esakal | ढिंगटांग  : भोंकर : एक मीडियास्टार! 
sakal

बोलून बातमी शोधा

mediastar

न्यूज भोंकराने बातम्या सांगण्याच्या नावाखाली आपला सन्मान केला की अपमान याची टोटल लागण्याआधीच आम्हाला एकदम "भो भो भो भो' असा भोंकार ऐकू येऊ लागतो. 

ढिंगटांग  : भोंकर : एक मीडियास्टार! 

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

स्थळ : आपलं घर...समोर टीव्ही! टीव्हीवर बातम्यासदृश काहीतरी हालचाली, आणि एक सुप्रसिद्ध, मीडियास्टार अँकर...नव्हे, भोंकर! 

तसे पाहू गेल्यास आम्ही टीव्हीवरच्या बातम्या फारशा चवीने पाहात नाही. आमचा टिप्या मात्र आवडीने पाहातो! पण आज दिवस वेगळा आहे. आम्ही टीव्हीसमोर चक्क एक वृत्त वाहिनी उघडून बसलो आहो. अर्थात, अखिल जगताचे ज्ञान व्हावे, म्हणून आम्ही टीव्हीसमोर बसलेलो नाही. त्रिखंडातला  कंटाळा आमच्या देहादेहात भिनलेला आहे, आणि द्वापरयुगापासून सुरु असलेल्या लॉकडाऊनची अवकळा चेहऱ्यावर आहे. काय क्रावे ब्रे? आम्ही वाढलेली दाढी खाजिवतो, आणि टीव्हीकडे नजर टाकतो. टीव्हीच्या पडद्यावर आता न्यूज भोंकर दिसतो आहे. त्याच्या चेहऱ्यावर भुकेल्या टिप्याचा उन्माद आहे. (टिप्याबाबत टिप : टिप्या आमच्या घरातील एक चतुष्पाद मेंबर! दोन-तीन टाइम खावे, टीव्ही बघावा, उरलेल्या वेळेत झोपा काढाव्यात, आणि या कामाप्रीत्यर्थ धन्याकडून थोडे कुर्वाळून घ्यावे, अशा वृत्तीचा हा प्राणी! सुखी गृहस्थ! असो.) तेवढ्यात- 

न्यूज भोंकर : (चेहरा क्रुद्ध) एऽऽ&जी! 

...इथं आम्ही सावरुन बसतो. बऱ्याच दिवसात आम्हाला कोणी "एऽऽ' असे म्हटलेले नाही, आणि "जी" तर कधीच म्हटलेले नाही! न्यूज भोंकराने बातम्या सांगण्याच्या नावाखाली आपला सन्मान केला की अपमान याची टोटल लागण्याआधीच आम्हाला एकदम "भो भो भो भो' असा भोंकार ऐकू येऊ लागतो. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

""टिप्याऽऽ...गप रे!'' आम्ही कंटाळून ओरडतो. आमचा आवाज खोल गेला आहे. पण टिप्या (पुढील) दोन पायांवर मस्तक टेकवून तो गाढ झोपी गेला आहे. मग भुंकले कोण? 

टीव्हीतूनच भोंकार सुरु होता! 

...आम्ही पुन्हा सावरुन बसतो. बातम्या चालवताना फिल्मी गाणीबिणी वाजवणे आता जुने झाले. कुणी गेल्याची बातमी असेल तर आधी बासरीच्या करुण सुरांचे पार्श्वसंगीत सुरु होते, तेदेखील आता जुने झाले. भोंकाराची ट्यून नवीन होती. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

न्यूज भोंकार : (बसल्या जागी खुर्चीत कुदत...) नेशन वॉंण्टस टु नो! मी सगळ्यांना एक्‍सपोज करीन! उघडं पाडीन! अगदी चारचौघात (शब्द न सुचून) "हे' करीन!!...लोकशाहीची ही हत्त्या कोण करतंय, हे जगाला ओरडून सांगीन!.. 

...इथे टिप्याने "भु:' असा एकाक्षरी प्रतिसाद देत कान टवकार्ले. आपल्यापेक्षाही अधिक मोठ्या आवाजात ओरडणारा पृथ्वीतलावर कुणीतरी आहे, या जाणीवेने नाही म्हटले तरी त्याची अस्मिता दुखावली असणार! न्यूज भोंकाराच्या प्रचंड आरडाओरडीनंतर आम्हाला तीन शोध लागोपाठ लागले. एक, लोकशाहीची हत्त्या कुठे तरी झाली आहे. दोन, देशाला त्याची माहिती मिळण्याची नितांत गरज आहे, आणि तीन, एखाद्याला चार चौघात "हे' करणं म्हणजे 

काहीतरी भयंकर असलं पाहिजे... 

न्यूज भोंकार : (एकाच वेळी बारा मृतात्मे अंगात आल्यागत) टाळ्या वाजवा! थाळ्या वाजवा! आनंद करा!! हा आमच्या च्यानलचा विजय आहे! आमच्या च्यानलनेच सर्वात पहिले ब्रेकिंग न्यूज दिली होती! लेट्‌स सेलेब्रेट!! चीअर्स!! 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आम्ही काही न सुचून पुन्हा दाढी खाजवली. टिप्या मात्र आनंदाने भुभुकार करत गोल गोल स्वत:शीच फिरला...टीव्ही बंद करुन आम्ही टिप्याला जवळ बोलावले. कुर्वाळत त्याला मायेने म्हणालो, "" नाही रे बघू असं काही! दूधभात देऊ का तुला, अं?'' 

आम्हाला बिलकुल प्रतिसाद न देता टिप्या बंद टीव्हीसमोर उभा राहून फक्त शेपूट हलवत राहिला. असोच!