esakal | ढिंगटांग  : जम्बो राजाची जंमतगोष्ट ! 
sakal

बोलून बातमी शोधा

ढिंगटांग  : जम्बो राजाची जंमतगोष्ट ! 

जंबो पर्वत उभा राहिला, पण झाली पंचाईत 
पर्वताच्या दिशेनं लेकाचे ढग, मुळीच आले नाईत 
पर्वत उभा रिकामा आणि एकटा वाट पाही 
पब्लिक म्हणे आम्हाला याची गरजच नाही 

ढिंगटांग  : जम्बो राजाची जंमतगोष्ट ! 

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

एक होता जंबो राजा, त्याच्या राज्यात होती मजा 
तीन सरदार तालेवार त्याचे, इजा बिजा आणि तिजा 
एकदा काय झालं की, राज्यात पडला दुष्काळ 
पावसाचा नाही टिपूस अन, प्रजा झाली बेहाल 

इजा, बिजा तिजा म्हणाले : ""महाराज करा दया 
आपला सामान्य माणूस तो अब्बी पूरा काम से गया! 
काहीही करा चमत्कार, पण जोरात पाऊस पाडा 
पावसाविना कसा चालणार, राज्याचा तीन चाकी गाडा?'' 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

राजा पावसावर संतापला, हिरमुसून घरात बसला 
अंत:पुरातून बाहेर, येता येईना झाला! 
एक दिवस त्याने बोलावला ऑनलाइन दरबार 
म्हणाला : ""हळूवार सोडवू प्रश्न...एकदम हळूवार!'' 

घरात बसा, मास्क लावा, हात धुवा बार बार 
एवढं सांगून दरबाऱ्यांना राजा सांगे हळूवार 
""घाईलाही उशीर लागतो, एवढी कसली घाई? 
जीव घाबरा व्हावा, ऐसी कौनसी नौबत आई?'' 

राजाने विचारलं तिघांना : पाऊस कोण पाडतो? 
इजा म्हणाला : पाऊस तर डोंगराला अडतो! 
बिजा म्हणाला : डोंगर नाही तर पाऊस नाही, महाराज! 
तिजा म्हणाला : डोंगर हवाच... महाराज, राखो लाज! 

राजाने तेथल्या तेथे मग सोडला एक आदेश 
वेशीबाहेर पठारावर डोंगर बांधा बेश! 
उंच, उन्नत, उत्तुंग उभा राहू दे पर्वत 
अडवा त्या ढगांना, पळपुटे बेमुर्वत! 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

इजा बिजा तिजा तिघे शूर शिलेदार 
लागले नि काय कामाला, जोशात जोरदार 
बांधा, कापा, खोदा, हुय्या हुप्पा, चांगभलं, 
डोंगरबांधणीच्या कामानं राज्य दुमदुमलं 

बघता बघता उभा राहिला उंच उंच पर्वत 
ताशीव कडेकपाऱ्यांचा कठोर बेलाग पर्वत 
बघतानाच टोपी पडेल, असा उन्नत पर्वत 
अबाबाबा, अयोबायो, क्‍येवढा जंबो पर्वत 

राजानंच कापली फित, केलं ऑनलाइन उद्घाटन 

सुखात राहोत, म्हणाला, आपले लाडके गिरीजन 
हाच पर्वतराज तारील आपले सारे प्रजाजन 
आडेल ढग, पडेल पाऊस, हिरवं होईल मन 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जंबो पर्वत उभा राहिला, पण झाली पंचाईत 
पर्वताच्या दिशेनं लेकाचे ढग, मुळीच आले नाईत 
पर्वत उभा रिकामा आणि एकटा वाट पाही 
पब्लिक म्हणे आम्हाला याची गरजच नाही 

जंबो पर्वत, जंबो खर्च, जंबो दगडमाती 
राज्याच्या मागे लागली आहे जंबो साडेसाती 
इजा बिजा तिजा झाले जंबो हवालदिल 
जंबो राजाची जंबो गोष्ट सदा अमर राहील