esakal | ढिंग टांग :  ...भर्भर आत्मनिर्भर व्हाबरं! 

बोलून बातमी शोधा

ढिंग टांग :  ...भर्भर आत्मनिर्भर व्हाबरं! 

माणसाने कसे हमेशा आत्मनिर्भर असावे. मनात आले जेवले, हादडले! झोप झोप झोपले!! पुन्हा मनात आले, पुन्हा हादडले, पुन्हा झोपले!! ज्याला हे जमले तोचि आत्मनिर्भर जाणावा.

ढिंग टांग :  ...भर्भर आत्मनिर्भर व्हाबरं! 
sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

मित्रों, माणूस जन्मत:च आत्मनिर्भर असतो. माणूस जसजसा मोठा होतो, तसतसा तो आत्मनिब्बर होत जातो आणि पुढे पुढे संसाराचा लबेदा मागे लागला की तो आत्मरब्बरच होतो. कितीही घासा, खोडा, ताणा, कापा...हरवा! काहीही फरक पडत नाही. जणू कंपासपेटीतले खोडरब्बरच. माणसाचे एकदा असे रब्बर झाले की जब्बर लोच्या होतो. मुख्य म्हणजे या सगळ्या काळात तो आपण कोणे एकेकाळी आत्मनिर्भर होतो, हेच विसरून जातो. 

माणसाने कसे हमेशा आत्मनिर्भर असावे. मनात आले जेवले, हादडले! झोप झोप झोपले!! पुन्हा मनात आले, पुन्हा हादडले, पुन्हा झोपले!! ज्याला हे जमले तोचि आत्मनिर्भर जाणावा. 

आत्मनिर्भर माणसाची लक्षणे कोणती? ते आता थोडक्‍यात पाहू. थोडक्‍यातच हं! माणसाने कसे आत्मसंतुष्टदेखील असावे. 

आत्मनिर्भर माणूस हा स्वभावाने बिनधास्त आणि निर्भय असतो. आपण आपले असलो की कोणाच्या बाला घाबरायचे कारण नाही, असे तो चारचौघांत ठणकावून सांगतो. आत्मनिर्भर माणूस हा साधारणत: काहीशा सुदृढ देहाचा, सदऱ्याच्या बाह्या कोपरापर्यंत फोल्ड केलेला, कॉलरमध्ये रुमाल ठेवणारा असा असतो. पायात चपला नव्हे, सॅंडल असतात. हाटेलाच्या आसपास भेटला, तर तो आपल्या खांद्यावर हात टाकून " चल, चहा घेऊ' असे म्हणून हाटेलात नेऊन चहा पिऊन नंतर चिमुकल्या बशीत आलेले बिल हुकवून बडीशेप उचलून झटकन उठतोच!! (बिल आपल्याला भरावे लागते!) हे ज्याला जमले, त्याने आपण आत्मनिर्भर झालो असे समजावे!! 

आता तुम्ही म्हणाल, हे तर आत्मनिब्बर माणूसही आरामात करील!! पण मित्रों, तसे नाही! आत्मनिब्बर कधीही स्वत: "चहा पिऊ' असे म्हणत नाही. तो काहीही पितो!! त्याला कशाचेच काही वाटत नाही. कुणी आपणहून दिले, खुश. नाही दिले, तरीही खुश,असा त्याचा मामला असतो. ही आत्मनिब्बर माणसे लॉकडाउनमध्येही शांतपणे जगतात. पोलिसांचे दंडे खात हिंडून आल्यावर ते "टीव्हीवर दाखवलं, पाहिलं का?' असेही विचारतात. साधारणत: बरम्युडा, मळका टीशर्ट, दाढी व केस कापण्याचे राहून गेलेला हा आत्मनिब्बर माणूस "इसम' या सदरात मोडतो. मास्क लावून भाजी आणायला गेल्यावर "आर्धा किलो कोबी द्या' हे मास्क वर करून सांगणारे हे लोक! त्यांच्याबद्दल काय सांगावे? 

आत्मरब्बर माणसाला तर अक्षरश: काहीही चालते. कोर्फडीच्या रसापासून काळ्या चहापर्यंत काहीही निमूटपणे पिणारी ही जमात असते. लॉकडाउनच्या काळात चपात्या लाटण्याचे तंत्र शिकून घेतल्याचे "फेसबुक'वर जाहीर करणारे हेच ते अलौकिक मनुष्यप्राणी. जन्म आणि मृत्यू यांच्यामधली जीवन नावाची गोष्ट ही लॉकडाउनसारखीच आहे, असे त्यांचे प्रामाणिक मत असते. आता तुम्ही विचाराल, की बुवाऽऽ आत्मनिर्भरता म्हंजे हो काय? 

सांगतो, सांगतो! जरा धीर्धरा!! अजून बराच वेळ आम्ही बोल्णार आहो! इतनी भी क्‍या जल्दी है? 

आत्मनिर्भर या शब्दाचा अर्थ तसा सोपा आहे. आत्म म्हंजे "आत'मधले! ओठाच्या आत एक असते आणि पोटाच्या आत दुसरेच, असे म्हणतात ना? त्यातलेच "आत' मधले! यात ऍक्‍चुअली, "त' ला "म' जोडलेला नसून "म' ला "नि' जोडलेला आहे.- मनि!! मनि म्हंजे काय, हे आता सांगायला का हवे? "आत मनि भर'चा सोपा अर्थ आहे, पाकिटात पैसे ठेव! कळले? 

भर लॉकडाउनमध्येही ज्याच्या पाकिटात पैसे आहेत तो मनुष्य आत्मनिर्भर होय! तेव्हा भर्भर आत्मनिर्भर व्हाबरं!!