ढिंग टांग : कवच, वचवच आणि कचकच !

ढिंग टांग : कवच, वचवच आणि कचकच !

प्रिय मित्रवर्य मा. उधोजीसाहेब, शतप्रतिशत प्रणाम. 

पत्र लिहिण्यास कारण की आपण आमची सुरक्षा व्यवस्था काढून घेतल्यामुळे अगदी मोकळे मोकळे वाटत आहे. त्याबद्दल धन्यवाद. इतके मोकळे मला गेल्या वर्षभरात कधी वाटलेले नाही. सकाळी उठून घराबाहेर आलो तर सामसूम होती. एरवी मला बघून ड्यूटीवरचे सुरक्षारक्षक उठून उभे राहात, सलाम करत असत. मीही त्यांना ‘चहा घेतला का?’ असे आपुलकीने विचारत असे. ते आपुलकीने ‘नाही’ असे म्हणत...पण आज दारासमोरचे स्टूल रिकामे होते. पाहातो तो काय, सगळे सुरक्षारक्षक एकगठ्ठा गायब!  तुम्ही आमची आख्खीच्या आख्खी ‘सुरक्षाव्यवस्था’ घरी पाठवल्याचे तेव्हाच समजले! काही हरकत नाही. आमचा चहा वाचला!! 

आमचे कमळाध्यक्ष मा. चंदुदादा कोल्हापूरकर (पुणेकर) यांना फोन केला. म्हटले,‘येताय ना कार्यालयात मीटिंगला?’ तर ते म्हणाले की, ‘कसा येणार? पुण्यात अडकलोय! सिक्‍युरिटीवाले आलेच नाहीत!’

तेवढ्यात आमचे चंद्रपूरचे वाघ मा. मुनगंटीवार्जी यांचाही फोन आला. ते म्हणाले, ‘ घराबाहेर कसा पडू? सिक्‍युरिटीवाले दिसत नाहीत. आमच्या एरियात वाघांचा संचार असतो!’ 

मी त्यांना स्वच्छ सांगून टाकले की, ‘आपले पक्ष कार्यकर्ते हेच आपले सुरक्षा कवच आहे, आपल्याला पोलिस संरक्षणाची काय गरज?’

त्यांनी ‘बरं’ असे पडेल आवाजात म्हणून फोन ठेवला. काही लोकांना पोलिस संरक्षण घेऊन फिरणे प्रतिष्ठेचे वाटते. पण मला तरी वेगळेच फीलिंग येते. पोलिसांचे ताफे, बुलेट प्रूफ गाड्या असला जामानिमा असला की आपण कुणी नामचीन संशयित असून कोर्टासमोर उभे करण्यासाठी आपल्याला कडक बंदोबस्तात नेण्यात येत आहे, असे वाटू लागते. याला का प्रतिष्ठा म्हणायचे? पिंजऱ्याच्या गाडीत बसून पोलिस ठाण्यात नेण्यात येणाऱ्या नामचीन गुंडाला ‘वा! काय रुबाब आहे बुवा एका माणसाचा!’ असे कुणी सांगते का? नाही! 

तेव्हा मला तरी अगदी स्वतंत्र वाटते आहे, याबद्दल खात्री बाळगा. एरवी बाहेर पडताना ड्यूटीवरला शिपाई ‘साहेब, मास्क लावा’ अशी आठवण करुन देत असे. चटकन सॅनिटायझरची बाटली काढून दोन थेंब आमच्या हातावर टाकत असे. ती कटकटही गेली! 

तुम्ही ‘वर्क फ्रॉम होम’ करत होता, त्या काळात आम्ही ‘होम फ्रॉम वर्क’ करत होतो. म्हणजेच सगळीकडे हिंडत होतो. सुरक्षा कवच नाही, म्हणून आमचे हिंडणे आता थांबेल असे नाही. उलट जास्त हिंडू!! 

पुन्हा थॅंक्‍यू! 

आपला (माजी) मित्र नानासाहेब फ.
....................
नानासाहेब-
जय महाराष्ट्र. तुमचे पत्र मिळाले. तुमचा चहाचा खर्च वाचला हे वाचून आनंद झाला. पण सॅनिटायझरचा खर्च आता वाढेल, हे ध्यानी घ्या. कुणीही हातावर दोन थेंब टाकायला येणार नाही!! 

पक्ष कार्यकर्ते हे सुरक्षा कवच असेल तर तेच घ्या! त्यांना चहासोबत वडा, भजी, पोहे, वगैरेही द्यावे लागेल याचीही जाणीव ठेवा. तुमची सिक्‍युरिटी काढून घेण्याचा निर्णय आम्ही घेतला त्याला काही गंभीर कारणे आहेत. साथरोगाचे संकट टळलेले नाही. त्यात बर्ड फ्लूचे संकट उडत उडत  येते आहे. अशा परिस्थितीत तुम्ही जास्त हिंडू नये असे आम्हाला वाटते. तुम्ही हिंडलात की मनस्ताप होतो. त्यात तुम्ही योग्य पद्धतीने सोशल डिस्टन्सिंग पाळत नसल्याचे अहवाल प्राप्त झाले आहेत. ‘मी पुन्हा हिंडेन, मी पुन्हा हिंडेन’ अशा धमक्‍या देऊ नका! उपयोग होणार नाही. कळावे. उधोजी. (मा. मु.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com