांत हा, आक्रोश का करते कुणी? 
कोण मेले रक्त ओकून, कोण सुटले आधी-नंतर? 

काय जन्मा जीविताचे हेच का रे सार ते, 
एक गेला, मागुती ते राहिले रांगेत शंभर!