esakal | ढिंग टांग : जड झाले ओझे! 

बोलून बातमी शोधा

ढिंग टांग : जड झाले ओझे! 

देर आये, दुरुस्त आये! येत्या आईतवारी आम्ही प्रात:काळी प्रो. गुलाबशेठ यांच्या दुकानी पुन्हा एकवार जाणार आणि डोक्‍यावरचे जड झालेले ओझे कमी करणार. क्षण एक पुरे कातरीचा, वर्षाव पडो लॉकडाऊनचा!!

ढिंग टांग : जड झाले ओझे! 
sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

युगानुयुगांच्या प्रदीर्घ कालखंडानंतर अखेर केशकर्तनालये उघडणार, या बातमीने आमच्या मनाला जो बेसुमार आनंद झालेला आहे, तो आमच्या चेहऱ्यावर दिसणे कठीण आहे. कां की गेल्या तीन महिन्यांत मस्तक आणि चेहरेपट्टीत बरेच रान माजले आहे. 

डोक्‍याची अवस्था शिप्तर घातल्यासारखी झाली आहे. गालावरल्या बरड माळरानांवर प्रचंड रान माजले आहे. मुखावर मास्क लावण्याची खरे तर गरजच उरलेली नाही, येवढे निबीड 

अरण्य व्हटांच्या आसपास उगवले आहे. भयापोटी आम्ही आमच्या घराच्या 
ग्यालरीतदेखील उभे राहाणे टाळतो आहो! आमच्या शेजारील एका महाभागाच्या डोईवरील जंजाळात चिमण्यांनी खोपा केल्याचे दिसून आल्याने आम्ही ही दक्षता घेऊ लागलो आहो! कारण, पक्ष्याचे एक जोडपे आमच्या भोवती दोन दिवस घिरट्या घालून पाहणी करून गेले आहे. 

आत्ताच आमच्या दाढीचा आकार इतका लंबायमान झाला आहे की, ही दाढी आहे की सुगरणीचे घरटे, असे कोणालाही वाटेल!! आणखी काही काळ असाच गेला तर बऱ्याच पक्षिगणांचा नैसर्गिक अधिवास म्हणून आमच्या मस्तकाचे क्षेत्र जाहीर करावे लागेल, हे भय आहे. तूर्त आम्ही साळिंदरासारखे (मागील बाजू) दिसत आहो!! हल्ली आम्ही झोपताना डोक्‍याखाली उशी घेणेही बंद केले आहे. लॉकडाउनच्या काळात निसर्गाने कात खरोखर टाकली आहे, यात शंका नाही. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

तात्पर्य एवढेच की, गेल्या तीन महिन्यांत आमच्या मस्तकाला हत्त्यारस्पर्श झालेला नाही. प्रो. गुलाबशेठ ( धी क्‍लासिक हेअर कटिंग सलूनचे मालक! ""कोनाला पन विच्यारा, आनून सोडनार म्हंजे सोडनार''!! ) यांच्या हातातील कातरीची कचकच कानी पडलेली नाही. त्यांच्या दुकानी (खुर्ची रिकामी होण्याची वाट बघताना) हाताला लागलेली जुनीपानी सिनेमासिके तर 

दृष्टीसदेखील पडलेली नाहीत. बेसावध क्षणी तोंडावर पाण्याचा फवारा येऊन सुरुवातीला गुदमरल्यागत आणि नंतर ताजेतवाने वाटण्याचा अनुभव घेतलेला नाही. प्रो. गुलाबशेठ यांचे सद्यःस्थितीबाबतचे अचूक आणि मर्मग्राही विश्‍लेषण कानावर पडलेले नाही. नको नको म्हणताना, टाल्कम पावडरीचा मुलायम पफ "फफक फफक' असा नाजूक आवाज करत मानेवर फिरलेला नाही. "काणामागूण लाइन' ओढण्यापूर्वी (वस्तरा परजत ) प्रो. गुलाबशेठ यांनी घेतलेली नम्र परवानगी कानावर आलेली नाही. नाहीतर येवढ्या आदराने आमच्याशी एरवी कोण बोलते? 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या साऱ्या सर्वंकष अनुभवाला आम्ही पारखे झालो होतो. केशकर्तनालयात केस कापून घेण्यासाठी जायचे असते, अशी एक भ्रामक समजूत काही जणांमध्ये आहे. अशी माणसे घरच्या घरी दाढी करतात! इतकेच नव्हे तर घरच्या घरी केस कापण्याचा खटाटोपदेखील करून बघतात, हे खेदजनक आहे. हे म्हंजे घरच्या घरी ओली भेळ आणि पाणीपुरी करण्यापैकीच आहे, असे आमचे मत आहे. 

सलूनमध्ये जाणे, ही मनुष्यप्राण्याची एक सामाजिक गरज असते. शेवटी मनुष्य हा सोशल प्राणी आहे. म्हणूनच सोशल डिस्टन्सिंगच्या नावाखाली या सलूनकर्मावर पहिली गदा आली. 

ज्या दिवशी लॉकडाउनची घोषणा झाली, ती आम्ही प्रो. गुलाबशेठ यांच्या दुकानातील चिमुकल्या टीव्हीवरच ऐकली होती. "खऱ्याची दुनिया नाय राहिली साहेब!' हे प्रो. गुलाबशेठ यांचे तेव्हाचे उदगार अजूनही आमच्या कानात घुमत आहेत. 

देर आये, दुरुस्त आये! येत्या आईतवारी आम्ही प्रात:काळी प्रो. गुलाबशेठ यांच्या दुकानी पुन्हा एकवार जाणार आणि डोक्‍यावरचे जड झालेले ओझे कमी करणार. क्षण एक पुरे कातरीचा, वर्षाव पडो लॉकडाऊनचा!! 

दाढीवाला गृहस्थ लॉकडाऊनला भीत नसतो...बढती का नाम दाढी!! काय म्हंटा?