ढिंग टांग: हुय्या हुप्पा! (एका व्यायामेच्छूची कैफियत!)

ब्रिटिश नंदी
Monday, 19 October 2020

लॉकडाऊनच्या काळात घरबसल्या बराच वेळ मिळेल, त्याकाळात शरीराकडे लक्ष देता येईल, असे मनाने घेतले. नेमका व्यायाम कसा करायचा याची डायरीमध्ये पद्धतशीर नोंदच करुन ठेवली.

शुभस्य शीघ्रम! पुनश्‍च हरि ॐ करावयाचा आहे!!
सांगण्यास अतिशय आनंद होतो की, येत्या दसऱ्यापासून व्यायामाला लागायचे आहे. खऱ्या अर्थाने सीमोल्लंघन करायचे आहे. त्या दिवशी द्वापारयुगापासून बंद असलेल्या व्यायामशाळा सुरु होत आहेत. ‘याचसाठी केला होता अट्टहास’ ही भावना दाटून आली आहे. बाहु फुर्फुरत आहेत. शरीरातील स्नायूच्या पेशी पेशी रोमांचित झाल्या आहेत. व्यायामाचे दिवस परतणार, व्यायामशाळा सुरु होणार, ही बातमी ऐकल्यावर उत्साहाच्या भरात बसल्या जागी दोन जोर आणि तीन बैठका काढल्या. घाम आला! तो पुसण्यासाठी टावेल काढण्यासाठी कपाट उघडले. टावेल तळातल्या खणात दिसत होता. पण तो काढण्यासाठी वाकावे लागले असते!! लॉकडाऊनमध्ये घरात साताठ महिने काढलेल्या माणसाला कपाटाच्या तळातील कप्प्याशी उकिडवे बसून टावेल काढायला लावणे अमानुष आहे. अशा अवस्थेत घाम आणखी येतो. श्वास फुलतो. वाढीव पोटाचा घेर आडमाप शरीराबद्दल नाना तऱ्हेचे गंड निर्माण करतो. मन खचते!!..शेवटी घाम अंगावरच वाळवायचा असे ठरवले. व्यायाम (सुरु) केला पाहिजे असे लॉकडाऊनच्या आधीच ठरवले होते. आधी म्हणजे बरेच आधी! सुमारे तीस-चाळीस वर्षापूर्वीच नियमित व्यायाम करण्याचा निर्धार केला होता.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

लॉकडाऊनच्या काळात घरबसल्या बराच वेळ मिळेल, त्याकाळात शरीराकडे लक्ष देता येईल, असे मनाने घेतले. नेमका व्यायाम कसा करायचा याची डायरीमध्ये पद्धतशीर नोंदच करुन ठेवली. उदा. सकाळी उठल्यावर योग, प्राणायाम, बारा सूर्यनमस्कार आणि किमान पंचवीस जोर-बैठका!! दोरीवरच्या उड्या मारण्याचाही बेत होता, पण तो काही कारणाने रद्द करावा लागला. मॉर्निंग वॉकसाठी एकदा बाहेर पडलो, परंतु नाक्‍यावरच पोलिस दांडके घेऊन उभे होते. परत आलो! (डायरीतील नोंद!) लॉकडाऊनमध्ये एकंदर मिळून अडीच जोर आणि दीड बैठका काढल्या, अशी एक नोंद डायरीत आढळते. डायरीतील नोंदीनुसार एक एप्रिल २०२०च्या दिवशी सकाळी एक सूर्यनमस्कार घातल्याचे दिसते. पुढे कंसात ‘अपघात’ असे लिहिलेले आहे. त्या दिवशी (एकच) सूर्यनमस्कार घालताना डावा हात सटकला, आणि तोंडघशी पडायला झाले. तेव्हापासून मास्क मात्र नियमित वापरु लागलो. सुजलेले नाकाड लपवण्यासाठी उपयोग झाला. चालायचेच. मग मात्र रीतसर व्यायामशाळा सुरु झाल्याशिवाय काहीही करायचे नाही असे ठरवले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अधूनमधून ‘काय हे मुख्यमंत्री! व्यायामाशी यांचं येवढं काय हो वाकडं?’ अशी कुत्सित टीका मात्र (फेसबुक वगैरेवर) करत राहिलो. व्यायाम आपण कसा मिस करतो आहोत, हे लोकांना कळावे यासाठी व्हाट्‌सप स्टेटससुध्दा बदलले होते...आमच्या शरीराचा जो काही कोबीच्या गड्ड्यावाणी आकार झाला आहे, त्याला सर्वस्वी व्यायामशाळा न उघडणारे मुख्यमंत्रीच जबाबदार आहेत, असा समज पसरवण्यात आम्ही यशस्वी झालो.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

‘मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत एकेक गोष्टी अनलॉक होऊ लागल्या. पण आमचे मुख्यमंत्री व्यायामशाळा काही सुरु करीनात! त्याऐवजी त्यांनी ‘घरात रहा, मास्क लावा, हात धुवा,आणि अंतर ठेवा’ असा आग्रह धरला. व्यायामामुळे प्रतिकारशक्ती वाढते. पण त्यांनी ‘क’ जीवनसत्त्वाच्या आणि झिंकच्या गोळ्या खाण्याचा पर्याय उपलब्ध करुन दिला. त्यात मद्य दुकाने आणि मद्यालये उघडली. साहजिकच व्यायामशाळा सुरु करण्याचा आमचा आग्रह (आमच्या दंडांप्रमाणेच) पिळपिळीत झाला. व्यायामशाळा सुरु होईपर्यंत व्यायाम (सुरु) करायचा नाही, असे आम्ही अगोदरच ठरवले होते.

येत्या दसऱ्याला तो दिवस उजाडणार आहे. त्या दिवसाची आम्ही उत्सुकतेने वाट पाहू. हुय्या हुप्पा!

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dhing tang article about Exercise