ढिंग टांग : मुख्यमंत्री व्हायचंय मला...!

ब्रिटिश नंदी
Monday, 25 January 2021

राष्ट्रवादी नेते मा. जयंत्राव यांनी ‘मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे,पण...’ असे एका मुलाखतीत स्वच्छ शब्दात सांगून टाकले. त्यांच्या या स्वच्छ भाषेतील कबुलीनाम्यामुळे महाराष्ट्रात एकच राजकीय खळबळ उडाली.

राजकारणात येणाऱ्या प्रत्येकाचे अंतिम स्वप्न मुख्यमंत्री होण्याचेच असते. इतकेच कशाला, आम्ही राजकारणात नसून आम्हालाही कधी कधी मुख्यमंत्री असल्याचे स्वप्न पडते. (अनेक पत्रकारांनाही आपण मुख्यमंत्री असावे, असे अधून मधून वाटते.) आमचे परममित्र आणि राष्ट्रवादी नेते मा. जयंत्राव यांनी ‘मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे, पण...’ असे एका मुलाखतीत स्वच्छ शब्दात सांगून टाकले. त्यांच्या या स्वच्छ भाषेतील कबुलीनाम्यामुळे महाराष्ट्रात एकच राजकीय खळबळ उडाली. खरे तर तशी खळबळ उडण्याचे काही कारण नव्हते. पण उडाली! या निमित्ताला टेकून आणखी कोणा कोणाला मुख्यमंत्री व्हावयाचे आहे, याचा कानोसा आम्ही घेतला. काही निवडक पुढाऱ्यांना म्हटले, ‘‘तुम्ही तरी कां मागे राहता? तुम्हीही सांगून टाका!’’ तेव्हा लक्षात आले की अनेकांनी आधीच आपली महत्वाकांक्षा ऑलरेडी जाहीर केलेली आहे. काही नेत्यांनी आम्हाला त्यांचे मनोगत थोडक्‍या शब्दात सांगितले. तेच येथे देत आहो.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मा. आशुक्राव नांदेडकर : कोणे एके काळी मी महाराष्ट्राचा आदर्श मुख्यमंत्री होतो, असे अंधूक आठवते. संधी मिळाली तर मुख्यमंत्री व्हायची इच्छा आहे. पण आपल्याला काही घाई नाही. वीस-बावीस, पन्नास-पंचावन वर्ष लागली तरी चालतील, आपण थांबू!

मा. बाळासाहेब जोरात : इथे प्रदेश अध्यक्षाचं काही खरं नाही आमच्या! मुख्यमंत्री कसले होताय? हायकमांडनी सांगितलं, तर कुठलीही जबाबदारी स्वीकायला तयार आहे. तसे मी हायकमांडशी बोलून ठेवले आहे. पण त्यावर हायकमांड नुसत्या (फिक्कन) हसल्या!

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मा. दादासाहेब बारामतीकर : हे बघा, कोणाला काय व्हावं वाटेल, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मी याठिकाणी उपमुख्यमंत्री होतो, त्याठिकाणीही होतो, आणि याठिकाणी आहे आणि यापुढेही राहीन! चार वर्षांनंतरचं कुणी सांगितलंय? मी काही भविष्यवाला नाही! निघा!!

मा. नारोबादादा : आवशीक खाव! शिरा पडो तुज्या तोंडार! उब्या महाराष्ट्रात मुख्येमंत्रीपदाचो खरो लायक उमेदवार मीच आसंय! पण म्हणतंत ना, आवळीत कावळो! मुख्यमंत्रीपदाचा निस्ता बाजार मांडलाहा! त्येका कित्याक इचारतंस? फेबुरवारीत ह्या सरकार पडतला... ही काळ्या धोंड्यारची रेघ आसंय, बगा!...हात...मर मेल्या!

मा. चुलतराजसाहेब : कोऽऽण मुख्यमंत्री? कसलाऽऽ! अरे काही (शिव)उद्योग नाहीत का रे तुम्हाला? मी महाराष्ट्राच्या हृदयात आहे, मुख्यमंत्रीपद काय चाटायचंय? त्याच्यासारखं आंबट चवीचं या महाराष्ट्रात दुसरं काहीही नाही. मुख्यमंत्री असं म्हणतानाही चिंच खाल्यागत वाटतं. मरो!

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मा. मुनगंटीवारजी : कोण मी मुख्यमंत्री? काहीतरीच...छे... (इथे खुदुखदु हसल्याचा अर्थपूर्ण ध्वनी. पुढे खुशीखुशीत गाणे गुणगुणत) मेरी नींदो में तुम, मेरे ख्वाबो में तुम, हो गए हम तुम्हारी मुहोब्बत में गुम...

मा. चंदूदादा : गाजरांचा भाव काय आहे हो हल्ली पुण्याच्या मंडईत?

मा. पंकजाताई : जनतेच्या मनातली मुख्यमंत्री मीच आहे, हे मी आधीच सांगून ठेवलंय! काय? कळलं ना?

मा. नानासाहेब फडणवीस : माझं स्वप्न मुख्यमंत्री होण्याचं नसून ‘पुन्हा’ मुख्यमंत्री होण्याचं आहे, हे विसरु नका! मी या भाऊगर्दीत नाही!

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

मा. उधोजीसाहेब : मी इथे येऊन बसल्यावर सगळ्यांनाच कशी अचानक मुख्यमंत्रीपदाची स्वप्न पडू लागली? निदान मुख्यमंत्रीपदाबाबत तरी राजकारण नको, असं मी आवाहन करतो! दरम्यान तुम्ही सगळे वारंवार हात धुवा, मास्क लावा आणि अंतर पाळा! जय महाराष्ट्र.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dhing tang article about maharashtra cm politics