esakal | ढिंग टांग : फक्त दोन तास!
sakal

बोलून बातमी शोधा

ढिंग टांग : फक्त दोन तास!

मी पुन्हा आलो असतो तर, एव्हाना कोरोनाची लस महाराष्ट्रात तयार होऊन लोकांपर्यंत पोचलीसुद्धा असती. अमिताभ बच्चनजींनाच ‘आणखी दो बूंद जिंदगी के’ असे म्हणायला लावत जोरदार लसीकरण मोहीम राबवली असती. 

ढिंग टांग : फक्त दोन तास!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

आजची तिथी : प्रमादीनाम संवत्सर श्रीशके १९४२ आषाढ शु. द्वादशी.
आजचा वार : नमोवार...याने की गुरुवार!
आजचा सुविचार : पळे जाती घटका जाती, तास वाजे घणाणा, आयुष्याचा नाश होतो राम का रे म्हणा ना?

नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे.) वारंवार साबणाने हात धुवायचे आणि नंतर उगीचच हात चोळत बसायचे, एवढाच उद्योग उरला आहे. आपल्यातील गुणांचे महाराष्ट्रात चीज होत नाही, या कल्पनेने मन खंतावते.

वास्तविक मला असे काही कालपर्यंत वाटत नव्हते. पण आमचे प्रदेशाध्यक्ष मा. चंदूदादा कोल्हापूरकर आले आणि त्यांनी माझ्या मनात या खंतीचे बीज पेरले. जाड भिंगाच्या चष्म्यातून रोखून पाहात ते म्हणाले, ‘‘हे काय चाललंय मुंबईत?’’

‘‘अहो, दादा, मला काय माहीत?,’’ मी कळवळून म्हणालो.

‘‘लहान मुलगीदेखील सांगेल की यांचं काही खरं नाही! यांना कोरोनाशी लढताच येत नाही मुळी! त्यापेक्षा तुम्हाला दोनेक तास बोलावलं असतं तरी चाललं असतं!’’

‘‘कुठे?’’ घाबरून मी विचारले.

‘‘कुठे काय? तुम्हाला दिवसातून दोन तास बोलावलं असतं, तर महाराष्ट्राचे कितीतरी प्रश्न सुटले असते! पण यांचा इगो आडवा येतो ना!!,’’ सात्त्विक संतापाने ते (घाम पुसत) म्हणाले.

...तेव्हापासून मी पुन्हा येण्याबद्दल विचार करू लागलो. युद्धाचे नेतृत्व दुबळे असले की ते लांबते. महाभारताचे युद्ध अठरा दिवसांत संपले होते, पण हे कोरोनाचे प्रकरण महिनोनमहिने चालू आहे. ठरल्याप्रमाणे मी (पुन्हा) आलो असतो तर आज परिस्थिती कितीतरी वेगळी असती...

 मी पुन्हा आलो असतो तर एव्हाना कोरोनाचा विषाणू स्वत:च घायाळ होऊन निपचित पडला असता किंवा पळून पाकिस्तानात गेला असता! सिनेमागृहे, मॉल्स, दुकाने, मंडया, उद्योगव्यवसाय, रेल्वेगाड्या, बससेवा, टॅक्‍सी-रिक्षा सारे काही सुरळीत सुरू झाले असते. देवळे गजबजली असती. महाराष्ट्रात एक सकारात्मक वातावरण असते. जगभर महाराष्ट्राचे प्रचंड कौतुक झाले असते. ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने माझी मुलाखत घेतली असती. विचारले असते :‘‘ कोसो कॉय बोआ तुम्ही कोरोनाला हरवलंत? हौ, हौ, प्लीज, आम्हालाही सांगा ना!’’ एक हात आशीर्वादासारखा उंचावून प्रगल्भ उत्तरे देऊन साऱ्यांना मंत्रमुग्ध केले असते. लोकांनी म्हटले असते, ‘मुख्यमंत्री असावा तर असा!’  पण...पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते.

मी पुन्हा आलो असतो तर, एव्हाना कोरोनाची लस महाराष्ट्रात तयार होऊन लोकांपर्यंत पोचलीसुद्धा असती. अमिताभ बच्चनजींनाच ‘आणखी दो बूंद जिंदगी के’ असे म्हणायला लावत जोरदार लसीकरण मोहीम राबवली असती. इतकेच काय, इस्पितळे ओस पडली असती. सारी प्रजाच निरोगी झाली तर डॉक्‍टर मंडळींना काय काम उरणार? ते ‘आयपीएल’ बघायला मोकळे झाले असते! 

मी पुन्हा आलो असतो तर, कोरोनाचे नामोनिशाण राहिले नसते. जगभर ‘महाराष्ट्र पॅटर्न’ राबवा, असा जागतिक आरोग्य संघटनेने आग्रह धरला असता!!

खरंच मी रोज दोन तास कामाला जावे का? एकदा वाटते, जावे आणि दोनेक तासांत सगळे प्रश्न चुटकीसरशी सोडवून पुन्हा नागपूरला यावे! मग पुन्हा वाटते, उगीच कशाला रिस्क घ्या? चालले आहे, ते बरे आहे!

...खरोखर दोनेक तास जावे, असे काही लोकांना वाटते आहे की काय? कठीणच आहे! सावध राहायला हवे!!