esakal | ढिंग टांग : अनोखे बंधन!
sakal

बोलून बातमी शोधा

friendship-day

आपली मैत्री काही सहा-आठ महिन्यांची नाही.चांगली पंचवीस-तीस वरशांची आहे.आपण एकत्रच लहानाचे मोठे झालो नाही का?विधात्याने आपली जोडी बनवूनच प्रिथिवीवर पाठवली,असेच मला वाटते.तुम्हालाही तसे वाटते का? नसणार!

ढिंग टांग : अनोखे बंधन!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

प्राणप्रिय माननीय उधोजीसाएब यांच्या चरणारविंदी दाशी कमळाबाईचा शि. सा. न. आणि मानाचा मुज्रा! सध्या लॉकडाऊन असल्यामुळे पोष्टाने फ्रेंडशिप बँड पाठवत आहे, क्रुपया स्वीकार व्हावा. मागल्या खेपेला फ्रेंडशिप बँड पाठवला, तो नेमका राखीपौर्णिमेला तुमच्या हातात पडला! गैरसमज होऊन तुम्ही तो परत केलात, आणि आपले मैत्रीचे नाते तुटले ते तुटलेच! गेले काही महिने भेट नाही की बोलणे नाही. माझा फोन तुम्ही नेहमी कट करता!! हल्ली तर फोन केला तर कायम ‘ आप प्रतीक्षा कर सकते है, या दुबारा कॉल कर सकते है…तुम्ही वाट पाहू शकता’ असे कुणीतरी बाई खोचकपणाने सांगते. कोण ही बया? मला आश्चर्य वाटते की दुसऱ्याच्या नंबरावरुन फोन केला तरी तुम्ही माझा फोन कट कसे करता? हा माझाच फोन आहे, हे तुम्हाला कसे समजते? जाऊ दे.

आपली मैत्री काही सहा-आठ महिन्यांची नाही. चांगली पंचवीस-तीस वरशांची आहे. आपण एकत्रच लहानाचे मोठे झालो नाही का? विधात्याने आपली जोडी बनवूनच प्रिथिवीवर पाठवली, असेच मला वाटते. तुम्हालाही तसे वाटते का? नसणार! नाहीतर मला सोडून तुम्ही नवीन तीन-तीन मित्र कशाला गोळा केले असते? मित्रांची ग्यांग वाढत्या वयात बरी वाटते, परंतु, भविश्यात त्याचा काहीही उपेग होत नाही, हे आत्ताच तुम्हाला सांगते. आपली मैत्री तुम्ही विसरलां! ये दोसती हम नही तोडेंगे, असे गाणे म्हणता म्हणतानाच माझ्या स्कूटरला लावलेली साइडकार सुटी करुन तुम्ही दुसऱ्या वाटेने निघून गेलात (रेफरन्स : पहा : शोले सिनेमा! टीव्हीवर हमेशा लागतो. सध्या घरबसल्या पाहता येईल!!)

आपल्या मैत्रीत दरार आली असली तरी मी अजून नाद सोडलेला नाही बरं!! संधी मिळताच मी स्वत: येऊन तुमच्या मनगटावर फ्रेंडशिप बँड बांधीन, आणि तुमच्याकडून शिवबंधनाचा धागासुध्दा बांधून घेईन! खरी मैत्री दोघांचीच असते. तीन-चार जमवले की ग्यांग तयार होते. ग्यांग फक्त पार्टीपुरती असते. (पार्टी म्हंजे पुख्खा झोडण्यापुरती!) माझ्याशी असलेली फ्रेंडशिप सोडून तुम्ही ग्यांग जमवली. ही ग्यांग तुम्हाला लाभणार नाही! नाही! नाही!! शेवटी तुम्हाला माझ्या फ्रेंडशिप बँडचा स्वीकार करावाच लागेल. आज फ्रेंडशिप डे आहे, म्हणून लिहिते आहे. दर फ्रेंडशिप डेला मी निवडक काही लोकांना मैत्रीचे बंधन पाठवते. काही जणांना राखीही पाठवते! किंबहुना पाठवलेला धागा फ्रेंडशिपचा आहे की राखीचा, हे कालांतराने ठरते. म्हटले तर राखी, नाहीतर फ्रेंडशिप!! पण औंदा लॉकडाऊनमुळे फ्रेंडशिप डे आणि राखीपौर्णिमा दोन्ही कोरड्याच  जाणार असे दिसते. मी इतक्या लोकांना फ्रेंडशिप बँड आणि राख्या (पोस्टाने) पाठवल्या, पण कोणी रिप्लायच  करत नाही.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

तेलविहीर खोदण्यासाठी वाळवंटात जावे आणि वाळूशिवाय हाती काही लागू नये, अशी उंटावरच्या शहाण्या अरबासारखी माझी अवस्था झाली आहे. तरीही मी प्रयत्न सोडणार नाही. कारण म्हटलेच आहे : प्रयत्ने वाळूचे कण रगडितां तेलही गळे!! असो. (सध्या राजस्थानातील वाळूवर माझी प्रॅक्टिस चालली आहे. पुन्हा असो.) सध्या वाळवंटात येऊन पडल्यासारखी झाल्ये आहे, हे खरे, पण लौकरच तेल आणीन! या वाळवंटात मी मैत्रीचे ओआसिस फुलवीन, तरच नावाची कमळा! बाकी सर्व ठीक. हॅप्पी फ्रेंडशिप डे आणि राखी पौर्णिमेच्या पुन्हा शुभेच्छा. सदैव आप की अपनी. कमळाबाई.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा