esakal | ढिंग टांग : माय योगा, माय वाईफ! 
sakal

बोलून बातमी शोधा

ढिंग टांग : माय योगा, माय वाईफ! 

"माय लाइफ, माय योगा' कांपिटिशनमध्ये तीन मिनिटांचा  योगा करतानाचा व्हिडिओ  काढायचा आणि फेसबुकावर टाकायचा! बास!!  एक लाखाचं पहिलं बक्षीस आहे!! चार पैसे मिळाले तर नको आहेत्का?   

ढिंग टांग : माय योगा, माय वाईफ! 

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

सौभाग्यवती : (नेहमीच्या सळसळत्या उत्साहात) अहो, ऐक्‍लंका? कायकर्ताय? 

श्री : (मोबाइलमध्ये डोकं खुपसून) पेपर वाचतोऽऽय! 

सौ. : (विषय काढत) मी कायम्हंटे...आप्ला व्हिडिओ काढा ना एक! 

श्री : (दचकून मोबाइल मिटत) आँ? क...क...काय? 

सौ. : (पदराशी चाळा करत) आप्ला योगा करतानाचा व्हिडिओ...काढा ना! 

श्री : (खचलेल्या सुरात) काहीत्तरीच तुमचं! योगा कसला योगा? 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सौ : (खुलासा करत) आपल्या नमोजींनी कांपिटिशन घेतलीये ना, योगाची!! "माय योगा, माय लाइफ'! त्यात भाग घ्यायचाय!! 

श्री : (नरमाईच्या सुरात) ही आपली कामं नव्हेत! योगा करणं म्हंजे चेष्टा आहे का? मागल्या खेपेला योगासनं केली तर तीन दिवस सिक लिव टाकावी लागली होती! 

सौ. : (फणकाऱ्यानं) आता कुठं आलाय प्रश्न सिक लिवचा? घरात्तर बस्लेले अस्ता रात्रंदिवस! 

श्री : (निर्वाणीचा इशारा देत) हे बघ, ते नमोजी टीव्हीवर येऊन दरवेळी काहीतरी टास्क देतात! टाळ्या-थाळ्या वाजवणं, मेणबत्त्या लावणं इथवर ठीक आहे! पण ही योगाची कांपिटिशन जरा जास्तच होतं! उगीच अंगाशी खेळ नको! 

सौ : (फुरंगटून) तुम्हाला मेली कसली हौसच नाही! समोरच्या सोसायटीतले ते जोशी बघा! 

श्री : (युक्तिवाद करत) पाच जोशी राहतात तिथे! त्यातला कुठला म्हणतेयस? 

सौ. : (ठणकावून) ते पोलिसात आहेत ते!! 

श्री : (उग्रपणे) तो जोशी! आहेत नाही, होते!..त्याचं काय? 

सौ. : (हातवारे करत) ते लॉकडाऊनमध्येसुद्धा रोज शंभर जोर-बैठका काढतात! नाही तर तुम्ही! 

श्री : (हेटाळणीच्या सुरात) जोशी आणि शंभर जोर-बैठका? हाहा!! माणूस ठेवला असेल त्यानं तेवढ्यासाठी!! रिटायर होऊन दोन वर्ष झालीयेत त्याला! खा खा खाऊन-(पुढील शब्द ऐकू येत नाहीत...) 

सौ. : (विषय घट्ट धरून ठेवत) ते काही नाही! "माय लाइफ, माय योगा' कांपिटिशनमध्ये तीन मिनिटांचा योगा करतानाचा व्हिडिओ काढायचा आणि फेसबुकावर टाकायचा! बास!! एक लाखाचं पहिलं बक्षीस आहे!! चार पैसे मिळाले तर नको आहेत्का? 

श्री : (अजीजीने) अंगमेहनत करून पैसे मिळवू का या वयात? 

सौ. : (पदर खोचून) काय हर्कत आहे म्हंटे मी!! नुसता खायला काळ नि भुईला भार असं किती दिवस चालणार? 

श्री : (संतापून) रोज धुणीभांडी करतोय! झाडूपोछा करतोय! या हालचालीत माझी वीस-पंचवीस योगासनं आरामात होऊन जातात! उदाहरणार्थ, काल पलंगाखालचा कचरा काढताना मला मयुरासन करावं लागलं होतं! पंखा पुसताना ताडासन आणि कपडे वाळत घालताना पवनमुक्तासन झालं!... 

सौ. : (दुप्पट संतापून) दिवसभर इथे शवासन चाललेलं असतं नुस्तं! 

श्री : (निषेधाच्या सुरात) हा...हा...हा...रानटी प्रकार आहे! शोषण आहे शोषण! मी योगा करणार नाही! योगा न करणं हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, आणि तो मी मिळवणारच!! 

सौ. : (कमरेवर हात ठेवून) ठीक आहे! याचा अर्थ तुम्हाला देश आत्मनिर्भर करण्यात काडीचं इंटरेस्ट नाहीए! 

श्री : (प्रेमाने) आहे तर! नक्कीच आहे. आहे म्हंजे आहेच! किंबहुना इंटरेस्ट आहे म्हणून तर सगळं आहे! पण आधी मला माझा महाराष्ट्र आत्मनिर्भर करायचा आहे! करणार म्हंजे करणारच! केल्याशिवाय राहणार नाही! अर्थातच करणार! किंबहुना करणारच... 

(लॉकडाऊन कंटिन्यूज...) 
ब्रिटिश नंदी